तमणगोंडा रवि पाटील : ग्रामीण विकासासाठी वचनबद्ध | Tammangouda Ravi Patil Committed for rural development | Loksatta

तमणगोंडा रवि पाटील : ग्रामीण विकासासाठी वचनबद्ध

राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की ज्यांना कसलीही पार्श्वभूमी नाही. या अशा काही तरूण, आश्वासक पहिल्या पिढीच्या सर्व पक्षीय राजकारण्यांचा परिचय करून देणारी ही विशेष मालिका.

तमणगोंडा रवि पाटील : ग्रामीण विकासासाठी वचनबद्ध
तमणगोंडा रवि पाटील : ग्रामीण विकासासाठी वचनबद्ध

दिगंबर शिंदे

सांंगली : कर्नाटक सीमलगत असलेल्या जत तालुक्याच्या पूर्व भागातील ४० गावांबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सवाल उपस्थित केल्यानंतर हा भाग चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कन्नड भाषिक असले तरी मराठी मातीशी अर्धशतकाहून अधिक काळ नाळ जुळलेल्या या भागात अस्वस्थता असली तरी ही केवळ पाण्याचा प्रश्न मिटावा, विकासाची संधी मिळावी याच मुद्द्यावर आहे. या भागातील उच्च विद्याविभूषित असलेले भाजपचे ३९ वर्षीय तमणगोंडा रवि पाटील हे आश्वासक नेतृत्व आहे. त्यांनी जिल्हा परिषदेत शिक्षण व आरोग्य समितीचे सभापतीपद सांभाळले. जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून काम करीत असताना लोकविकासाची कामांचा आग्रह धरलाच, पण याचबरोबर वंचित गावासाठी हक्काचे पाणी मिळावे यासाठी राजकीय पातळीवर सुरू असलेला संघर्ष कायम तेवत ठेवला. वंचित ४८ गावे आणि अंशत: वंचित असलेली १७ गावे अशा ६५ गावांसाठीचा पाण्याचा लढा कायमपणे आग्रहाने मांडत न्याय मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे.

हेही वाचा… संदेश सिंगलकर : चळवळीतून राजकारणात

आरोग्य व शिक्षण विभागाचे सभापती म्हणून काम करत असताना प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यक्षम व्हावीत यासाठी जिल्हा परिषदेच्या व्यासपीठावरून आग्रह धरून आज जो आरोग्य केंद्राचा चेहरामोहरा बदलेला दिसतो. तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आठ उपकेंद्रे कार्यान्वित करून आरोग्य सेवा गावपातळीपर्यंत पोहचण्यास मदत झाली. यासाठी सुमारे पंधरा कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला. याशिवाय या भागातील शाळा दुरुस्तीचा असलेला पूर्ण अनुशेष आज संपुष्टात आला असून शाळांचे सुशोभीकरण करण्याबरोबरच डिजिटल शिक्षण ग्रामीण भागात मिळावे यासाठी प्रयत्न केले. यामागे तमणगोंडा यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरते. सीमावर्ती भागात शैक्षणिक सुविधा अधिकाधिक मिळाव्यात, शिक्षकाअभावी शाळा रित्या ठरू नयेत यासाठी अतिरिक्त शिक्षक नियुक्तीची मागणी करून ते रेटण्याचे काम सभापती या नात्याने त्यांनी केले. यामुळे या भागातील शिक्षण सुविधा सुस्थितीत आणण्यास त्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.

हेही वाचा… सचिन पाटील : कर्तव्यदक्ष लोकसेवक

केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे. पैशाअभावी अनेक घरांतील विवाह लांबणीवर प्रसंगी रद्द केले जाण्याचे प्रसंग घडतात. हे टाळण्यासाठी त्यांनी सर्वच जाती-जमातीसाठी सामूहिक विवाहाची संकल्पना अमलात आणली. तसेच बालगावमध्ये एक लाखाहून अधिक लोकांच्या सहभागाने झालेल्या योग शिबिराची जागतिक पातळीवर नोंद झाली. या शिबिराचे नियोजन करण्यात वाटा उचलला आहे. बेंगलोर विद्यापीठातून व्यवस्थापन शास्त्रातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण झाले असल्याने आधुनिक काळाशी नाते जपत गावच्या विकास सोसायटीचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख कसा करता येईल, सोसायटी सभासद कर्जबाजारी न होता, त्याची पत कशी वाढविता येईल यासाठीचे आर्थिक नियोजन कसे करता येईल याचे धडे ते देत असतात.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 10:14 IST
Next Story
Himachal Result 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये बहुमत मिळालं, पण काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी तीन बड्या नेत्यांमध्ये रस्सीखेच