छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीमध्ये काठावर विजय मिळविल्यानंतर आपल्याच मतदारांवर नाराज असणाऱ्या तानाजी सावंत यांनी मतदारसंघात अतिवृष्टीनंतर फक्त दोन दौरे केले. त्यानंतर ते पुन्हा नगरपालिका निवडणुकीमध्ये सक्रिय झाले असून त्यांनी भूम आणि परंडा या दोन्ही नगरपालिकेमध्ये स्वतंत्र ताकद लावली आहे. त्याला विरोध करण्यासाठी अन्य सर्व पक्षही एकवटले आहेत. त्यामुळे या दोन्ही नगरपालिकांमध्ये तानाजी सावंत विरुद्ध सारे असे चित्र निर्माण झाले आहे.

भूम पालिका निवडणुकीमध्ये आमलप्रभू विकास आघाडीचे प्रमूख म्हणून संजय गाढवे यांनी नेतृत्व करण्याचे ठरविले असून त्यांच्या पाठिशी तानाजी सावंत उभे राहिले आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तानाजी सावंत आवर्जून हजर होते. त्याला विरोध करण्यासाठी सर्व पक्षीय नेते एकत्रित आले आहेत. त्यात अगदी भाजप नेत्यांचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. अशी स्थिती परंडा नगरपालिकेतही आहे. परंडा नगरपालिकेत जाकीर सौदागर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असून त्यांच्या समर्थनार्थ तानाजी सावंत उतरले आहेत. तर सर्वपक्षीय नेत्यांनी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव विश्वजीत पाटील यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

तानाजी सावंत विरुद्ध सारे असे चित्र असून यात भाजपचे नेतेही सहभागी आहेत. भाजपचे निवडणूक प्रमूख सुजितसिंह ठाकूर हे मूळ परंडा येथील रहिवासी आहेत. त्यामुळे या निर्णयामुळे तेही सहभागी असल्याचे सांगण्यात येते. परंडा नगराध्यक्ष पद हे इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी राखीव आहे. विश्वजीत पाटील यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असल्याने ते छाननीत टिकते का, याची उत्सुकता सर्वत्र आहे.

तानाजी सावंत यांनी काही दिवसापूर्वी ‘ एकला चलो रे’ चा नारा दिला होता. प्रसंगी राज्य पातळीवरही महायुतीमध्येही बदल करण्या इतपत पुढे जाऊ असा इशारा त्यांनी दिला होता. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्ह्याचे नेतृत्व आपल्याकडे असावे असे त्यांचे प्रयत्न नेहमी असतात. मात्र, पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक काम करत असल्याने तानाजी सावंत यांनी भूम आणि परंडा या नगरपालिकेच्या राजकारणात लक्ष घातले आहे. त्याला सर्व पक्षीय नेते विरोध करत आहेत. भूम पालिकेच्या राजकारणात नव्यानेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेणाऱ्या राहुल मोटे यांनी लक्ष घातले आहे. स्थानिक स्वराज स्ंस्थांच्या निवडणुकांमध्ये तानाजी सावंत विरुद्ध सारे असे चित्र या दोन्ही पालिका निवडणुकीतून उभे करण्यात आले आहे.