विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपासह काँग्रेस पक्षाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात आहे. भाजपाने तर दिल्लीतील नेत्यांना या निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. शनिवारी (११ नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली.
उपजातींचे वर्गीकरण करण्यासाठी समितीची स्थापना करू
माडिगा रिझर्वेशन पोराता समितीने (एमआरपीएस) मोदी यांच्या या सभेचे आयोजन केले होते. या सभेच्या माध्यमातून दलित मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. या सभेत बोलताना मोदी यांनी तेलंगणात अनुसूचित जातींमधील उपजातींचे वर्गीकरण करण्यासाठी एका समितीची स्थापना केली जाईल, असे आश्वासन दिले. बीआरएस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी अनुसूचित जातीतील लोकांना काहीही दिले नाही. आम्ही मात्र त्यांनी केलेल्या अन्यायाला दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे मोदी म्हणाले. गेल्या अनेक वर्षांपासून एमआरपीएसकडून अनुसूचित जातीतील उपजातींचे वर्गीकरण करावे, अशी मागणी केली जात आहे. मोदी यांनी अनुसूचित जातींतील उपजातींचे वर्गीकरण करण्याचे जाहीर केल्यानंतर एमआरपीएसचे प्रमुख मंदा कृष्णा मडिगा भावुक झाले होते.
“उपेक्षित समाजातील गरिबी दूर करणे हा आमचा हेतू”
“बीआरएस आणि काँग्रेस हे पक्ष दलितविरोधी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निवडणुकीत काँग्रेसमुळेच दोन वेळा पराभव झाला होता. मात्र, सबका साथ, सबका विकास असे आमचे धोरण आहे. याच धोरणानुसार आम्ही मडिगा समुदायाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. उपेक्षित समाजातील गरिबी दूर करणे हा भाजपाचा एकमेव हेतू आहे”, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
“तुम्हाला काहीही मागण्यासाठी आलेलो नाही”
“मला मडिगा समाजातील माझ्या बांधवांना सांगायचे आहे की, मी येथे तुम्हाला काहीही मागण्यासाठी आलेलो नाही. तुमच्यावर आतापर्यंत जो अन्याय झालेला आहे, त्याला दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, हे सांगण्यासाठी मी येथे आलो आहे. तेलंगणा राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी केली जात होती तेव्हा काँग्रेसने विरोध केला होता. त्यानंतर अनेकांनी बलिदान दिल्यानंतर या राज्याची स्थापना करण्यात आली. आता बीआरएस पक्षाचे नेते तुम्हाला विसरले आहेत. तेलंगणा राज्याची निर्मिती करण्याची मागणी केली जात होती, तेव्हा एखाद्या दलित नेत्याला राज्याचे मुख्यमंत्री केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, तेलंगणाची निर्मिती झाल्यानंतर चंद्रशेखर राव हे आश्वासन विसरून गेले. ते स्वत:च मुख्यमंत्री झाले. त्यांनी दलित लोकांच्या स्वप्नांचा चुराडा केला”, अशी टीकाही मोदी यांनी केली.
केंद्र सरकार लक्ष घालणार : नरेंद्र मोदी
चंद्रशेखर राव यांनी दलितांना तीन एकर शेतजमीन तसेच दलित बंधू योजनेअंतर्गत दलितांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, जे लोक बीआरएस पक्षाशी संबंधित आहेत, त्यांनाच या योजनांचा लाभ देण्यात आला. एमआरपीएसचे प्रमुख मंदा कृष्ण मडिगा हे गेल्या अनेक दिवसांपासून अनुसूचित जातींतील उपजातींचा शोध घेण्याची मागणी करत आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ही मागणी केली जात आहे. मात्र, आता केंद्र सरकार या मागणीत लक्ष घालणार आहे, असेही मोदी यांनी सांगितले.