२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया या नावाने आघाडी केली आहे. या आघाडीत एकूण २८ पक्ष आहेत. दरम्यान, या आघाडीच्या समन्वय समितीची १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पहिली बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला उत्तर म्हणून ओबीसी जनगणना करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तृणमूल काँग्रेसने या भूमिकेवर असहमती दर्शवली आहे. ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केल्यास पश्चिम बंगालमध्ये आम्हाला राजकीय फटका बसेल, असे तृणमूल काँग्रेसला वाटते. दरम्यान, लवकरच हा पक्ष ओबीसी जनगणनेबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
“या मुद्द्यावर तृणमूल काँग्रेस पक्षाशी चर्चा करू”
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी सध्या स्पेनच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालमध्ये उद्योग यावेत, तसेच या राज्यात गुंतवणूक वाढावी, यासाठी त्या स्पेनच्या दौऱ्यावर गेल्या आहेत. या दौऱ्यावरून परतल्यानंतर तृणमूल काँग्रेस याबाबत निर्णय घेणार आहे. १३ सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधी अभिषेक बॅनर्जी उपस्थित नव्हते. मात्र, पश्चिम बंगालमधील कथित ‘स्कूल स्कॅम’ प्रकरणी अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालय कार्यालयात हजर राहायचे होते. त्यामुळे ते या बैठकीस उपस्थित राहू शकले नव्हते. याच बैठकीत नंतर इंडिया आघाडीकडून देश पातळीवर ओबीसींची जनगणना करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर ओबीसींच्या जनगणनेबाबत तृणमूल काँग्रेसची भूमिका काय, असा प्रश्न काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांना विचारण्यात आला होता. आम्ही या मुद्द्यावर तृणमूल काँग्रेस पक्षाशी चर्चा करू, अशी प्रतिक्रिया तेव्हा वेणुगोपाल यांनी दिली होती.
दरम्यान, ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची मुंबईत तिसरी बैठक पार पडली होती. या बैठकीतही ओबीसींची जनगणना करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या बैठकीतही तृणमूल काँग्रेसने या मागणीवर आम्ही विचार करून, आमची भूमिका स्पष्ट करू, असे सांगितले होते.
“जातीवर आधारित जनगणना केल्यास लोकांमध्ये फूट पडेल”
ओबीसींची जनगणना आणि तृणमूल काँग्रेसची भूमिका या संदर्भात तृणमूलचे नेते सुगतो रॉय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी आम्ही ओबीसींच्या जनगणनेच्या विरोधात आहोत, असे याआधीच सांगितलेले आहे. अशा प्रकारची जनगणना केल्यास लोकांमध्ये फूट पडेल, असे आमचे मत आहे. मात्र, चर्चा आणि वाटाघाटीसाठी बसल्यानंतर आमच्या इंडिया आघाडीत मार्ग काढला जाऊ शकतो, यावर आमचा विश्वास आहे,” असे सुगतो रॉय म्हणाले.
“जातीवर आधारित जनगणनेला पाठिंबा दिल्यास चुकीचा संदेश जाईल”
ममता बॅनर्जी ओबीसी जनगणनेच्या विरोधात असल्याचे म्हटले जात आहे. ओबीसींची जनगणना केल्यास हिंदी भाषिक राज्यांना त्याचा फायदा होऊ शकतो; मात्र तृणमूल काँग्रेसला त्याचा फटका बसू शकतो, असे ममता बॅनर्जींना वाटते. याबाबत सुगतो रॉय यांनीदेखील भाष्य केले आहे. “पश्चिम बंगालमध्ये जातीवर आधारित राजकारण केले जात नाही. जातीवर आधारित जनगणनेला पाठिंबा दिल्यास चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये आमच्या प्रतिमेस धोका पोहोचू शकतो. असे असले तरी भाजपाला पराभूत करण्यासाठी आम्हाला इंडिया आघाडीत कायम राहायचे आहे. त्यामुळे जातीवर आधारित जनगणनेबाबत अंतिम निर्णय ममता बॅनर्जी याच घेतील. सध्या त्या स्पेन दौऱ्यावर आहेत. २३ सप्टेंबर रोजी त्या कोलकाता येथे परतणार आहेत. त्यानंतर या मुद्द्यावरील आमची भूमिका जाहीर करू,” असे सुगतो रॉय म्हणाले.
“आम्ही जातीवर आधारित राजकारण केलेले नाही”
दरम्यान, इंडिया आघाडीतील बिहारमधील जदयू आणि राजद हे पक्ष जातीवर आधारित जणगनना करण्याच्या भूमिकेत आहेत. बिहारमध्ये जदयू पक्षाचे नेते नितीश कुमार हे मुख्यमंत्री आहेत. तेथे महायुतीचे सरकार आहे. या सरकारने जातीवर आधारित सामाजिक, आर्थिक, तसेच शैक्षणिक स्थिती जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले आहे. या भूमिकेचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, पश्चिम बंगालची स्थिती काहीशी वेगळी असल्याचे तृणमूल काँग्रेसला वाटते. त्याबाबत सुगतो रॉय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पश्चिम बंगालमध्ये आम्ही जातीवर आधारित राजकारण केलेले नाही. आम्ही कधी ओबीसींचेही राजकारण केलेले नाही. याआधी आम्ही सीपीआय (एम)विरोधात लढलो आहोत. सध्या भाजपा आमचा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. पश्चिम बंगालमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील काही मते भाजपाला मिळालेली आहेत. भाजपा सध्या ओबीसींचे राजकारण करीत आहे. जातीवर आधारित जनगणना केल्यास भाजपाला आणखी फायदा होऊ शकतो. त्यामुळे आम्हाला जातीवर आधारित जनगणना होऊ नये, असे वाटते,” असे रॉय म्हणाले.
“इंडिया आघाडीतील पक्षांनी जातीचे राजकारण केले”
दरम्यान, भाजपाचे नेते शमिक भट्टाचार्य यांनी इंडिया आघाडी, तसेच त्यांची ओबीसी जणगनना करण्याची मागणी याबाबत भाष्य केले आहे. “इंडिया आघाडीत असलेल्या सर्वच पक्षांनी जातीचा एक राजकीय शस्त्र म्हणून वापर केलेला आहे. मात्र, त्यांनी कधीही सामाजिक-आर्थिक अंगाने विचार केलेला नाही. आमचा पक्ष समाजाकडे नेहमीच सर्वसमावेशक भूमिकेतून पाहतो. जातीवर आधारित जनगणना गरजेची आहे, अशी आमची भूमिका आहे. मात्र, ही जनगणना केंद्र सरकारने करावी, असे आम्हाला वाटते,” असे भट्टाचार्य म्हणाले.