BJP ally conflict भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या निषाद पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री संजय निषाद यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाला थेट आव्हान दिले होते. त्यांनी भाजपाला चक्क युती तोडण्याचे आव्हान दिले होते. भाजपाने वेळीच आपल्या मित्रपक्षाबरोबर असलेले मतभेद मिटवले. मात्र, आता आणखी एका मित्रपक्षाबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी भाजपाला आवश्यक पावले उचलावी लागत आहे. हा मित्रपक्ष म्हणजे ‘सुहेलदेव भारतीय समाज पार्टी'(एसबीएसपी). एबीव्हीपी कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे दोघांमधील तणाव वाढला आहे. विरोधकांनीही एसबीएसपीचे नेते आणि राज्याचे मंत्री ओम प्रकाश राजभर यांच्याबरोबर एकजूट दाखवत सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडले आहे. नेमके प्रकरण काय? उत्तर प्रदेशमधील या वादाचे कारण काय? त्याविषयी जाणून घेऊयात…

भाजपा अन् मित्रपक्षातील तणावाचे कारण काय?

  • एसबीएसपी आणि भाजपामधील संबंधांना तडा गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) सदस्यांनी बुधवारी संध्याकाळी लखनऊमधील मंत्री राजभर यांच्या घरावर दगडफेक केली.
  • एबीव्हीपी सदस्यांना गुंड म्हटल्याने विद्यार्थी संघटना संतप्त झाली होती. बाराबंकी येथील एका विद्यापीठात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या लाठीहल्ल्यात एबीव्हीपीचे सदस्य जखमी झाले होते, त्यानंतर मंत्र्यांनी हे वक्तव्य केले होते.
  • विद्यार्थी ‘श्री राम स्वरूप मेमोरियल युनिव्हर्सिटी’मधील कथित गैरव्यवहारांविरोधात आंदोलन करत होते.

राजभर नक्की काय म्हणाले?

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजभर म्हणाले, “कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम आहे. जर तुम्ही गुंडगिरी कराल, तर पोलिस निश्चितच कारवाई करतील.” ते पुढे म्हणाले की, पोलिस आधी नम्रपणे समजावतात आणि जर लोक ऐकत नसतील तर कायद्याचा वापर करतात. या वक्तव्याने एबीव्हीपी कार्यकर्ते आणखी चिडले आणि त्यांनी मंत्र्यांच्या घराबाहेर एकत्र येऊन त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली व त्यांचा पुतळा जाळला.

मात्र, एसबीएसपीचे राष्ट्रीय सचिव आणि राजभर यांचे पुत्र अरुण राजभर यांनी आरोप केला की, एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी अपमानास्पद भाषा वापरली. ते म्हणाले, हा अति मागास समाजावरील हल्ला आहे. त्यांनी सरकारकडे आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी केली. एसबीएसपीचा मुख्य मतदार असलेल्या राजभर समाजाचा समावेश इतर मागासवर्गीय (ओबीसी) श्रेणीत होतो.

अरुण राजभर म्हणाले, “बाराबंकी येथील ‘श्री राम स्वरूप मेमोरियल युनिव्हर्सिटी’बाहेर एसबीएसपीवर झालेल्या लाठीहल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि विद्यापीठावरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी करतो. आमचा पक्ष नेहमी विद्यार्थ्यांबरोबर उभा राहिला आहे. मात्र, रात्री लखनऊमध्ये मंत्र्यांच्या घरावर दगडफेक करणाऱ्या, त्यांच्यासाठी अपमानास्पद शब्द वापरणाऱ्या आणि महिला पोलिस अधिकाऱ्याबरोबर गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. जे कायदा मोडतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आपल्याच मंत्र्यांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे.”

विरोधकांची सरकारवर टीका

समाजवादी पार्टी (सपा) आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी राजभर यांच्या बाजूने उभे राहत भाजपावर टीका केली. भाजपाला ‘शोषक पक्ष’ म्हणत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, त्यांच्या मित्रपक्षांनी आता हे लक्षात घेतले पाहिजे की भाजपा त्यांची “आर्थिक स्थिती सुधारू शकते, पण त्यांचा कधीच आदर करू शकत नाही. भाजपा ‘आधी वापर करा, मग नष्ट करा’ या तत्त्वावर काम करते. “भाजपाने आपल्या मित्रपक्षांना राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त केले आहे,” असेही ते म्हणाले.

या घटनेमुळे मित्रपक्षांना आत्मसन्मानाचे महत्त्व कळेल, अशी आशा काँग्रेसने व्यक्त केली. “ओम प्रकाश राजभर एका मागास समाजातून येतात. ते एक मेहनती आणि तळागाळातील नेते आहेत. काल रात्री भाजपाच्या पाठिंब्याने गुंडांनी त्यांच्या घरावर दगडफेक केली. भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मागास समाजाची ही स्थिती आहे.” ‘एसबीएसपी’मधील असंतोषावर विरोधकांनी टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी संध्याकाळी राजभर यांची भेट घेतली. सूत्रांनुसार, एसबीएसपीच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही संवाद साधला. मौर्य यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर अरुण राजभर यांनी दावा केला की, एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये समाजवादी पक्षाचे गुंड लपलेले असण्याची शक्यता आहे. “आम्ही या व्यक्तींचा शोध घेण्याची विनंती केली आहे,” असे ते म्हणाले.

मित्रपक्षाची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा

एसबीएसपी नेत्यांनी सांगितले की, मंत्र्यांनी भाजपाच्या इतर वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला होता आणि त्यांना माहिती देण्यात आली की, बाराबंकीतील घटनेतील दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले की, तीन पोलिस हवालदार आणि एका उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. एबीव्हीपीने सरकारला संबंधित विद्यापीठातील अधिकारी आणि लाठीहल्ल्यासाठी जबाबदार पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता.

मित्रपक्ष आणि भाजपातील वादाचा इतिहास

एसबीएसपी आणि भाजपाने २०१७ च्या निवडणुका एकत्र लढवल्या, मात्र दोन वर्षांनंतर, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा नेतृत्वावर टीका केल्याने राजभर यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले. एसबीएसपीने ती निवडणूक एकटीच लढवली, मात्र २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाबरोबर युती करून त्यांनी सहा जागा जिंकल्या. असे असले तरी विरोधी पक्ष भाजपाला सत्तेवरून हटवू शकले नाहीत, त्यामुळे राजभर यांनी निवडणुकीनंतर आपला मार्ग बदलला आणि जुलै २०२३ मध्ये औपचारिकपणे ‘एनडीए’मध्ये परतले.

मार्च २०२४ मध्ये राजभर यांना योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा समाविष्ट करण्यात आले. गेल्या महिन्यात दिल्लीमध्ये भाजपाच्या उत्तर प्रदेशमधील मित्रपक्षांच्या बैठकीत राजभर यांनी ‘निषाद पार्टी’चे प्रमुख संजय निषाद यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उत्तर प्रदेश विधानसभेला घेराव घालण्याच्या आवाहनाला पाठिंबा दिला होता.