Top Five Political News in Today :  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना न्यायालयीन खटल्याचा फटका बसला. भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश असलेल्या बेनामी मालमत्तेशी संबंधित खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश विशेष सत्र न्यायालयाने दिले. यापूर्वी उच्च न्यायालयाने ही कार्यवाही केवळ तांत्रिक आधारावर रद्द केली होती, अशी टिप्पणीही सत्र न्यायालयाने निर्णय देताना केली. या आदेशानुसार, भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्धच्या खटल्याची येत्या ६ ऑक्टोबरपासून सुनावणी होईल. खासदार-आमदारांशी संबंधित खटल्याचे कामकाज पाहणाऱ्या विशेष न्यायालयात ही सुनावणी घेतली जाईल. २००८-०९ आणि २०१०-११ या आर्थिक वर्षात केंद्रीय यंत्रणेने भुजबळ हे बेनामी व्यवहारांमध्ये सहभागी असलेले लाभार्थी कंपन्यांचे मालक असल्याचा आरोप केला होता.

मराठ्यांचं वादळ आता दिल्लीत धडकणार, मनोज जरांगेंची घोषणा

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या महिन्यात मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण केले. राज्य सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन जरांगे यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या आणि त्या संदर्भात शासकीय अध्यादेशही काढला. या अध्यादेशात हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा उल्लेख आहे. एकीकडे ओबीसी समाजाकडून या अधिसूचनेला विरोध केला जात असताना दुसरीकडे मनोज जरांगे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. जरांगे यांनी चलो दिल्लीचा नारा दिला असून ते देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीत अधिवेशन घेणार आहेत. लवकरच या अधिवेशनाची तारीख निश्चित केली जाईल, असे जरांगे यांनी धाराशिव येथील एका बैठकीत सांगितले, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या दिल्लीतील अधिवेशनात किती मराठे सहभागी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मीनाताई ठाकरेंच्या शिवाजी पार्कमधील पुतळ्यावर रंगफेक

मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात असलेल्या स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आज अज्ञात समाजकंटकांनी रंग फेकल्याची घटना घडली. सकाळी १० वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला, त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या ठिकाणी येऊन पाहणी केली. त्यानंतर उद्धव ठाकरे हेदेखील शिवाजी पार्क परिसरात आले. “आज घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. यामागे अशी व्यक्ती असू शकते ज्याला स्वतःच्या आई-वडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते. कुणीतरी लावारिस माणसानं हे कृत्य केले असेल. बिहारमध्ये जसा मोदींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा असफल प्रयत्न करण्यात आला, असाच कुणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग हा असू शकतो. तूर्तास पोलिस या प्रकरणी शोध घेत आहेत, पुढे काय होते हे आपण पाहू,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा : Visual Storytelling : राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे भाजपात खळबळ? रायबरेलीत असं काय घडलं?

मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, देवेंद्र फडणवीसांना विश्वास

आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत महायुतीचाच महापौर होणार. कोणीही एकत्र आले तरी आमचा विजय थांबवू शकत नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते ‘महाविजय संकल्प’ मेळाव्यात बोलत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एक ‘ब्रँड’ होता, पण नुसते नाव लावल्याने तुम्ही ‘ब्रँड’ होत नाही, अशी टीका फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर केली. “मुंबई ही कोणाची आहे हे मुंबईकरांनी २०१४,१९ व २४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले. महाविकास आघाडीनं मराठी माणसाला मुंबईबाहेर घालविले, पण आमच्या सरकारनं वरळीतील बीडीडी चाळीतील मराठी माणसाला ५४० चौरस फुटांची घरे देण्याचा निर्णय घेतला, धारावीत केवळ पात्रच नाही, तर अपात्र रहिवाशांनाही घरे देण्यात येणार आहेत”, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींबद्दल प्रणिती शिंदे यांनी काय विधान केलं? भाजपाचे नेते कशामुळे संतापले?

पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईचा एआय व्हिडीओ तात्काळ हटवा, उच्च न्यायालयाचा आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा काँग्रेस पुरस्कृत एआय व्हिडीओ समाजमाध्यमांवरून तात्काळ हटवा, असे आदेश पाटणा उच्च न्यायालयाने आज दिले. कार्यवाहक मुख्य न्यायाधीश पी. बी. बजंत्री यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणीदरम्यान हा आदेश दिला. अलीकडेच बिहारमधील काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत मोदींच्या आई त्यांच्या स्वप्नात आल्याचे दाखवण्यात आले होते. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणामुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापले असून भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. याप्रकरणी भाजपा नेत्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी काँग्रेसच्या आयटी सेलच्या प्रमुखावर एफआयआर दाखल केला आहे.