सोलापूर : कमालीची गटबाजी, भरती-ओहोटी यामुळे सोलापुरातील सत्ताधारी भाजपसह महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वर्तमान अस्वस्थ असल्याचे दिसून येते.‌ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना सत्ताधारी महायुतीला गटबाजीने ग्रासले आहे. यात कोणाचा कोणात मेळ दिसत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सोलापूर लोकसभा क्षेत्रात मजबूत ताकद असलेल्या भाजपचे एकूण सहापैकी पाच आमदार आहेत.‌ परंतु ही वाढलेली ताकद हीच पक्षासाठी जणू शाप ठरल्याचे दिसून येते.‌ सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकीकडे कधी नव्हे ते विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे दोघे ज्येष्ठ आमदार एकत्र आले. त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, याच पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्याशी हातमिळवणी करून सत्ता मिळवली. यात दोघे आमदार देशमुख पराभूत झाले. त्यामुळे हे दोघेही नाराज असून त्यांचा राग अजूनही शांत झाला नाही. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे आमदार सुभाष देशमुख यांचे शिष्य मानले जातात. परंतु त्यांनी गुरूलाच कात्रजचा घाट दाखवला आहे. त्यांना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे आदींची साथ असल्याचे सांगितले जाते. माजी आमदार दिलीप माने हे आमदार सुभाष देशमुख यांचे राजकीय विरोधक मानले जातात. त्यांनाच आमदार कल्याणशेट्टी यांनी ताकद दिल्यामुळे तर दुसरीकडे आमदार विजयकुमार देशमुख यांनाही आमदार कल्याणशेट्टी यांचा जुना राग आहे.‌ सध्या तरी कल्याणशेट्टी यांचा दबदबा दिसतो. यात भाजपच्या अंतर्गत राजकारणात वाद-विवाद, शह-काटशहाचे डावपेच खेळले जात आहेत. दुसरीकडे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा विचार करता भाजप आपल्या मित्र पक्षांना शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोजायलाही तयार नसल्याने दिसून येते.

भाजपनंतर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात मोठ्या प्रमाणावर भरती सुरू होत असली तरीही कोठेही अलबेल दिसत नाही. अक्कलकोटचे काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी अलिकडेच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात मोठे शक्ती प्रदर्शन करीत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी हजर होते. परंतु त्यांचे विमान उतरण्यास कोणी अडथळा आणला होता, याची चर्चा राजकीय वर्तुळात आजही ऐकायला मिळते. सिद्धाराम म्हेत्रे आणि भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात कमालीची कटुता आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिध्दाराम म्हेत्रे यांच्या पाठीशी ताकद उभी केली आहे.‌ यातूनच अक्कलकोटमध्ये आमदार कल्याणशेट्टी यांनी काढलेला हिंदू जनआक्रोश मोर्चा पुरेसा बोलका ठरला.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप, शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार रतिकांत पाटील, त्यांचे पुत्र, माजी जिल्हाप्रमुख अमर पाटील, माढ्यातील संजय कोकाटे आदी मंडळी दाखल झाली आहेत.‌ परंतु त्यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्याशी माढा विभागात कोणाशीही पटत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील परिस्थितीही अशीच आहे. मोहोळ तालुक्यातील प्रस्थापित नेते, माजी आमदार राजन पाटील यांच्याशी उघडपणे पंगा घेऊन घेतलेले पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनाच पक्षाचे जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे राजन पाटील हे खूपच दुखावले आहेत. उमेश पाटील यांचा अजित पवार यांनी यापूर्वी शेलक्या शब्दांत समाचार घेतला होता. परंतु आता त्यांच्याच गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घातल्यामुळे पक्षात अस्वस्थता दिसून येते. या पक्षाचे बहुसंख्य नेते आपापल्या भागातील शिलेदार आहेत. या नेत्यांवर पक्षाचे अस्तित्व अवलंबून राहिल्याने त्याचे परिणाम अनुभवायला मिळाले आहेत. नेत्यांच्या मागे पक्षाची फरफट होताना सर्वांनी पाहिले आहे.‌