दयानंद लिपारे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण नेतृत्व साखर उद्योगांमध्ये चमकू लागले आहे. सहकारी व खाजगी साखर कारखान्यांमध्ये संचालक मंडळात त्यांनी प्रभावी ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. तरुणांचे उमदे नेतृत्व या निमित्ताने सहकार क्षेत्राला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने मात्तबर घराण्यातील पुढच्या पिढीचा समावेश आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारी वैशिष्ट्यपूर्ण आहे. राज्यात सर्वाधिक साखर उतारा असणारा हा जिल्हा उसाला सर्वाधिक दर देण्यासाठीही प्रसिद्ध आहे. येथील साखर कारखानदारीला दीर्घ तितकीच वैभवशाली परंपरा आहे. जिल्ह्यातील अनेक कारखाने आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत. उसाची नियमित देयके देणारे, उस आणि भाग विकासाच्या योजना राबवणारे कारखाने म्हणूनही ते राज्यात प्रसिद्ध आहेत.

हेही वाचा: अमरावती जिल्हा बँकेच्या कारभारावरून राजकीय बाण; आमदार बच्चू कडू आक्रमक

साखर कारखानदारी मध्ये मागील दोन पिढ्यांनी आपले आपला नावलौकिक निर्माण केला आहे. प्रतिकूल परिस्थितीत साखर कारखानदारीचे बीजारोपण करून त्याचा वेलू वाढवण्याचे आव्हानात्मक काम त्यांनी केले आहे. त्यामध्ये तात्यासाहेब कोरे, रत्न्नाप्पांना कुंभार, डॉ. सा. रे. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील, दादासाहेब कौलकर, डी. सी. नरके, विक्रमसिंहराजे घाटगे, कल्लप्पाण्णा आवाडे, सदाशिवराव मंडलिक, अप्पासाहेब नलवडे, उदयसिंगराव गायकवाड, शामराव पाटील यड्रावकर, भगवानराव घाटगे आदींचा समावेश आहे. तर अलीकडच्या काळामध्ये आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आवाडे, समरजितसिंह घाटगे, गणपतराव पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार के. पी. पाटील, माधवराव घाटगे यांनी साखर कारखाना सक्षमपणे कसा चालायचा याचा मापदंड उभा केला आहे. वारणेचा रुतलेला गाडा बाहेर काढण्यासाठी विनय कोरे सर्वार्थाने प्रयत्न करीत आहेत.

नव्या पिढीची चुणूक

याच घराण्यातून साखर कारखानदारी नवीन नेतृत्व दमदारपणे उभे राहत आहे. घराण्याचा वारसा असला तरी कारखानदारी व्यावसायिक, आधुनिक पद्धतीने चालवून आणि नवनवे उप उत्पादने घेवून उद्योग आर्थिक स्थिर करण्याबरोबर उस उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळावा असा दृष्टीकोन त्यांनी अंगिकारला आहे. कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्याची सूत्रे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी पुत्र माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडे सोपवली आहेत. कोल्हापूरचे विश्वराज धनंजय महाडिक यांच्याकडे सोलापूर जिल्ह्यातील भीमा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची मदार आली आहे. जिल्ह्यात दोन खाजगी कारखाने मोठा संघर्ष करीत उभारले गेले. कागल तालुक्यात हसन मुश्रीफ यांनी सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना सुरु केला असून त्यांचे पुत्र नवीद मुश्रीफ यांनी अध्यक्ष म्हणून चुणूक दाखवून दिली आहे. शिरोळ तालुक्यात माधवराव घाटगे यांनी श्री गुरुदत्त कारखाना उभारला. त्यांची मुले कार्यकारी संचालक राहुल व धीरज यांनी नेतृत्व सांभाळले आहे. याच तालुक्यातील राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे पुत्र आदित्य यांनी शरद साखर कारखान्याचे नेतृत्व प्रभावीपणे हाताळले आहे.

हेही वाचा: राहुल पंडित : रत्नागिरीच्या राजकारणातला सुशिक्षित, सुसंस्कृत चेहरा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लगतच्या हातकणंगले तालुक्यातील कल्लप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याने राज्यातील तीन वर्षात सरासरी सर्वाधिक गाळप करणारा कारखाना अशी प्रतिमा उभी केली आहे. आमदार प्रकाश आवाडे यांच्या बरोबरीने त्यांचे पुत्र जिल्हा परिषद माजी सदस्य राहुल आवाडे यांनी कारखान्याच्या केन कमिटीचे सभापती म्हणून प्रभाव निर्माण केला आहे. खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक हे सदाशिवराव मंडलिक हमीदवाडा कारखान्याचे संचालक आहेत. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड पुत्र रणवीर गायकवाड हे दुसऱ्यांदा उदयसिंगराव गायकवाड शाहूवाडी कारखान्याचे संचालक बनले आहेत. तर, राजकीय पार्श्वभूमी नसतानाही शिवसेनेचे जिल्हा सहप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी अध्यक्ष म्हणून आजरा कारखान्याच्या डोलारा सांभाळण्यासाठी उल्लेखनीय हालचाली सुरू केल्या आहेत. हेच युवा नेते आगामी काळात राजकीय पटलावर चमकत राहतील अशी त्यांची वाटचाल दर्शवते.