पश्चिम बंगालमधील अनेक राजकीय पक्ष हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबातील सदस्यांना स्वपक्षात घेऊन बोस यांच्या वारशाला पुढे नेत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करतात. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू ‘चंद्र बोस’ यांनी भाजपा पक्षाला बुधवारी (६ सप्टेंबर) सोडचिठ्ठी दिल्यामुळे भाजपाचा बंगालमधील नेताजी बोस यांच्याशी असलेला संबंध आता तुटला आहे. “सध्याच्या परिस्थितीत मी भाजपासोबत काम करू इच्छित नाही”, अशी प्रतिक्रिया चंद्र बोस यांनी पक्ष सोडताना दिली. ध्रुवीकरण होत असताना, केवळ मतांसाठी आणि फूट पाडणारे राजकारण होत असल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपाला वाढण्याच्या संधी नष्ट झाल्या आहेत, असेही त्यांनी म्हटले.

चंद्र बोस नाही तर चांद्रयान महत्त्वाचे

भाजपाचे प्रदेश प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी म्हटले, “चंद्र बोस हे काही वर्षांपासून पक्षात सक्रिय नव्हते आणि त्यांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाला फारसा काही फरक पडणार नाही. आम्ही चंद्र बोस नाही तर चांद्रयानाबाबत बोलू. त्यांनी तर कधीच पक्ष सोडला होता. अनेक वर्षांपासून ते आमच्या संपर्कात नव्हते आणि इतक्या वर्षांत ते कोणत्या कार्यक्रमानांही आले नाहीत. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याची घोषणा केल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत नाही.”

jitendra awhad eknath shinde Insult news
“ठाण्यात मुख्यमंत्र्यांचा अपमान, माझ्यासारख्या विरोधकालाही वाईट वाटलं”, जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला!
dhairyasheel mohite patil marathi news
मोहिते-पाटील यांच्या बंडामुळे माढ्यातील राजकीय समीकरणे बदलली
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?
Gadchiroli, Congress
गडचिरोली : घटक पक्षातील नाराजी व जातीय समिकरणाचे काँग्रेसपुढे आव्हान !

हे वाचा >> नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातवाने भाजपाला केला राम राम! म्हणाले, “मला दिलेलं आश्वासन…”

चंद्र बोस यांच्या जाण्यामुळे भाजपाचे नुकसान

मात्र, दुसऱ्या बाजूला राज्यातील भाजपाचे काही नेत्यांचे वेगळेच मत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चंद्र बोस यांच्या राजीनाम्याच्या घटनेतून चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी या नेत्यांची अटकळ आहे. “पश्चिम बंगालमधून लोकसभेच्या ३५ जागा जिंकण्याचे लक्ष्य पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेले आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आम्हाला समाजाच्या सर्वच घटकांचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. बंगालमधील बुद्धिवंतांचा पाठिंबा मिळाला, तर जनतेच्या मोठ्या गटाचे लक्ष आपसूकच वेधले जात असते. जर चंद्र बोससारख्या व्यक्तींनी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडला, तर जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. शिवाय, पक्षाचा जर बोस यांच्या कुटुंबीयांशी जवळचा संबंध असेल तर निवडणुकीत फायदाच होऊ शकतो.”, अशी प्रतिक्रिया भाजपामधील एका वरिष्ठ नेत्याने दिली.

बोस यांच्या पुढच्या पिढीची राजकीय वाटचाल

नेताजी यांचे कुटुंबीय आणि राजकीय पक्ष यांचे अनेक दशकांपासून संबंध राहिले आहेत. १९३९ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष सुरू केला होता. फॉरवर्ड ब्लॉकने आतापर्यंत बोस यांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. सुभाषचंद्र बोस यांचे मोठे बंधू आणि स्वातंत्र्यसैनिक शरतचंद्र बोस हे पक्षाचे प्रमुख होते. सरतचंद्र बोस यांचे सुपुत्र आणि फॉरवर्ड ब्लॉकचे नेते अमिय नाथ बोस हे फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे आरामबाग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार (१९६७-७१) होते. सरतचंद्र यांचे आणखी एक सुपुत्र सुब्रत बोस हेदेखील बारासात लोकसभेचे खासदार (२००४-०९) होते. त्याआधी ते श्यामपुकूर या विधानसभा मतदारसंघातून (२००१-०४) आमदार म्हणून निवडून आले होते.

हे वाचा >> “भारत देश महान झाला पाहिजे हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं स्वप्न अधुरं, आता आपल्याला..” – मोहन भागवत

शरतचंद्र बोस यांचे तिसरे सुपुत्र सिसिर कुमार बोस हे १९८२-८७ साली काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मध्य कलकत्ता येथून आमदार होते. १९९६ साली त्यांची पत्नी क्रिष्णा बोस या जादवपूर लोकसभेतून खासदार बनल्या. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी नाते तोडून तृणमूल काँग्रेसची स्थापना केल्यानंतर क्रिष्णा यांनी काँग्रेसमधून टीएमसीमध्ये प्रवेश केला. जादवपूर मतदारसंघातून त्यांनी १९९८ ते २००४ काळात पुन्हा खासदारकी मिळवली. सिसिर कुमार बोस आणि क्रिष्णा यांचे सुपुत्र सुगाता बोस यांनीही आपला आईचा मतदारसंघ जादवपूर येथून २०१४-१९ या काळात लोकसभेचे प्रतिनिधित्व केले. सुगाता बोस हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू असल्यामुळे २०११ पासून तृणमूल काँग्रेस बोस यांचा वारसा आपल्याकडे असल्याची जाहिरात करीत आहे.

२०१६ च्या विधानसभा निवडणुकीआधी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांशी पक्षाचा संबंध असल्याचे दाखविण्यासाठी भाजपाने अमिय नाथ बोस यांचे सुपुत्र चंद्र बोस यांना पक्षात प्रवेश दिला. मात्र बोस कुटुंबीयांतील इतर सदस्यांप्रमाणे चंद्र बोस यांना निवडणुकीत विजय मिळवता आला नाही. २०१६ साली विधानसभा आणि तीन वर्षांनंतर २०१९ साली लोकसभेत त्यांचा पराभव झाला. २०१६ साली बोस यांना पश्चिम बंगालच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नेमण्यात आले; मात्र २०२० साली पक्षाने संघटनेत फेरबदल केले असता, बोस यांना वगळण्यात आले. पक्षाच्या काही भूमिकांवर त्यांनी टीका केली असल्याचे कारण पुढे करण्यात आले. २०१९ साली त्यांनी नागरिकत्व (सुधारणा) कायद्याला विरोध केला होता.

चंद्र बोस यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देताच तृणमूल काँग्रेसने भाजपावर निशाणा साधताना म्हटले की, नेताजी आणि जनसंघ यांची विचारधारा एकमेकांपासून भिन्न आहे. तृणमूल पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश मुजुमदार म्हणाले की, नेताजींच्या विचारधारेचा डीएनए हा जनसंघ, हिंदू महासभा किंवा भाजपाच्या डीएनएशी कधीही मेळ बसू शकत नाही. भाजपाशी संबंधित कोणत्याही संघटनेने स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नव्हता, याउलट नेताजी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी निधड्या छातीने लढा दिला. नेताजी हे धर्मनिरपेक्ष विचार माननारे नेते होते, तर जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू राष्ट्रावर विश्वास ठेवतात. भाजपाकडे विश्वासार्ह स्वातंत्र्यसैनिक नसल्यामुळेच ते काँग्रेसकडून सरदार वल्लभभाई पटेल आणि नेताजींच्या कुटुंबीयांना पळविण्याचा प्रयत्न करतात.