अविनाश कवठेकर

गुढीपाडव्यानिमित्तच्या जाहीर सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभा, औरंगाबाद येथील मशिदीवरील भोंग्यांबाबत झालेल्या सभेत राज यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसेवर कडाडून हल्ला चढविताना भारतीय जनता पक्षाबद्दल अवाक्षरही काढले नाही. मात्र रविवारच्या पुण्यातील सभेत राज यांनी पुन्हा एकदा आपला पवित्रा बदलून भाजपलाच लक्ष्य केले. त्यांच्या बदलत्या भूमिकेचीच चर्चा सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसकडून, अयोध्या दौरा रद्द होण्यामागे भाजपच असल्याच्या आरोपाला ठाकरे यांनीच पुष्टी दिली आहे.

हनुमान जयंतीनिमित्त महाआरती कार्यक्रमासाठी पुण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. दौऱ्याची तयारी सुरू असताना दौरा तात्पुरता स्थगित करण्यात आल्याचे ट्विट राज ठाकरे यांनी केले आणि पुण्यात रविवारी झालेल्या जाहीर सभेत दौरा न करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी अयोध्येत मुख्यमंत्र्यांना एक खासदार जुमानत नाही, याचा अर्थच हा एक सापळा असल्याचे सांगत नियोजित अयोध्या दौरा रद्द झाल्याचे जवळपास जाहीर केले आहे. राज ठाकरे यांच्या या बदलत्या भूमिकेनंतर शिवसेना आणि काँग्रेसकडून त्यावर प्रतिक्रिया देण्यात आली. मात्र भारतीय जनता पक्षाकडून कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे या साऱ्या घटनांमागे भारतीय जनता पक्षाचाच हात असल्याच्या चर्चेलाही बळ मिळत आहे. राज यांनी भूमिका का बदलली याबाबतही चर्चा सुरू झाली असतानाच, सापळा कोणाचा आणि रसद कोणी पुरविली हे त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले आहे.

हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारल्यानंतर मनसे ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप सुरू झाला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला लक्ष्य केले. कोणाचे हिंदुत्व पोकळ आणि कोणाचे खरे, याबाबत आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय चिखलफेक सुरू झाली. मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्याचे वाटेकरी वाढणार होते. औरंगाबाद येथील राज ठाकरे यांच्या जाहीर सभेपूर्वी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने काढता पाय घेतला. भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्याबाबत उघड विरोधी भूमिका घेत अयोध्या दौऱ्याला विरोध दर्शविला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रार केली आणि आंदोलन सुरू केले. या माध्यमातून उत्तर भारतीयांवर प्रभाव टाकण्यासाठीच मनसेची नामुष्की करण्यात आल्याचे दिसून येत आहे. असाच आरोप काँग्रेसकडून यापूर्वीच करण्यात आला होता.

/

अयोध्येला जाण्यासाठी शिवसेनेची मदत घेतली असती तर बरे झाले असते, अशी खोचक टिपण्णी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केली. तसेच या सर्वांमागे भाजपचे कारस्थान आहे, असा आरोपही महाविकास आघाडीतील नेत्यांनी सातत्याने केला होता. पुण्यातील सभेत अयोध्येला गेलो असतो तर, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असते, त्यांना तुरुंगात सडविण्यात आले असते, असे ठाकरे यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. भाजपच्या खासदारानेच अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता, हे यानिमित्ताने दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे राज यांच्या मतानुसार अयोध्या दौऱ्याचा सापळा भाजपने रचल्याचे आणि विरोधाची रसद भाजपनेच पुरविल्याच्या आरोपांना पुष्टी मिळत आहे.

मनसे पक्ष स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात उघड भूमिका घेत आंदोलने केली. चौदा वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनाची जाग आत्ता कशी येते, अशी विचारणाही राज यांनी केली. उत्तर भारतीयांविरोधातील भाषणांचा पुन्हा विषय काढा, असे सांगण्यात आल्याने त्यातूनच माफी मागा, वगैरे मागण्या झाल्या, असे जाहीर सभेत सांगत राज यांनी या मागे भाजपचीच रसद असल्याचे स्पष्ट केले आहे.