Top Political News in Today : आज दिवसभरात मुंबईपासून ते राजधानी दिल्लीपर्यंत अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. १) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. २) शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा रस्त्यावर उतरणार, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. ३) हैदराबाद गॅझेट विरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. ४) येत्या १७ सप्टेंबरच्या आत हैदराबाद गॅझेटद्वारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अन्यथा दसरा मेळाव्यात भूमिका स्पष्ट करू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. ५) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे शत्रू असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. या सर्व घडामोडींचा घेतलेला हा सविस्तर आढावा…
काँग्रेसच्या नेत्यांची मातोश्रीवर खलबतं
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविणाऱ्या महाविकास आघाडीला गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आमदार अमिन पटेल हेदेखील उपस्थित होते. या भेटीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी दिली आहे, त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्रित लढणार की मनसे महाविकास आघाडीत सामील होणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.
शेतकऱ्यांसाठी शरद पवार रस्त्यावर उतरणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांवरून पक्षाने आयोजित केलेल्या एका मोर्चात सहभागी होणार आहेत. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यातच पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे हमीभाव आणि पीक विमा अशा शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांकडे लक्ष्य वेधण्यासाठी येत्या १५ सप्टेंबरला नाशिकमध्ये शरद पवार गटातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. राज्यात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करीत असताना महायुती सरकार कुरघोडी, भांडण्यात आणि जाहिरातबाजीत व्यस्त असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी २०२३ मध्ये कांदा निर्यात बंदीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात त्यावेळी शेतकऱ्यांमधून तीव्र पडसाद उमटले होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे शेतकऱ्यांची पाठराखण करीत मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड येथे आयोजित रास्ता रोको आंदोलनात सामील झाले होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शरद पवार पुन्हा मोर्चात सहभागी होणार असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष त्यांच्याकडे लागून आहे.
आणखी वाचा : राहुल गांधींना न्यायालयात खेचणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्याला ईडीची नोटीस; कारण काय?
हैदराबाद गॅझेट विरोधात मंत्री छगन भुजबळ आक्रमक
मनोज जरांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य करीत राज्य सरकारने मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, हैदराबाद गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा शासकीय निर्णयही काढण्यात आला. मात्र, या निर्णयाला महायुतीमधील मंत्री छगन भुजबळ यांनीच विरोध केला आहे. सरकारने काढलेल्या शासकीय निर्णयाविरोधात आपण न्यायालयात जाणार, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या शासकीय निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीला छगन भुजबळ अनुपस्थित राहिले होते. दरम्यान, “ओबीसी नेत्यांच्या वतीने भुजबळ हे उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करणार आहेत. सध्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असून वकिलांचा कायदेशीर सल्लाही घेण्यात आला आहे”, असं एका ओबीसी नेत्यानं सांगितलं आहे.
मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा
येत्या १७ सप्टेंबरच्या आत हैदराबाद गॅझेटद्वारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या अन्यथा आम्ही दसरा मेळाव्यात भूमिका स्पष्ट करू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. आझाद मैदानावरील उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. आज डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “हैदराबाद गॅझेटिअरनुसार बंजारा समाज आणि मल्हार कोळी समाजाकडून आरक्षण देण्याची मागणी होत असेल तर शासनाने या दोन्ही समाजालाही लाभ द्यावा, आम्ही काही येवलावाल्याप्रमाणे नाही”, असा टोला त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना लगावला. “हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व अधिकारी २४ तास कामाला लावा आणि प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा, नाहीतर आम्हाला मोठा निर्णय घ्यावा लागेल. राजकीय नेत्यांना आमच्याकडे येणे बंद करावे लागेल”, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : Maharashtra Politics : छगन भुजबळ यांच्या भूमिकेमुळे महायुतीची कोंडी? मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार?
दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
शिवसेनेचा दसरा मेळावा जवळ आला असून या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरे गटाचे संजय राऊत यांना याबाबत माध्यमांनी प्रश्न केला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “दसरा मेळाव्यात दोन्ही पक्षांचे प्रमुख (मनसे व शिवसेना ठाकरे गट) एकत्र येण्याबाबत मला माहीत नाही, पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे. “दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो. माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरेंचा गुढीपाडव्याला दुसरा वेगळा मेळावा असतो. दोन्ही पक्ष वेगळे असल्याने तसं होणं शक्य नाही. भविष्यामध्ये काम करण्यासाठी एकत्र येऊन आमची सहमती झाली आहे. साठ वर्षांपेक्षा जास्त काळ हा फक्त शिवसेनेचाच दसरा मेळावा आहे”, असं राऊत यांनी म्हटलं आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार असल्याची माहितीही राऊत यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे शत्रू : मल्लिकार्जुन खरगेंची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे शत्रू आहेत, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. अमेरिकेनं भारतावर लादलेल्या शुल्काच्या संदर्भात बोलताना त्यांनी पंतप्रधानांवर ही टीका केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मैत्री करून मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा खराब केली, असा आरोपही खरगे यांनी केला. कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील एका पत्रकार परिषदेत बोलताना खरगे म्हणाले, “अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी मित्र असू शकतात, परंतु आता ते देशाचे शत्रू बनले आहेत. त्यांनी संपूर्ण देशाचे वातावरण बिघडवलं आहे. ट्रम्प यांनी भारतावर खूप मोठा कर लादला आहे. ५० टक्के कर लावून त्यांनी आपल्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आहे.” दरम्यान, खरगे यांनी पंतप्रधानांवर केलेल्या टीकेमुळे राजकीय वाद वाढण्याची शक्यता आहे. भाजपा त्यांना कसं प्रत्युत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.