शिवसेनेची निवडणूक निशाणी असलेले 'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा येथे शिवसैनिकांना धक्का बसला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात या निर्णयाने शिवसैनिक अस्वस्थ आहेत. धनुष्यबाण ही केवळ शिवसेनेची निवडणूक निशाणीच नव्हती तर ऐन निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणासाठी 'खान पाहिजे की बाण' या घोषणेचाही वापर केला जायचा. आता चिन्ह गोठवण्यात आल्याने अनेक कळीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. हेही वाचा- फडणवीस यांच्या ‘मैं हू ना’ मुळे नागपूरसाठी घसघशीत विकास निधीची खात्री, पण… प्रस्तावांच्या फेरतपासणीमुळे विरोधकांना शंका नव्वदच्या दशकात मराठवाड्यात शिवसेनेची लाट आल्यानंतर काँग्रेसचे अनेक बुरूज ढासळले. त्यात परभणीचाही समावेश होतो. आक्रमक तरुणाईच्या बळावर शिवसेनेने राजकारणातील उलथापालथ केली. सन १९८९ च्या निवडणुकीत अशोक देशमुख यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. काँग्रेसच्या रामराव लोणीकर यांचा पराभव करून ते ६५ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. अशोक देशमुख आणि विलास गुंडेवार (हिंगोली) यांच्या विजयानेच शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. त्यामुळेच शिवसेनेच्या नेतृत्वालाही परभणीचे अप्रुप आहे. शिवसेनेची निवडणूक निशाणी असलेला धनुष्यबाण हाच पुढे या पक्षाला राज्याच्या सत्तेत वाटेकरी मिळवून देणारा ठरला.१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत देशमुख शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर निवडून आले. पुढे केंद्रातले नरसिंह राव यांचे सरकार वाचविण्यासाठी त्यांनी पक्षाशी द्रोह केला. त्यांना १९९६ च्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारीही मिळाली. त्या वेळी त्यांच्याविरुद्ध कोणतीच राजकीय ओळख नसणाऱ्या सुरेश जाधव यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. केवळ गंगाखेडचे तालुकाप्रमुख हीच त्यांची ओळख होती. त्यावेळी राजकारणात अतिशय नवख्या असलेल्या जाधव यांनी अशोक देशमुख यांचा दारुण पराभव केला. हेही वाचा- ढाल तलवार, रेल्वे इंजिन, मशाल ते धनुष्यबाण…शिवसेनेच्या निवडणूक चिन्हांचा प्रवास पुढे सातत्याने शिवसेनेने परभणी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. लोकसभेच्या १९९८ च्या मुदतपूर्व निवडणुकीत काँग्रेसने सुरेश वरपूडकर यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी शिवसेनेच्या सुरेश जाधव यांचा सरळ लढतीत ४६ हजार मतांनी पराभव केला. एवढा एकमेव अपवादात्मक असा पराभव शिवसेनेच्या वाट्याला या मतदारसंघात आला आहे. अर्थात निवडून आलेले खासदार पक्षद्रोह करतात अशी या मतदारसंघातील शिवसेनेची परंपरा आहे. अशाप्रकारे अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, गणेश दुधगावकर अशी शिवसेनेच्या पक्षद्रोह केलेल्या खासदारांची परंपरा आहे. निवडून आलेल्या खासदारांनी शिवसेनेशी फारकत घेण्याची परंपरा गेल्या निवडणुकीपासून मात्र खंडित झाली. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत संजय जाधव यांनी विजय संपादन केल्यानंतर पुन्हा २०१९ साली पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिली आणि या निवडणुकीतही ते विजयी झाले. नुकत्याच झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे जे जोरदार पडसाद उमटले त्यात आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहोत असे खासदार जाधव यांनी जाहीर केले. शिंदे यांनी केलेल्या बंडाचा फारसा परिणाम परभणी जिल्ह्यात झाला नाही. आज जिल्ह्यात खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील हे दोघेही मोठे नेते उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत. हेही वाचा- या सुषमा अंधारे आहेत तरी कोण? परभणी विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या निर्णायक आहे. अशावेळी काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिल्यानंतर शिवसेनेला प्रचार करणे सहज सोपे जाते. असा आजवरचा अनुभव आहे. 'खान पाहिजे की बाण पाहिजे' असा प्रचार आक्रमक पद्धतीने केला जातो. यातून धार्मिक ध्रुवीकरण करायचे आणि राजकीय लाभ मिळवायचा अशी शिवसेनेची योजना असते. त्यात सेना अनेकवार यशस्वी झाली आहे. मात्र आता धनुष्यबाणच हातून गेल्याने भविष्यात सेनेला अशी घोषणा निवडणुकीत देता येणार नाही हेही स्पष्ट झाले. अर्थात शिवसेनेची ही निवडणूक निशाणी ग्रामीण भागात वाडी वस्ती तांड्यापर्यंत जाऊन पोहोचलेली होती. आता ती गोठवण्यात आल्याने आपले राजकीय अस्तित्व टिकविण्याची मोठी कसोटी सध्या सेनेपुढे आहे. परभणीमुळेच शिवसेनेला राजकीय मान्यता मिळाली आणि धनुष्यबाण या निवडणूक निशाणीवरही शिक्कामोर्तब झाले. ज्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला मोठे केले, नावारूपाला आणले त्याच भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा गळा घोटण्याचे काम केले आहे. आपल्याशिवाय एकही हिंदुत्ववादी पक्ष शिल्लक राहू नये ही भारतीय जनता पक्षाची नीती आहे. आज शिवसेनेला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला या पापाची फळे भोगावी लागतील. शिवसेनेतून बाहेर पडून भारतीय जनता पक्षाच्या कटकारस्थानाला बळी पडलेल्या खासदार, आमदारांनीही याचा विचार करावा. बाळासाहेबांच्या पश्चात त्यांनी निर्माण केलेले वैभव नेस्तनाबूत करण्याचे काम या गद्दारांनी केले आहे. काळ त्यांनाही माफ करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार संजय जाधव यांनी दिली. हेही वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय गुजरात दौऱ्यात करणार १४५०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन तर गद्दारांना हाताशी धरून आणि त्यांना पाठबळ देऊन भारतीय जनता पक्षाने रचलेले हे षडयंत्र आहे. यात त्यांना कधीच यश मिळणार नाही. सर्वसामान्य शिवसैनिक हा बाळासाहेब ठाकरे यांना मानणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आमच्या सर्वांचाच विश्वास आहे. पक्षाची बहुतांश कार्यकारिणी उद्धव यांच्याच पाठिशी आहे. दहा लाख शपथपत्रांच्या माध्यमातून शिवसैनिकांनी या नेतृत्वावर आपला विश्वास प्रकट केला आहे. असे असताना शिवसेनेची निवडणूक निशाणी गोठवणे हा केवळ कट आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधी जरी हे षडयंत्र रचले गेले असले तरी मुंबई महापालिकेची निवडणूक विरोधकांच्या डोळ्यासमोर आहे. मात्र महाराष्ट्रातली जनता कदापिही गद्दारांना साथ देणार नाही, असे शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदरयांनी म्हटले आहे.