बिपीन देशपांडे

छत्रपती संभाजीनगर : बीडमधील चार तालुक्यांतील शिवसेनेतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या संघटनेतील हस्तक्षेपाला कंटाळून सामूहिक राजीनामा दिला. त्याला आता महिना उलटत आला आहे. याबाबत संघटनेकडून कोणताही निर्णय न घेऊन शिवसैनिकांना एकप्रकारे बेदखल करत अंधारे यांनाच बळ दिल्याचा संदेश गेला आहे. राजीनामा देणाऱ्यांची हकालपट्टीच होईल, अशी चर्चा सुरू असून, तीच ‘अपेक्षा’ ठेवून ‘मोकळे’ होण्यासाठी शिवसैनिक संभाव्य निर्णयाकडे डोळे लावून आहेत.

बीड जिल्हाप्रमुखपदी अलीकडेच सुषमा अंधारे यांचे नातेवाईक असलेले रत्नाकर शिंदे यांची फेरनियुक्ती झाली आहे. शिंदे यांच्याशी संबंधित व्यवसायावर पोलिसांनी छापा मारून गंभीर स्वरूपाच्या कलमांन्वये गुन्हा दाखल केल्याचे प्रकरण चर्चेत आले होते. या प्रकरणानंतर शिंदे यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आले. त्यात काही दिवसांचाच अवधी गेल्यानंतर पुन्हा रत्नाकर शिंदे यांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. तत्पूर्वी परळीतील एक नाव जिल्हा प्रमुखपदासाठी पुढे आले होते. त्या नावावर पक्षप्रमुखांनीही शिक्कामोर्तब केले होते. परंतु ते नाव जाहीर करण्यासाठीचे पत्र मुखपत्र कार्यालयापर्यंत जाईपर्यंतच सूत्रे फिरली आणि ऐनवेळी पुन्हा शिंदे यांचे नाव जाहीर झाले.

आणखी वाचा-आमदार विश्वजित कदम यांची कोंडी करण्याची भाजपची व्यूहरचना

गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर पक्षानेच हटवलेले पुन्हा जिल्हा प्रमुखपदी आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना लोकांपुढे कसे जायचे, या भूमिकेतून परळी, अंबाजोगाई, केज व वडवणी या चार तालुक्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी २ डिसेंबर रोजी सामूहिक राजीनामा पक्षाकडे पाठवण्याचा निर्णय माध्यमांसमोर जाहीर केला. अंधारे यांच्या हस्तक्षेपावर नाराजीही व्यक्त केली. त्याला आता महिना होत आला असून अद्याप त्यावर संघटनेकडून निर्णय घेण्यात आला नाही.

आणखी वाचा-२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा ‘न्याय योजना’? काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संघटनेत अनेक वर्षे काम केलेल्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले, की दिवाकर रावते हे वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते तेव्हा नेता बदलण्याविषयीची एक वेळ आली होती. तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते, की संघटनेच्या नियुक्त्यांमध्ये आपण हस्तक्षेप करत नाहीत. परंतु तो बाळासाहेबांच्या शिवसेनेतला नियम होता, आजच्या संघटनेतला नाही. आता सर्व कॉर्पोरेट झाले आहे. शाखा कागदांवर चालतात. प्रत्यक्षात काही नाही. अंधारेंबाबत आमचा रोष नाही. त्यांनी उपनेत्या, नेत्या व्हावे, पण संघटनेत पक्षप्रमुखांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करू नये. केवळ त्यांचे नातेवाईक म्हणून रत्नाकर शिंदे यांची फेरनियुक्ती होते आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असतानाही त्याकडे वरिष्ठ स्तरावरून दुर्लक्ष होते, हे शिवसैनिकांना न पटणारे असून, राजीनामा दिल्यापासून एकाही मोठ्या नेत्याने कार्यकर्त्यांची सोडाच, पण तीन-चार दशकांपासून कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशीही संपर्क केला नाही. राजीनामा दिलेल्यांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक पदाधिकारी हे घरी बसतील, पण अन्य पक्षांत जाणार नाहीत. आम्ही अत्यंत कडवट शिवसैनिक आहोत. आता पक्षालाही आमची गरज वाटत नसावी. राजीनाम्याची दखल तर घेतली नाहीच, उलट हकालपट्टी करू, असे इशारे काही जणांना आले आहेत. त्यावरून आम्हाला हकालपट्टीचीच अपेक्षा आहे, असे संबंधित पदाधिकाऱ्याने सांगितले.