मागील काही दिवसांपासून मध्य प्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ हे काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चां सुरू होत्या. अशातच काँग्रेसने छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या या उमेदवारीनंतर आता कमलनाथ यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे आता भाजपाच्या नेत्यांनीही आम्ही कमलनाथ यांच्या पक्षप्रवेशाबाबत गंभीर नव्हतो, अशाप्रकारची प्रतिक्रिया दिली आहे. यावरून आता राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

हेही वाचा – देशात एकत्र निवडणुका झाल्यास ‘या’ दहा राज्यांतील सरकारांना मिळेल एका वर्षांपेक्षाही कमी कालावधी, महाराष्ट्राचं काय?

या संदर्भात ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. “कमलनाथ हे भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक होते. राज्यस्तरावरील काही नेतेसुद्धा त्यांच्या पक्षप्रवेशाच्या बाजूने होते. मात्र, या संदर्भात पंतप्रधानांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अशा मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश पंतप्रधानांच्या सहमतीशिवाय होत नाहीत”, असे ते म्हणाले. याशिवाय आणीबाणीचा निर्णय आणि १९८४ साली झालेल्या शीख दंगलीत कमलनाथ यांच्या कथित सहभागाचा संदर्भ देत त्यांना भाजपात घेऊन पक्षाला कोणताही फायदा झाला नसता, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

याशिवाय भाजपाच्या इतर दोन नेत्यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली. ”कमलनाथ यांना पक्षात घेण्याची भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांची इच्छा नव्हती”, असे ते म्हणाले. मात्र, नकुलनाथ जर भाजपात येणार असतील, तर त्याबाबत विचार केला जाईल, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर कमलनाथ हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील पराभवानंतर काँग्रेस हायकमांडने त्यांना अनेकदा प्रश्नही विचारले होते. अशातच काँग्रेसने त्यांना राज्यसभेची उमेदवारी न दिल्याने या चर्चांना आणखीनच पेव फुटले. महत्त्वाचे म्हणजे १६ आणि १७ फेब्रुवारीला दिल्लीत झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय परिषदेनंतर कमलनाथ आपल्या मुलासह भाजपात प्रवेश करतील, अशी शक्यताही वर्तवली जात होती.

हेही वाचा – Electoral Bond Data : निवडणूक रोख्यांसाठी भाजपानंतर ‘या’ पक्षाला देशात सर्वाधिक पसंती!

याबाबत द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “कमलनाथ हे काँग्रेसच्या सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. तसेच ते गांधी कुटुंबाच्या अगदी जवळचे आहेत. एकेकाळी त्यांना इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा म्हणून संबोधले जायचे. त्यांचे भाजपात येणं हा काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्का असता. तसेच अन्य एका केंद्रीय मंत्र्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना, कमलनाथ हे भाजपात येणार नसले, तरी छिंदवाड्यातील त्यांच्या अनेक समर्थकांनी भाजपात प्रवेश केला असल्याचे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कमलनाथ हे भाजपात गेले असते, तर काँग्रेस सोडून भाजपात जाणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांच्या यादीत त्यांच्याही नावाचा समावेश झाला असता. यापूर्वी अशोक चव्हाण, नारायण राणे, मुकुल संगमा, अमरिंदर सिंग, नबी आझाद, विजय बहुगुणा, दिवंगत अजित जोगी, एस. एम. कृष्णा, पेमा खांडू आणि गिरीधर गमांग यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. यापैकी गिरीधर गमांग हे काही दिवसांपू्र्वीच काँग्रेसमध्ये परतले.