इंग्रजांनी भारत सोडला आहे आणि भारतीय दृष्टिकोनातून इतिहास लिहिण्याची वेळ आली आहे. वसाहतवादी भूतकाळातील सर्व कटू आठवणींपासून मुक्त होण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेतूच्य अनुषंगाने, वसाहतवादी भूतकाळापासून इतिहास मुक्त करणे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. वीर सावरकर यांनी पहिल्यांदा १८५७ च्या बंडाला स्वातंत्र्याचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध संबोधून याचा प्रयत्न केला होता. असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

एका पुस्तक प्रकाशन समारंभात अमित शाह म्हणाले की, “अहिंसक संघर्षाचे” भारताच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान होते. मात्र यामध्ये दुसऱ्या कोणाची भूमिका नाही, असे सांगणे योग्य नाही. जर सशस्त्र क्रांतीचा समांतर प्रवाह सुरू झाला नसता, तर स्वातंत्र्य मिळायला आणखी अनेक दशके लागली असती. आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की, आपल्याला स्वातंत्र्य हे अनुदानाच्या रुपात मिळालेलं नाही, ते लाखो लोकांचे बलिदान आणि रक्तपातानंतर मिळाले आहे. आज जेव्हा मी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा कर्तव्यपथावर बसवलेला पुतळा पाहतो, तेव्हा मला खूप समाधान मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजीव सान्याल यांचे पुस्तक “रेवोल्यूशनरीज़, द अदर स्टोरी ऑफ़ हाउ इंडिया ओन इट्स फ़्रीडम” या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी अमित शाह बोलत होते. ते म्हणाले की, “अदर स्टोरी’ शब्द या पुस्तकाचा सारांश आहे. स्वातंत्र्याच्या गोष्टीतून एक दृष्टिकोन वर्षानुवर्षे जनमानसात प्रस्थापित करण्यात आला आहे. मी हे म्हणत नाही की, अहिंसक आंदोलनाचे स्वतंत्रता संग्रामात काही योगदान नाही किंवा तो इतिहासाचा भाग नाही. हा इतिहासाचा भाग आहे आणि त्याचे मोठे योगदान आहे. मात्र अहिंसक आंदोलन असो किंवा सशस्त्र क्रांती दोघांचा पाया १८५७ च्या क्रांतीत होता आणि ही सरकारबरोबरच इतिहासकारांचीही जबाबदारी आहे की नव्या पिढीसमोर योग्य ऐतिहासिक तथ्ये मांडली जातील.