तामिळनाडूमध्ये स्थलांतरित कामगारांवर हल्ले झाल्याची अफवा पसरल्यामुळे काही दिवसांपूर्वी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी प्रतिक्रिया दिली असून यासाठी उत्तर भारतातील भाजपा नेते जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपाच्या विरोधात विरोधकांची एकजूट होणार असल्याची घोषणा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी या अफवा पसरवायला सुरुवात झाली, असेही स्टॅलिन यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या ‘उंगलिल ओरुवन’ (Ungalil Oruvan) या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशनानिमित्त आयोजित केलेल्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात त्यांनी भाजपावर टीका केली. तामिळनाडूमध्ये स्थलांतरित मजुरांवर हल्ल्याची अफवा पसरली याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, उत्तर भारतातील भाजपाच्या नेत्यांनी खोटे व्हिडीओ व्हायरल केले. यातूनच त्यांचा गुप्त हेतू कळून येतो. ज्या दिवशी मी विरोधकांच्या एकजुटीची हाक दिली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी हे खोटे व्हिडीओ कसे काय व्हायरल झाले? इथेच भाजपाचा अपप्रचार कळून येतो.

हे वाचा >> बिहारी कामगारांवर हल्ल्याच्या अफवेनंतर डीएमके नेते बालू यांनी घेतली नितीश कुमारांची भेट; भाजपाविरोधी आघाडीवर चर्चा?

बिहारमधील सत्तापक्ष जेडीयूनेदेखील स्टॅलिन यांच्या सुरात सूर मिसळला आहे. भाजपाने जाणूनबुजून अफवा पसरवून तामिळनाडू राज्याची बदनामी केली. यामधून त्यांना दोन राज्यांत वाद उभा करायचा होता, जेणेकरून दोन विरोधी पक्ष एकत्र येता कामा नयेत. “भाजपाने अफवा पसरवून तामिळनाडू आणि बिहार राज्यांत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण यातून काय साध्य झाले? तामिळनाडूत एकही हल्ला झाला नसल्याचे समोर आले. बिहारमधून एक शिष्टमंडळ तामिळनाडूमध्ये जाऊन सर्वेक्षण करून आले आहे. तिथे आम्हाला एकही गैरप्रकार झालेला दिसला नाही.”, अशी प्रतिक्रिया जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह यांनी दिली.

स्टॅलिन यांनी गुरुवारी प्रतिक्रिया देताना सांगितले, “हल्ल्याबाबतची अफवा असल्याचे आमच्या लक्षात आल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना याबाबत माहिती देण्यात आली. तामिळनाडूमध्ये एकाही कामगारावर हल्ला झालेला नाही. तामिळनाडूच्या पोलीस महासंचालकांनीदेखील सविस्तर भूमिका मांडली आहे. बिहारमधील शिष्टमंडळाचेदेखील चौकशीनंतर समाधान झाले आणि ते बिहारला सुखरूप पोहोचले. तामिळनाडूने नेहमीच बाहेरून येणाऱ्यांचे स्वागत केले आहे, त्यांना मदत केली आहे.”

आणखी वाचा >> उत्तर भारतातील मजूरांबाबत चुकीचे वृत्त पसरविल्याप्रकरणी भाजपा नेता, २ पत्रकारांवर गुन्हे दाखल; तामिळनाडूमध्ये गोंधळ माजविण्याचा प्रकार

“तामिळनाडू आणि तामिळी लोक एकता आणि बंधुतेचे महत्त्व जाणतात. देशातील सर्व शहरे आमची आहेत आणि प्रत्येक जण आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. उत्तर भारतातील जे कामगार येथे काम करतात, त्यांनाही याची पूर्ण कल्पना आहे, असेही स्टॅलिन म्हणाले. गुरुवारी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये स्टॅलिन यांनी पहिल्यांदाच भाजपाचे नाव घेऊन जोरदार टीका केली. १ मार्च रोजी स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त डीएमकेच्या वतीने चेन्नई येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्याची घोषणा करत स्टॅलिन यांनी विरोधकांना बिनर्शतपणे एकत्र येण्याचा संदेश दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्तलांतरित कामगारांवर हल्ला झाल्याची बातमी पसरली.”, अशी प्रतिक्रिया एमके स्टॅलिन यांनी गुरुवारी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे, असेही स्टॅलिन यांनी सांगितले. तसेच डीएमकेचे विधिमंडळ पक्षनेते टी. आर. बालू यांनीदेखील मंगळवारी बिहारमध्ये जाऊन मुख्यमंत्री नितीश कुमार यांना व्यक्तिगतरित्या सर्व परिस्थितीबाबत अवगत केले. तसेच त्याच दिवशी स्टॅलिन यांनी तिरुनेवल्ली जिल्ह्यात जाऊन स्थलांतरित कामगारांशी संवाद साधला. या जिल्ह्यात बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील अनेक कामगार राहतात.