scorecardresearch

Premium

तृणमूल काँग्रेसकडून ‘चलो दिल्ली’ आंदोलनाची घोषणा; रेल्वे भरून आंदोलक दिल्लीत धडकणार

केंद्रीय योजनांच्या लाभांपासून पश्चिम बंगालमधील जनतेला वंचित ठेवल्याबद्दल ट्रक भरून ५० लाख पत्र पंतप्रधान मोदींना पाठविल्यानंतर तृणमूल काँग्रेसकडून दोन दिवसांचे धरणे आंदोलन दिल्लीत करण्यात येणार आहे.

TMC-agitaion-in-Delhi
तृणमूल काँग्रेसकडून चलो दिल्लीचा नारा दिला असून दोन दिवस दिल्लीत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र – PTI)

तृणमूल काँग्रेसतर्फे (TMC) राजधानी दिल्लीत केंद्र सरकारच्या विरोधात धरणे प्रदर्शन केले जाणार आहे. शनिवारी (३० सप्टेंबर) सुरू होत असलेल्या या आंदोलनासाठी बंगालमधून एक संपूर्ण रेल्वे बुक करण्यात आली आहे. या रेल्वेत तृणमूल पक्षाचे खासदार, आमदार, पंचायत प्रधान आणि पंचायत सदस्य यांचा भरणा असणार आहे. बंगालमध्ये काही दिवसांनी दुर्गा पूजेच्या उत्सवाला सुरुवात होईल, त्याआधीच दिल्लीत धडक देण्याचा निर्णय तृणमूलच्या नेत्यांनी घेतला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पश्चिम बंगालच्या वाट्याचा निधी दिला नसल्याचा आरोप तृणमूलने केला आहे. त्यासाठी टीएमसीने “फाइट फॉर जस्टिस” आंदोलन पुकारले आहे.

दिल्लीमध्ये होणाऱ्या धरणे प्रदर्शनासाठी तृणमूलने आधीच संपूर्ण रेल्वे बुक केलेली आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या इंडियन नॅशलन आर्मीने (INA) दिलेला ‘चलो दिल्ली’ या नाऱ्याची नक्कल तृणमूलने केली आहे. शुक्रवारी राज्यभरातून मनरेगा योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या तीन हजार ते चार हजार लोकांना कोलकातामधील नेताजी इनडोअर स्टेडियमवर गोळा केले जाणार आहे. तिथून हावडा रेल्वेस्थानकातून दिल्लीकडे प्रयाण केले जाईल. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांची मदत मागितलेली नाही. दिल्लीमध्ये होणारे आंदोलन आणि त्याच्या तयारीची जबाबदारी तृणमूलने स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे.

What-is-the-Delhi-liquor-case-AAP-Leader-Sisodiya-and-Sanjay-Singh
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण काय आहे? ‘आप’ नेत्यांवर ईडीने कोणते आरोप केले आहेत?
TMC-leader-and-Minister-Rathin-Ghosh
ईडीचा कचाट्यात तृणमूल काँग्रेसचा आणखी एक मंत्री; ममता बॅनर्जींच्या विश्वासू नेत्यावर कारवाई
Sasikanth Senthil and Lokesh Sharma
कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय सुलभ करणाऱ्या शशिकांत सेंथिल यांच्याकडे राजस्थानच्या प्रचाराची धुरा
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

हे वाचा >> ‘ओबीसी जनगणने’च्या मुद्द्यावरून ‘इंडिया’त मतभेद; तृणमूल काँग्रेस लवकरच आपली भूमिका मांडणार!

दिल्लीच्या कृषी भवन येथे तृणमूलचे कार्यकर्ते जमा होऊन निषेध आंदोलन करतील, अशी घोषणा टीएमसीने काही दिवसांपूर्वीच केली होती. या ठिकाणी हजारो कार्यकर्ते उतरविण्याची तयारी तृणमूल काँग्रेसने केली होती. मात्र, पोलिसांनी परवानगी न दिल्यामुळे ही संख्या आता कमी करण्यात आली आहे. ‘चलो दिल्ली’ आंदोलनाची घोषणा तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षातील क्रमांक दोनचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी दिली. २१ जुलै रोजी कोलकातामध्ये शहीद दिन साजरा करत असताना या आंदोलनाची हाक देण्यात आली होती. तसेच ते स्वखर्चाने कार्यकर्त्यांना दिल्ली येथे नेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते.

आंदोलनाच्या घोषणेनंतर टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीदेखील केंद्र सरकारवर टीका केली. मनरेगा, प्रधान मंत्री आवास योजना अशा अनेक योजनांसाठीचा १.१५ लाख कोटींचा निधी केंद्राकडून येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये मागच्या काही निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव होत असल्यामुळेच केंद्राने निधी अडवून ठेवला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पश्चिम बंगालने निधीचा गैरवापर केला असा आरोप करून केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२१ पासून मनरेगा योजनेचा निधी रोखून धरला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने सांगितले की, पीएमएवाय योजनेची प्रत्यक्षात पाहणी केली असता त्यामध्ये विसंगती आणि अनियमितता आढळून आल्यामुळे या योजनेचाही निधी रोखण्यात आला आहे.

पश्चिम बंगाल राज्याच्या सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, मनरेगा योजनेसाठी केंद्र सरकारकडून सात हजार कोटी येणे बाकी आहे. या सात हजार कोटींपैकी २,९०० कोटी ही कामगारांची मजुरी आहे. केंद्र सरकारने निदान मजुरीचे पैसे तरी लवकर द्यावेत, अशी विनंती आम्ही वारंवार करत आहोत, अशी प्रतिक्रिया सचिवालयातील एका अधिकाऱ्याने दिली. थकीत मजुरी मिळावी, यासाठी तृणमूल काँग्रेसच्या वतीने राज्यभरातील लाभार्थ्यांच्या नावाने ५० लाख पत्र एका ट्रकमध्ये भरून कोलकाता ते दिल्ली पाठविण्यात आली. दिल्लीतील पंतप्रधान कार्यालय आणि ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीराज सिंह यांच्या कार्यालयात ही पत्र पाठविण्यात आली आहेत.

हे ही वाचा >> सुभाषचंद्र बोस यांचा वारसा पळविण्याचा प्रकार; ‘चंद्र बोस’ भाजपातून बाहेर पडताच तृणमूलची टीका

टीएमसीमधीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज घाटावर महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी जंतर मंतर येथे आंदोलन होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडून तृणमूलच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावले जाऊ शकते. अभिषेक बॅनर्जी यांनी नुकतेच एक्सवर एक ट्विट टाकून याबाबत भूमिका मांडली आहे. जर ३ ऑक्टोबर रोजी सरकारने बैठक बोलावली तर त्यांना बैठकीला उपस्थित राहता येणार नाही. त्या दिवशी ईडीने त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावले आहे.

ममता बॅनर्जी या आंदोलनात सहभागी होतील की नाही? याची अद्याप निश्चिती झालेली नाही. स्पेनमध्ये १२ दिवसांचा सरकारी दौरा करत असताना त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना किमान १० दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

१ ऑक्टोबर रोजी अभिषेक बॅनर्जी जिल्ह्यातील नेत्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्याची शक्यता आहे. दिल्ली येथे होत असलेल्या आंदोलनाचा संदेश पश्चिम बंगालच्या जनतेला कसा द्यावा? याबाबतच्या सूचना ते यावेळी देऊ शकतात. प्रत्येक बीडीओ कार्यालयाबाहेर एका मोठ्या स्क्रीनवर दोन दिवस चालणाऱ्या आंदोलनाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात यावे, असे निर्देश मंडळ अध्यक्षांना देण्यात आले आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, आम्ही दिल्लीतील भव्य धरणे आंदोलनासाठी तयार आहोत. आमचा पक्ष आणि नेत्यांविरोधात सतत भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या खोट्या आरोपांनाही उत्तर देऊ.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tmc announces chalo delhi movement trainload of protesters to take on centre kvg

First published on: 29-09-2023 at 15:47 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×