मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने तीन टप्प्यांमध्ये या निवडणुका घेण्याची तयारी केली आहे. नोव्हेंबर अखेरीस जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, डिसेंबर अखेरीस वा जानेवारीच्या सुरुवातीला नगरपालिका आणि जानेवारीच्या अखेरीस महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याची राज्य निवडणूक आयोगाची योजना आहे.

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या, नगरपालिका व नगरपंचायती आणि शेवटी महानगरपालिका अशा तीन टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असे सांगण्यात येते. राज्य निवडणूक आयोगाने तशी तयारी केली आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील गट आणि गण अंतिम करण्यात आले आहेत.

गेल्याच आठवड्यात जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. पुढील टप्प्यात गट आणि गणाच्या आरक्षणाची सोडत आता काढली जाईल. यामुळेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका सर्वात आधी घेतल्या जातील. ग्रामीण महाराष्ट्राचा कल कोणत्या दिशेने आहे याचा सर्वच राजकीय पक्षांना अंदाज येऊ शकेल. त्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुका होतील. सर्वात शेवटी सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाच्या असणाऱया महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगूल वाजेल. 

जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनंतर २०० पेक्षा अधिक नगरपालिकांच्या निवडणुका होतील. नगरपालिकांच्या प्रभागांची रचना करण्याची अंतिम मुदत ही ३० सप्टेंबरपर्यंत आहे. परिणामी नगरपालिका निवडणुका डिसेंबरमध्ये घेतल्या जाऊ शकतात. मुंबईसह २९ महानगरपालिकांमध्ये प्रभागांची अंतिम रचना जाहीर करण्याची मुदत ही १३ ऑक्टोबरपर्यंत आहे.

मुंबईत ही मुदत ६ ऑक्टोबर आहे तर ड वर्ग महानगरपालिकांमध्ये ही मुदत १३ ऑक्टोबरपर्यंत आहे. त्यानंतर प्रभागांचे आरक्षण, मतदार यादी ही सारी प्रक्रिया पूर्ण होण्यास काही वेळ जाईल. महानगरपालिकेच्या निवडणुका या जानेवारीच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात होतील, असाच एकूण रागरंग आहे.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी होणार याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. ही निवडणूक जानेवारीच्या अखेरीस होईल, अशी शक्यता वर्तविली जाते.

सत्ताधारी महायुतीला फायदेशीर ?

तीन टप्प्यांमध्ये होणारी निवडणूक ही महायुतीला फायदेशीर ठरू शकते, असा एकूणच सत्ताधारी महायुतीत सूर आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे तिन्ही पक्ष तेवढे संघटित नाहीत. राज्याच्या ग्रामीण भागात महायुतीच्या तिन्ही पक्षांचा अधिक पगडा असल्याचे गणित मांडले जाते. नगरपालिका निवडणुकीतही सत्ताधारी महायुती अधिक यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील असेल. जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीच्या घटक पक्षांना चांगले यश मिळाल्यास त्याचा महानगरपालिका निवडणुकीत परिणाम होऊ शकतो, असा सत्ताधाऱ्यांमध्ये सूर आहे. यामुळेच तीन टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका फायदेशीर ठरतील, असे महायुतीच्या धुरिणांचे म्हणणे आहे.