मुंबई : भाजपने विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवाव्यात, अशी टिप्पणी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप प्रदेश कार्यालयात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. मात्र पक्षाचे वरिष्ठ नेते महायुतीतील जागावाटपाचा निर्णय घेतील, अशी भूमिका मांडली. राणे यांच्या या वक्तव्याबाबत शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आक्षेप घेतला असून भाजप २८८ जागा लढणार असेल, तर महायुती कशाला आहे, असा सवाल केला.

केंद्रीय अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या टीकेत कोणतेही तथ्य नाही आणि महाराष्ट्रातील विविध योजनांसाठी केंद्र सरकारने मोठा निधी दिला असल्याचे सांगून राणे यांनी राजकीय मुद्द्यांवरील पत्रकारांच्या प्रश्नांवरही उत्तरे दिली. महायुतीतील जागावाटपाची चर्चा, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याविषयीच्या प्रश्नांवर बोलताना राणे यांनी भाजपने सर्वच २८८ जागा लढवाव्यात, असे भाष्य केले. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचे मनसेने जाहीर केले आहे, याबाबत विचारता त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण निवडणूक आचारसंहिता लागू होईपर्यंत जागांची संख्या कमी-जास्त होईल, काही समझोता होईल, असा टोलाही लगावला.

हेही वाचा >>>“उत्तर बंगालमधील जिल्हे मिळून स्वतंत्र राज्य करा”; भाजपा नेत्यांच्या मागणीमागे काय आहे राजकारण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागावाटपाबाबत पक्षांचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील’

नारायण राणे यांनी भाजपने सर्व २८८ जागा लढविण्याची टिप्पणी केल्याने शिवसेना शिंदे गटात त्याची प्रतिक्रिया उमटली. सर्व २८८ जागा लढण्याचे नारायण राणे यांचे मत असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसे मत नाही. महायुतीच्या जागावाटपात प्रत्येक पक्षाला ताकदीनुसार जागा मिळतील. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील, अशी पुष्टीही म्हस्के यांनी जोडली.