सुहास सरदेशमुख

कपाळावर मधोमध भगवा नेमाटा, गळयात गमछा ओघाने आलाच. दंडातली बेटकुळी अधून मधून टणाटणा उडया मारणारी.. मनगटात कसले -कसले गंडेदोरे, मस्तकी नेमाटा नसेल तर किमान अष्टगंधाचा टीळा तरी लावलेलाच.. अशा काहिशा आक्रमक ‘सैनिकांच्या’ गराडयात संविधान आणि घटनात्मक चौकटीची चर्चा करता येऊ शकते असं सुषमा अंधारे यांना आता का वाटत असावं? आंबेडकरी चळवळीत वाढलेल्या, ‘उचल्या’कार लक्ष्मण मानेंबरोबर भटक्यांच्या चळवळीत काम केलेल्या आणि ‘अस्मिता दर्श’ साहित्य संमेलनात (दलित चळवळीतील साहित्य प्रकाशित करणारे हे नियतकालिक त्यात सहभागी होणाऱ्या लेखक आणि कवी आणि वाचकांचे संमेलन) पुरोगामी विचार मांडणाऱ्या कार्यकर्तीस शिवसेना अधिक जवळची वाटू लागली आहे कारण, भाजपच्या आक्रमक राष्ट्रवादासमोर संविधानाची चौकट मोडण्याची भीती त्यांना अधिक वाटते. सुषमा अंधारे यांचं शिवसेनेत असणं आणि त्यांचं अलिकडेच शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्यात गाजलेलं भाषण या मागची ही पार्श्वभूमी राजकीय कूस बदलाचे निदर्शक आहे.

Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
The plight of workers in coalition politics in Raigarh
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरपट
raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, सनातनी हिंदुत्वाच्या भाजपाने आखून दिलेल्या व्याख्येतून शिवसेना बाहेर पडू लागली आहे. शिवसेना हिंदुत्वाची नवी परिभाषा मांडू लागली आहे. त्याला आकार देता येऊ शकतो. सहिष्णू, व्यापक आणि सर्वांना समावून घेणारा आणि ‘ वे ऑफ लाईफ’ ही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेल्या हिंदूत्त्वाची व्याख्या आकारास येऊ शकते असे लक्षात आल्यानंतर आंबेडकरवादी कार्यकर्ते आता शिवसेनेविषयी आपुलकी बाळगू लागले आहेत. सुषमा अंधारे या आपुलकी वाटणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रतिनिधीत्व करतात. अंधारे या कोल्हाटी समाजात जन्मलेल्या. जन्मगाव लातूर जिल्ह्यातील मुरुड. पण त्यांचे शिक्षण परळीत झाले. काही वर्षे त्यांनी येथील महाविद्यालयात तासिका तत्वावर काम केलं. पण मूळ पिंड तसा कार्यकर्त्याचा. भाषणाला टोकदार रुप देत अधून-मधून आक्रस्ताळी वाटतील अशीही त्यांची अनेक भाषणे मराठवाड्यात कित्येकांनी ऐकलेली.ती कधी राष्ट्रवादीच्या तर कधी बहूजनच्या मंचावर. भाषणांमध्ये टोपी उडविणे, एखाद्याची खेचणे, प्रसंगी व्यक्तिगत टीका करणे हे शिवसेनेच्या व्यासपीठावरुन होणे तसे नवे नाही. पण या टीकेला मुस्लिमव्देषाची किनार असे. तो टोकदारपणा महाविकास आघाडीच्या काळात कमी होतो आहे, असे लक्षात आल्यानंतर आता नवी समीकरणे राज्याच्या राजकारणात उदयास येऊ शकतात. नुकतेच प्रकाश आंबेडकर यांनीही राष्ट्रवादीला वगळून काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर युती करता येऊ शकेल असे जाहीर केले आहे.

अशा वातावरणात वक्तृत्व गुणांचं नेतृत्व म्हणून शिवसेनेत सुषमा अंधारे चर्चेत आल्या. खरे तर प्रत्येक क्षेत्राला कवेत घेणारे उत्तम वक्ते शिवसेनेमध्ये अजूनही आहेत. शेतकरी संघटनेत अनेक वर्षे घालविल्यानंतर शिवसेनेत काम करणारे लक्ष्मण वडले असतील किंवा कापूस प्रश्नी लढा देणारे दिवाकर रावते असतील सेनेतील अनेक नेते उत्तम भाषण करतात. हजारोंच्या सभेतील कार्यकर्त्यांना ते आक्रमकही बनवू शकतात आणि शांतही करू शकतात. पण बदलणारी हिंदुत्वाची व्याख्या ,त्याला मिळालेली घटनात्मक चौकट या पटलावरील वक्तृत्व गुणांचं नेतृत्व सुषमा अंधारे यांच्याकडे आपसूक आलं आहे. या श्रेणीत पूर्वी निलम गोऱ्हे होत्या. त्यांचे आता शिवसेनेत स्वतंत्र स्थान आहे. असे स्थान मिळविण्यासाठी सुषमा अंधारे यांना केवळ वक्तृत्व तारुन नेईल, असे होणार नाही. पण सध्या त्या शिंदे गटाच्या नेत्यांना अंगावर घेत आहेत त्यामुळे त्यांना सेनेतून कोणी रोखणार नाही. पण संविधानाच्या चौकटीतील हिंदुत्वाची व्याख्या त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचविता येईल का, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात सैन्यातीलऔरंगजेबाचे दिलेले उदाहरण आणि औरंगाबादच्या नावातील औरंगजेब या लांबपल्ल्याच्या गाडीतले हिंदूत्व नीट समजणारे नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेत कमी आहेत. या पोकळीत सुषमा अंधारे यांचे असणे अधिक ठसठशीतपणे पुढे येत आहे.

एरवी परळी येथे शकलेल्या आणि नंतर पुणे येथे भटक्यांच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यां अंधारे यांना राज्याच्या राजकारणाची त्यातील कुरघोडयांची जाण आहे. प्रसंगी हिंदी, उर्दू शेर, भाषण करताना दोन शब्दांमधला पाॅज, मध्येच एखादं इंग्रजी वाक्य हे भाषण प्रभावी करण्यासाठी योग्यच असतं. आपले आदर्श लोकांच्या मनावर ठसवावे लागत असतात. त्या आदर्शांना आम्ही मानतो आहाेत हे वक्त्यालाही सांगायचं असतं.पुरोगामी विचारांच्या सुषमा अंधारेंना फुले,शाहू आंबेडकरांपासून ते प्रबोधनकारांपर्यंतचे विचार मांडता येऊ लागले आहेत हा बदल शिवसैनिक किती दिवसांमध्ये आपलासा करतील यावर अंधारेंसारख्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचे यशअपयश अवलंबून असणार आहे.