Mohammad Azharuddin Telangana Minister : भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी शुक्रवारी तेलंगणा सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी अझहरुद्दीन यांना मंत्रिपदाची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.अझरुद्दीन यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने काँग्रेस सरकारमधील मंत्र्यांची संख्या आता १६ झाली आहे. अजूनही दोन मंत्रिपदे रिक्त असल्याने त्यावर कुणाची वर्णी लागणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून आहे. दरम्यान, अझरुद्दीन यांची मंत्रिपदी वर्णी लागताच भाजपाने काँग्रेसवर टीकेचा भडिमार केला आहे. नेमके काय आहे त्यामागचे कारण? जाणून घेऊ…

तेलंगणा सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री

२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत मोहम्मद अझरुद्दीन यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांना विधान परिषदेवर घेतले होते. तेलंगणामधील सरकारमध्ये एकाही मुस्लीम मंत्र्यांचा सहभाग नव्हता. अझरुद्दीन यांच्या शपथविधीमुळे ही पोकळी भरून निघाली आहे. येत्या ११ नोव्हेंबर रोजी तेलंगणातील जुबली हिल्स विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. भारत राष्ट्र समितीचे आमदार मागंती गोपीनाथ यांच्या जूनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या ३० टक्के असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपाची काँग्रेस सरकारवर टीका

मोहम्मद अझरुद्दीन यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने काँग्रेसला या निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी बांधला आहे. मोहम्मद अझरुद्दीन यांनी मात्र मंत्रिपदावरील नियुक्ती आणि जुबली हिल्स पोटनिवडणूक यांचा संबंध असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे अझरुद्दीन यांना मंत्रिपद मिळताच भाजपाने काँग्रेस सरकावर टीकेचा भडिमार केला आहे. आगामी पोटनिवडणुकीत अल्पसंख्याकांच्या मतपेढीला आकर्षित करण्यासाठी काँग्रेस सरकारची ही चाल असल्याचे भाजपाने म्हटले आहे. जुबली हिल्समध्ये मुस्लीम मतदारांमध्ये आपली स्थिती मजबूत करण्यासाठी हे मंत्रीपद दिल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

आणखी वाचा : नितीश कुमार यांचा शिंदे होणारच नाही; महाराष्ट्राचा दाखला देत आरजेडीच्या नेत्याने काय सांगितले?

अझरुद्दीन यांचे भाजपाला प्रत्युत्तर

मंत्रिमंडळ विस्ताराची वेळ पोटनिवडणूक प्रचाराशी जवळून जोडलेली असल्याची टीकाही भाजपाने केली आहे. विरोधकांच्या टीकेला मोहम्मद अझरुद्दीन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “माझ्या शपथविधीचा आणि जुबली पोटनिवडणुकीशी काहीही संबंध नाही. या दोन्ही वेगळ्या बाबी आहेत आणि त्यांचा संबंध जोडला जाऊ नये. भाजपाचे नेते काहीही बोलू शकतात. मला कोणाकडूनही देशभक्तीच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही”, असे अझरुद्दीन यांनी स्पष्ट केले आहे. पक्षश्रेष्ठींचे आणि आपल्या समर्थकांचे आभार मानताना मिळालेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न असेन, अशी ग्वाहीदेखील अझरुद्दीन यांनी दिली.

मुस्लीम मतदारांची भूमिका ठरणार निर्णायक

एकंदरीत अझरुद्दीन यांच्या मंत्रीपदाच्या नियुक्तीवरून तेलंगणाचे राजकारण तापले असून सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघात एकूण अंदाजे तीन लाख ९० हजार इतके मतदार आहेत. त्यापैकी जवळपास सव्वा लाख मतदार मुस्लीम असल्याचे सांगितले जात आहे. कोणत्याही निवडणुकीत हे मतदार निर्णायक भूमिका बजावत असल्याने त्यांना मोठे महत्व प्राप्त आहे. म्हणूनच, अझरुद्दीन यांना मंत्रिपद देऊन काँग्रेसने या समुदायावरील आपली पकड आणखीच मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपाने कुणाला दिली उमेदवारी?

विशेष बाब म्हणजे, जुबली हिल्स मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या जास्त असूनही कोणत्याही राजकीय पक्षाने पोटनिवडणुकीत अल्पसंख्याक उमेदवाराला तिकीट दिले नाही. भारत राष्ट्र समितीने या निवडणुकीत मांगती सुनीता गोपीनाथ यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने वल्लाला नवीन आणि भाजपाने दीपक रेड्डी यांना रिंगणात उतरवले आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत मोहम्मद अझरुद्दीन यांनी जुबली हिल्स मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, परंतु भारत राष्ट्र समितीच्या उमेदवाराने त्यांचा १६,३३७ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत मागंती गोपीनाथ यांना ८० हजार ५४९ मते मिळाली; तर अझरुद्दीन यांना ६४,२१२ मतांवरच समाधान मानावे लागले होते.

हेही वाचा : Ranjitsinh Naik Nimbalkar : महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून रणजितसिंह निंबाळकर का अडचणीत आले?

तेलंगणात काँग्रेसचे बहुमतात सरकार

२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ११९ पैकी ६४ जागा जिंकून राज्यात बहुमतात सत्तास्थापन केली; तर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला केवळ ३९ जागाच जिंकता आल्या. या निवडणुकीत भाजपाचे आठ, एआयएमआयएमचे सात आणि सीपीआयच्या एका आमदाराने विजय मिळवला होता. दरम्यान अझरुद्दीन यांनी २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर मुरादाबाद येथून लोकसभा निवडणूक जिंकली होती. नंतर त्यांनी २०१४ मध्ये राजस्थानमधील टोंक-सवाई माधोपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २०१८ मध्ये त्यांना तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते.