अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. अशात आता लोकसभा निवडणूकही जाहीर झाली आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना होण्याची शक्यता आहे. यावरून विविध राजकीय चर्चाही रंगू लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या तीन वेळा खासदार राहिल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे अजित पवार यांच्याकडून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचे नाव निश्चित झालेले नाही, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. त्या बारामतीतील विविध सभांना हजेरी लावत आहेत.

हेही वाचा – विदर्भातील पाच जागांवर भाजपपुढे थेट लढतीचे आव्हान

या प्रचारादरम्यानच सुप्रिया सुळे यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. त्यांची ही मुलाखत खालीलप्रमाणे :

प्रश्न १ : तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडणूक लढवली, यावेळी वेगळं काय?

उत्तर : यंदाची लढाई वैयक्तिक आहे. यापूर्वीच्या निवडणुका कधीही वैयक्तिक झालेल्या नव्हत्या. मात्र, आता विरोधकांनी ही लढत वैयक्तिक केली आहे.

प्रश्न २ : या निवडणुकीत तुमच्यादृष्टीने सर्वात कठीण बाब कोणती?

उत्तर : माझ्यावर ज्याप्रकारे वैयक्तिक हल्ले सुरू आहेत, त्याचं थोडं दु:ख आहे. मी कधीही कोणावर अशाप्रकारे वैयक्तिक हल्ले केलेले नाहीत. मी अशाप्रकारे कधीच राजकारण करत नाही. माझं राजकारण वैचारिक राहिलं आहे. ज्यावेळी मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करते, तेव्हा माझा विरोधात हा त्यांच्या विचारसरणीला असतो. खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघात माझी लढत ही भाजपाशी आहे, असं मी मानते. त्यांना माझ्याविरोधात लढण्यासाठी पवार कुटुंबातील सदस्यच मिळाला. कारण माझ्या विरोधात लढेल, अशा एकही नेता त्यांच्याकडे नाही.

प्रश्न ३ : बारामतीत सध्या ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना रंगताना दिसतोय, याचे राजकीय परिणाम म्हणून कसं बघता?

उत्तर : बारामतीत अशाप्रकारे सामना होणं, हे दुर्दैवी आहे. खरं तरं याच्याशी माझा आणि माझ्या वहिणींचा काहीही संबंध नाही. गेल्या ३३ वर्षांत आमच्यात कधीही मतभेद झालेले नाहीत. आम्ही कधीही एकमेंकांच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही. काही दिवसांपूर्वीच आमची भेट झाली. त्यावेळी आम्ही मनसोक्त गप्पा मारल्या. मात्र, त्यांना अशाप्रकारे राजकारणात आणणं योग्य नाही, त्या राष्ट्रवादीच्या राजकारणात कधीच नव्हत्या. विरोधकांनी आता राजकारणात आणून ‘पवार विरुद्ध पवार’ असा संघर्ष निर्माण केला.

हेही वाचा – दिंडोरीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांविरोधात मविआकडून शिक्षक मैदानात

प्रश्न ४: आज तुमच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान कोणते?

उत्तर : माझ्यादृष्टीने लोकांपर्यंत पाणी पोहोचवणं, हे सर्वात मोठं आव्हान आहे. महाराष्ट्र आज पाणीटंचाईचा सामना करतो आहे. माझ्या मतदारसंघात दोन धरणांत पाणी नाही. ही माझ्यासाठी खरी चिंतेची बाब आहे. ही निवडणूक जनतेच्या विकासासाठी आहे, कुटुंबासाठी नाही. मात्र, अजित पवारांनी ही लढत कौटुंबित पातळीवर नेऊन ठेवली आहे. हे दुर्दैवी आहे.

प्रश्न ५ : अजित पवारांनी बारामतीत केलेल्या कामाचा फायदा तुम्हाला झाला, असं काही लोक म्हणतात, याबाबत काय सांगाल?

उत्तर : अजित पवार आणि माझी कामे वेगवेगळी होती. मी त्यांच्या कामात कधीही हस्तक्षेप केला नाही. संसदेत ज्यावेळी मंत्री उत्तर द्यायचे, तेव्हा ते अनेकदा मी मांडलेल्या मुद्द्यांचा संदर्भ देत होते. खरं तर बारामतीत झालेले काम हे कोण्या एका व्यक्तीने केलेले नाही. ते एक टीमवर्क होते.

प्रश्न ६: महाराष्ट्रात पाच टप्प्यातील निवडणूक होणार आहे, कसं बघता?

उत्तर : हे खरं आहे, की राज्यात पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. ५० दिवस राजकीय प्रचार सुरू राहिल. मात्र, ५० दिवस तुम्ही सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा प्रचार करू शकत नाही. लोकांना आता याचा कंटाळा आला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule interview on baramati pawar vs pawar fight in loksabha election read out spb
First published on: 01-04-2024 at 10:47 IST