Top Political News in Today : आज दिवसभरात मुंबईपासून ते राजधानी दिल्लीपर्यंत अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. १) अजित पवार यांच्यावर त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून कुरघोडी केली जात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. २) मराठा समाजाला ओबीसींपेक्षा जास्त निधी मिळत असल्याची खंत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. ३) विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाची दिशाभूल करू नये, असा सल्ला बबनराव तायवडे यांनी दिला. ४) शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. ५) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी दावे प्रतिदावे केले. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
अजित पवार यांच्यावर कुरघोडीचा प्रयत्न केला जातोय : रोहित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून कुरघोडीचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी केला. “कुर्डुवाडी प्रकरणात महिला आयपीएस अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती, पण त्याठिकाणी अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे घोळ झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली, पण तरीही जाणूनबुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे हे मात्र नक्की”, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. “पक्षाच्या दोन तीन नंबरच्या जेष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणे कितपत योग्य आहे?”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मराठा समाजाला ओबीसींपेक्षाही जास्त निधी : छगन भुजबळ
मराठा समाजाला मागील काही वर्षात ओबीसी समाजापेक्षाही जास्त निधी देण्यात आला आहे, अशी खंत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वाखाली आज मंत्रालयात ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक ओबीसी नेते उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या कुणबी नोंदीसंबंधी काढण्यात आलेल्या जीआरमधील काही शब्दांना आक्षेप घेतला. गेल्या २० वर्षात ओबीसीं समाजाला जेवढा निधी मिळाला नाही, तेवढा मागील दोन-तीन वर्षात मराठा समाजाला मिळाला, अशी तक्रार भुजबळांनी या बैठकीत मांडली. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयालाही त्यांनी विरोध केला. जर बैठकीतून प्रश्न सुटत नसेल तर आम्ही थेट न्यायालयात धाव घेऊ असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
आणखी वाचा : उपराष्ट्रपतिपद मिळवून भाजपाने साधली अनेक राजकीय समीकरणे; आता पुढील आव्हाने काय?
छगन भुजबळ- विजय वडेट्टीवार यांना बबनराव तायवडेंचा सल्ला
मंत्री छगन भुजबळ आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाची दिशाभूल करणे थांबवावे, असे आवाहन ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केले. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या शासकीय आदेशाविषयी भुजबळ आणि वडेट्टीवार यांना आक्षेप असेल तर त्यांनी पुरावे सादर करावे, अन्यथा ओबीसी समाजाची दिशाभूल करू नये, असंही ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आझाद मैदानावर झालेल्या मराठा आंदोलनानंतर राज्य सरकारने आरक्षणासंदर्भात शासकीय निर्णय जाहीर केला आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये नोंद असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, असं या आदेशात म्हटलं आहे. या निर्णयाला मंत्री छगन भुजबळ आणि विजय वड्डेटीवार यांनी उघडपणे विरोध केला आहे.
शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अडीज तास बैठक झाली. या बैठकीला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती होती. राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथे शिवसेना ठाकरे गटाची मोठी ताकद आहे. मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्रित निवडणुका लढवणार अशा चर्चांनी जोर धरला आहे. दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून ठाकरे बंधू यांच्या युतीची घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मनसे नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळेच दसरा मेळाव्याच्या आधी दोन्ही पक्षातील युतीच्या चर्चांना अधिकच बळकटी मिळाली आहे.
हेही वाचा : “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हा काळा कायदा”, विधेयकाविरोधात महाविकास आघाडीचे राज्यभर आंदोलन; कारण काय?
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग? सत्ताधारी आणि विरोधकांचे दावे प्रतिदावे
उपराष्ट्रपती निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी.पी राधाकृष्णन यांचा विजय झाला आहे. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२ मते मिळाली; तर इंडिया आघाडीचे उमेदवार व माजी न्यायमूर्ती रेड्डी यांना ३०० मते पडली. त्याशिवाय १५ मते अवैध ठरली, त्यामुळे निवडणुकीनंतर क्रॉस व्होटिंगची चर्चा सुरू झाली आहे. भाजपाने विरोधी पक्षातील खासदारांना धन्यवाद देत या चर्चेला आणखी हवा दिली. याआधीही भाजपाने विरोधी पक्षातील मते फुटतील आणि राधाकृष्णन यांना मिळतील असा दावा केला होता. दरम्यान, राहुल गांधी यांनीही क्रॉस व्होटिंगवर भाष्य केलं. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत राहुल यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी ‘वोट चोर, गद्दी छोड’ असे चार शब्दांत उत्तर दिलं. या निवडणुकीतही मतचोरी झाली, असं तुम्हाला वाटतंय का असा प्रश्न त्यांना माध्यमांनी विचारला असता, ‘शंभर टक्के’ असं उत्तर राहुल गांधी यांनी दिलं.