लक्ष्मण राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जालना : लागोपाठ सात निवडणुकांमध्ये काँग्रेसचा निभाव लागलेला नसल्याने जालना लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने आग्रह धरण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाचे जिल्ह्यातील एक प्रमुख पुढारी आणि माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी कार्यकर्त्यांच्या या मागणीस दुजोरा दिला असून या अनुषंगाने पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली असल्याचे सांगितले.

युतीमध्ये असताना जालना लोकसभा मतदारसंघ कायम भाजपकडे राहिलेला आहे. मागील नऊ लोकसभा निवडणुकांत १९९१ चा अपवाद वगळता या मतदारसंघातून भाजपचाच उमेदवार निवडून आलेला आहे. १९९६ पासून सलग सात निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे. १९९६ आणि १९९८ मध्ये झालेल्या निवडणुकांत भाजपकडून उत्तमसिंग पवार निवडून आले होते. तर १९९९ पासूनच्या सलग पाच निवडणुकांत भाजपचे रावसाहेब दानवे निवडून आलेले आहेत.

हेही वाचा >>> कोल्हापुरमध्ये राष्ट्रवादी थोरला की धाकटा भाऊ ?

गेल्या सात निवडणुकांमध्ये काँग्रेसने वेगवेगळे पाच उमेदवार दिले. परंतु उमेदवार बदलूनही त्यांना भाजपचा पराभव करता आला नाही. त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघ आणि भाजपचा विजय असे जणू काही समीकरणच मागील सात निवडणुकांपासून झालेले आहे. यापैकी १९९८ आणि २००९ मधील निवडणुका अटीतटीच्या आणि चुरशीच्या झाल्या होत्या. परंतु त्यामध्ये काँग्रेस पक्ष मात्र विजयाच्या मताधिक्यापर्यंत पोहोचू शकला नव्हता.

आता राजकीय समीकरण बदलले असून शिवसेना (उद्धव ठाकरे) महाविकास आघाडीत असल्याने भाजपच्या विरोधात म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत आहे. आतापर्यंत एकदाच म्हणजे काँग्रेसशी आघाडी नव्हती. त्यावेळी म्हणजे १९९९ मध्ये राष्ट्रवादीने जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली होती. त्यापैकी राष्ट्रवादीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता.

हेही वाचा >>> Maharashtra News Live: महिला कुस्तीपटूवरील कारवाईबाबत आदित्य ठाकरेंचं संतप्त ट्वीट, म्हणाले…

या अनुषंगाने शिवाजीराव चोथे यांनी ‘लोकसत्ता’स सांगितले की, आमचा पक्ष आता महाविकास आघाडीचा एक घटक असल्याने लोकसभा निवडणुकीत आम्ही साहजिकच भाजपच्या विरोधात असणार आहे. काँग्रेस पक्ष जालना लोकसभा मतदारसंघात सलग सात वेळेस भाजपकडून पराभूत झालेला असल्याने आगामी निवडणुकीत ही जागा महाविकास आघाडीत आपल्यासाठी सोडवून घ्यावी, अशी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. पक्षाचे अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते खासगीरीत्या या संदर्भात मते व्यक्त करीत असतात. पक्षाच्या दोन-तीन बैठकांमध्येही हा विषय चर्चेस आला होता. या संदर्भात पक्षातील काही वरिष्ठांशीही आपण बोललेले आहोत. परंतु ही सर्व चर्चा आमच्या पक्षातच मर्यादित आहे. जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांशी आमची अद्याप चर्चा झालेली नाही. योग्य वेळ आल्यावर जिल्ह्यातील अनेक घटक पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा होऊ शकेल.

हेही वाचा >>> राज्यातील लोकसभेच्या दोन जागा रिक्त पोटनिवडणुका बंधनकारक आहेत का?

सध्या आमच्या पक्षाचे (शिवसेना उद्धव ठाकरे) मराठवाड्यात आठपैकी परभणी आणि धाराशिव येथे लोकसभा सदस्य आहेत. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात तर आमच्याच पक्षाचा उमेदवार असेल. त्यासोबत जालना लोकसभा मतदारसंघही महाविकासा आघाडीने आमच्यासाठी सोडावा असे मत कार्यकर्ते व्यक्त करीत आहे. जालना लोकसभा मतदारसंघातील निम्मा भाग म्हणजे तीन विधानसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या दोन्हीही जिल्ह्यांच्या भागात शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) जाळे गावपातळीपर्यंत आहे. भाजपला पराभूत करण्याचा किंवा निवडून येण्याचा निकष लावला तर महाविकास आघाडीतल आमचा पक्षच त्यासाठी पात्र ठरू शकतो, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

२००९ मध्ये भाजपासोबत युती असतानाही शिवसेनेने ही जागा मागितली होती. जवळपास दीडशे गाड्यांमधून आमच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यासाठी शिवसेना भवन येथे गेले होते. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीतून जागा कोणत्या पक्षाने लढवावी याचा निर्णय तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील आणि आमच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शब्द मात्र अंतिम असेल असेही चोथे म्हणाले. आमच्या पक्षाकडे निवडणुकीसाठी एकापेक्षा अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावाही त्यांनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group insists jalna constituency congress candidate defeated seven times print politics news ysh
First published on: 30-05-2023 at 12:45 IST