पदयात्रा आणि निदर्शनांपासून दूर राहणाऱ्या बहुजन समाज पक्षानेदेखील आता यात्रा काढण्याचा मार्ग स्वीकारला आहे. राजस्थानमध्ये १४ दिवसांच्या “सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय संकल्प यात्रे”चे आयोजन करण्यात आले आहे. बहुजन समाज पक्षात हा बदल झाला तो मायावती यांचा भाचा आकाश आनंदमुळे. दीर्घ पदयात्रा आणि आकाश आनंदचा वाढता सहभाग लक्षात घेता, या वर्षअखेरीस होत असलेल्या राजस्थान विधानसभा आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची नांदी यानिमित्ताने दिसून येत आहे. तसेच बहुजन समाज पक्ष नव्या चेहऱ्यासह स्वतःला पुढे आणत असल्याचेही हे चित्र आहे.

मागच्यावर्षीपासून आनंद राजस्थानमधील पक्ष संघटनेत लक्ष घालत आहेत. पक्ष संघटनेची ताकत आणि पक्षाचा विस्तार चाचपडण्याचा प्रयत्न आनंद यांनी केला होता. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी अलवर येथे १३ किमी लांबीची पदयात्रादेखील काढली होती. तेव्हापासून आनंद मायावती यांचे राजकीय वारसदार असतील असे बोलले जात आहे. आकाश यांना बीएसपीचे राष्ट्रीय समन्वयक पद अधिकृतरित्या देण्यात आले आहे. राजस्थानमधील आपल्या पदयात्रेत ते तीन हजार किमी प्रवास करणार असून १०० विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे. या १०० जागांमध्ये २०१८ साली बसपाने जिंकलेल्या सहा जागांचाही समावेश आहे. बसपाच्या सर्व उमेदवारांनी निकालानंतर काँग्रसेमध्ये प्रवेश केला. नऊ जागांवर बसपाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. ढोलपूर येथून निघालेली संकल्प यात्रा २९ ऑगस्ट रोजी जयपूर येथे समाप्त होईल.

Hathras stampede Bhole Baba has divided major parties in Uttar pradesh
हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी ‘भोले बाबा’वर आरोप का नाही? काँग्रेस-बसपा आक्रमक; भाजपा-सपाचा सावध पवित्रा
Shiv Sena s chandrakant Raghuvanshi, chandrakant Raghuvanshi, chandrakant raghuvanshi wanted Candidacy for Dhule City, Maharashtra assembly election 2024, Dhule,
चंद्रकांत रघुवंशी यांची धुळ्यातून लढण्याची तयारी, स्थानिक इच्छुकांमध्ये चलबिचल
Poor quality of 15 road works in Pimpri Chief Minister Eknath Shinde confession
पिंपरीतील १५ रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कबुली
Dr Madhav Kinhalkar, Dr Madhav Kinhalkar Resigns from BJP, Dr Madhav Kinhalkar next political decision, Bhokar Assembly constituency, nanded, sattakaran article, Maharashtra vidhan sabha election 2024,
सूर्यकांता पाटील यांच्यापाठोपाठ माधव किन्हाळकर यांचाही भाजपाला रामराम
ganesh naik marathi news
मंदा म्हात्रे यांच्या कार्यक्रमाला गणेश नाईक समर्थकांची दांडी
Bhagirath Bhalke meet Sharad Pawar
भगीरथ भालके शरद पवारांच्या भेटीला, घरवापसीच्या चर्चांना उधाण, पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार?
Ajit Pawar vilas lande
अजित पवारांच्या चिंता वाढली? आमदार विलास लांडे शरद पवारांच्या संपर्कात? जवळचा मित्र म्हणाला, “त्या भेटीनंतर…”
uttar pradesh stampede at religious event
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी; ८७ जणांचा मृत्यू; तीन चिमुकल्यांसह महिलांचाही समावेश

राजस्थान बसपा अध्यक्ष भगवान सिंह बाबा म्हणाले, “मिरवणुकीच्या स्वरूपात ही यात्रा निघणार असून ३३ जिल्ह्यांतून यात्रा प्रवास करेल. आकाश आनंद यात्रा सुरू करणार असून त्यानंतर विविध ठिकाणी ते यात्रेत उपस्थित राहतील.”

ढोलपूर येथे बोलत असताना आकाश यांनी काँग्रेसवर टीकास्र सोडले. “राजस्थानचे काँग्रेस सरकार समाजविरोधी आहे. काँग्रेस सरकारने बेरोजगार युवकांना ३,५०० चा महागाई भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते, तसेच लाखो युवकांना रोजगार, गरिबांना स्वस्तात गॅस आणि महिलांना मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. पण, त्यांचे एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. निवडणूक येताच पुन्हा एकदा काँग्रेस नेते येतील आणि तुम्हाला नवे आश्वासन देतील. यावेळी तुम्ही खोट्या आश्वासनापासून सांभाळून रहा”, अशा शब्दात आकाश यांनी काँग्रेसवर आरोप केले.

आकाश पुढे म्हणाले, “मी तुम्हाला सावध करण्यासाठी आलो आहे. काँग्रेस असो वा भाजपा, दोन्ही एकच आहेत. २०१४ साली मतदानासाठी लोकांची फसवणूक केली गेली. आज संपूर्ण देशभरातील लोक महागाई आणि बेरोजगारीने होरपळून निघाले आहेत. जे लोक २०१४ पूर्वी रस्त्यावर उतरून गॅस सिलिंडर महागल्याबद्दल घोषणा देत होते, ते आज पेट्रोलचे दर वाढले तरी शांत आहेत.”

फक्त राजस्थानच नाही, तर ज्या ज्या राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत, त्या मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्यातही आकाश बहुजन समाज पक्षाच्या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जून महिन्यात मायावती यांनी आकाश आनंद आणि राज्यसभेचे खासदार रामजी गौतम यांना निवडणुका होत असलेल्या राज्यांची जबाबदारी दिली होती. या राज्यातील दलित, धार्मिक अल्पसंख्याक, इतर मागासवर्गीय आणि आदिवासी जमातीचे प्रश्न एकत्रित करून त्यावरून प्रचाराची रणनीती ठरविण्यास सांगण्यात आले होते.

९ ऑगस्ट रोजी आकाश यांच्या नेतृत्वाखाली भोपाळ येथे मोर्चा काढून राज भवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला गेला. वंचित समाजाला उपेक्षित ठेवले गेल्याचा आरोप करून सदर आंदोलन करण्यात आले असल्याचे बसपाचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष रमाकांत पिप्पल यांनी सांगितले. मध्य प्रदेशमध्ये पक्षाने सात विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार घोषित केले आहेत. मागच्या काही महिन्यांपासून आकाश राज्याचा दौरा करत असून अनेक ठिकाणी त्यांनी संघटनात्मक बैठकाही घेतल्या आहेत, अशी माहिती पिप्पल यांनी दिली. आपली आत्या आणि पक्षातील कार्यकर्ते यांच्यातील दुवा बनण्याचे काम आकाशकडून केले जात आहे. पिप्पल म्हणाले की, आकाशच्या नेतृत्वाखाली आम्ही मध्य प्रदेशमधील ८० विधानसभा मतदारसंघातून २६ एप्रिल ते १ ऑगस्टपर्यंत यात्रा काढली होती.

“बहनजी लखनऊ आणि दिल्लीत बसून पक्ष संघटना आणि प्रचाराच्या रणनीतीचा आढावा घेत आहेत. त्या निवडणुकीच्या वेळी दौरे करतील. निवडणुकीच्या आधी आकाश विविध राज्यांमध्ये फिरून प्रचाराची धुरा सांभाळत आहेत, तसेच निवडणुकांची तयारी करत आहेत. आकाशच्या नेतृत्वाखाली बसपा आता रस्त्यावरदेखील उतरत आहे”, अशी प्रतिक्रिया बसपाच्या एका नेत्याने दिली. बहुजन समाज पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवून ठेवण्यासाठी विविध राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविणे हा पक्षाचा मुख्य हेतू आहे.

बसपामध्ये आंदोलनाची संस्कृती नाही

मायावती यांच्या नेतृत्वाखालील बसपा पक्ष कधीही रस्त्यावर उतरत नव्हता. जुलै २०१६ मध्ये बसपाने शेवटचे आंदोलन केले होते. भाजपाचे नेते दयाशंकर सिंह यांनी बसपा प्रमुख मायावती यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस नसीमुद्दीन सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. सिद्दीकी सध्या काँग्रेसमध्ये आहेत आणि दयाशंकर सिंह योगी सरकारमध्ये मंत्री आहेत.

बसपातील सूत्रांनी सांगितले की, आकाशने मोठी झेप घ्यावी यासाठी मायावती त्याला तयार करत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये २०२२ साली विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मायावती यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले होते की, त्या आकाशला विविध राज्यांत पाठविणार आहेत. तरुणांना प्रोत्साहित करणे आणि पक्षाच्या कार्याबद्दल अहवाल सादर करण्याचे काम आकाश करेल, असे त्या म्हणाल्या. आकाश हा मायावती यांचा लहान भाऊ आनंद कुमार यांचा मुलगा आहे. सप्टेंबर २०१७ साली मायावती यांनी दोघांनाही पक्षात आणून त्यांची ओळख करून दिली होती. काही महिन्यांनंतर २०१८ साली जेव्हा उत्तर प्रदेशच्या निवडणुका झाल्या, तेव्हा भाजपाने बहुमत घेऊन सत्ता स्थापन केल; बसपाला केवळ १९ जागा जिंकता आल्या.