अशोक अडसूळ

मुंबई : एच. डी. देवेगाैडा यांनी भाजपबरोबर युती केल्याच्या निषेधार्थ राज्यातील धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या नेत्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव अध्यक्ष असलेल्या समाजवादी पक्षात नुकताच प्रवेश केला आहे. नितीशकुमार यांच्या पक्षात प्रवेश करावा , असा सूर असताना काही नेत्यांनी सपात प्रवेश केल्याने राज्यातील समाजवाद्यांमध्ये फूट पडली आहे.

हिंदुत्ववादी भाजपाची साथ नको म्हणणाऱ्या या समाजवादी साथींचा संसार ‘सपा’चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व कडवट नेते अबु आझमी यांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे.

हेही वाचा… ऊस दर प्रश्नावरून राजू शेट्टी यांची लोकसभा निवडणुकीची पेरणी

३० ऑक्टोबर रोजी धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या १० नेत्यांनी लखनाै येथे अखिलेश यांची भेट घेतली. त्यापूर्वी ३० सप्टेंबर रोजी पुण्यात समाजवादी नेत्यांची बैठक पार पडली होती. त्या बैठकीत चिंतन करुन आठ नेत्यांची समिती स्थापन केली होती. ही समिती पुरोगामी चळवळीतील धुरीण न्या. बी.जी. कोळसे पाटील (निवृत्त) यांच्या सल्ल्याने कोणत्या पक्षात जायचे याची शिफारस करणार होती.

लालू यादव यांचा ‘आरजेडी’, नितीशकुमार यांचा ‘संयुक्त जनता दल’ आणि अखिलेश यादव यांचा ‘समाजवादी’ असे तीन पर्याय त्यांच्या समोर होते. त्यातून अखेर समाजवादी पक्षाला पसंती देण्यात आली. प्रताप होगाडे, अॅड. रेवण भोसले, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, साजिदा निहाल अहमद, डॉ. विलास सुरकर, मनवेल तुस्कानो या नेत्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला.

हेही वाचा… आरक्षण मागणीच्या ध्रुवीकरणाचा मराठवाड्यात राजकीय लाभावरून तर्कवितर्क

समाजवादी पक्षाने प्रताप होगाडे यांना प्रदेश कार्याध्यक्ष, पी.डी. जोशी पाटोदेकर यांना प्रदेश उपाध्यक्ष तर रेवणे भोसले यांना प्रदेश महासचिव अशी जबाबदारी दिली आहे. ‘सपा’मध्ये जनता दलाचा जो गट गेला आहे, त्याचे नेतृत्व प्रताप होगाडे यांनी केले. या निर्णयापासून जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार शरद पाटील दूर राहिले आहेत. महाराष्ट्रातील जनता दलाचे ७० टक्के पदाधिकारी समाजवादीमध्ये सहभागी झाले असल्याचा दावा प्रदेश कार्याध्यक्ष होगाडे यांनी केला आहे.

संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय महासचिव व विधानपरिषदेचे आमदार कपिल पाटील हे या गटाला आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

हेही वाचा… मराठा व ओबीसी आरक्षणवादावर भाजप निश्चिंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धर्मनिरपेक्ष जनता दलाचा राज्यात एकही विधिमंडळ सदस्य नाही. समाजवादी पक्षाचे राज्यात भिवंडी येथे रईस शेख आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे अबु आझमी असे दोन आमदार आहेत. विधिमंडळात आणि बाहेरही विव्देषी भाषा वापरणे हे जोनपुरच्या अबु आझमी यांचे वैशिष्ट्ये राहिलेले आहे. अनेक साथींनी ‘सपा’मध्ये प्रवेश आजमावून पाहिला. पण आझमी यांच्या एककल्ली कार्यशैलीत त्यांची डाळ शिजली नाही.