देशभरातील प्रमुख राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षांना २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आपापल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. निवडणूक जिंकायची असेल तर उत्तर प्रदेश राज्यात चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. हाच विचार लक्षात घेता सांप्रदायिक पक्ष अशी प्रतिमा निर्माण होऊ नये यासाठी भाजपा पक्ष पुरेपूर काळजी घेत आहे. भाजपाने माजी आमदार संगीत सोम यांना कथित ‘लव्ह जिहाद’आणि कथित बळजबरीने धर्मांतर करण्याच्या मोहिमेला विरोध दर्शवणारी यात्रा पुढे ढकलण्याचा आदेश दिला आहे.
हेही वाचा>> पाणी टंचाई, कापूसप्रश्नामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांची कोंडी
सोम यांनी केले होते ‘लव्ह जिहाद विरोधी’ यात्रेचे आयोजन
माजी आमदार संगीत सिंह सोम यांचे राजकीय करिअर सध्या धोक्यात आहे. असे असतानाच पक्षात आपले स्थान निर्माण करण्याठी त्यांनी येत्या ३० जून रोजी लव्ह जिहादला विरोध करणारी यात्रा आयोजित केली होती. मात्र ही यात्रा आयोजित न करण्याचा आदेश त्यांना पक्षाने दिला आहे. २०१३ साली झालेल्या मुझफ्फरनगर येथील दंगलीत सोम आरोपी होते. नंतर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. सोम हे मेरठ येथील सरधाना मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले आहेत. या यात्रेबद्दल बोलताना “येत्या ३० जून रोजी मेरठमधील सालवा ते गाझियाबाद अशा यात्रेचे मी आयोजन केले होते. ही यात्रा मी स्थगित केली नसून फक्त पुढे ढकलली आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यामुळे भाजपा पक्षाकडून महासंपर्क अभियान राबवले जात आहे. त्यामुळे माझी यात्रा पुढे ढकलण्याचे मला पक्षाने सांगितले,” असे सोम यांनी सांगितले.
“मी सध्या उचललेला मुद्दा खूप महत्त्वाचा आणि प्रासंगिक आहे. एकाच समुदायाची लोकसंख्या वाढणे हे फार धोकादायक आहे. आपण आताच योग्य ती खबरदारी न घेतल्यास आगामी काळात देशातील हिंदू समाज हा मागासवर्ग म्हणून ओळखला जाईल,” असेही सोम म्हणाले.
हेही वाचा>> हरियाणामध्ये भाजपा-जेजेपी यांच्यातील युती तुटणार? मनोहरलाल खट्टर यांच्या विधानामुळे संभ्रम वाढला!
‘भाजपा जातीच्या आधारावर भेदभाव करत नाही’
भाजपाच्या ट्रेड सेलचे प्रमुख विनीत शारदा यांनादेखील सोम यांच्या यात्रेवर भाष्य केले आहे. “भाजपा पक्ष जातीच्या आधारावर भेदभाव करत नाही. पक्षाच्या नेतृत्वाने सोम यांना त्यांची यात्रा पुढे ढकलण्यास सांगितले आहे. या यात्रेमुळे आमचा पक्ष कोणत्याही एकाच समाजाच्या विरोधात आहे, असा संदेश जाण्याची शक्यता होती. आम्हाला आगामी लोकसभा निवडणूक जिंकायची आहे. आम्हाला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे पक्षाच्या प्रतिमेस हानी पोहोचू शकते,” असे शारदा म्हणाले.
भाजपाची २०१७ आणि २०२२ च्या निवडणुकीत कशी कामगिरी होती?
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये १२६ जागांपैकी भाजपाचा १०० जागांवर विजय झाला होता. २०२२ च्या निवडणुकीत मात्र भाजपाला ८५ जागांवर विजय मिळवता आला होता. उरलेल्या ४१ जागांवर समाजवादी पार्टी आणि आरएलडी पक्षाने एकूण ४१ जागांवर विजय मिळवला होता. भाजपाने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत शामली जिल्ह्यात ३ जागा मेरठमध्ये ७, मुझफ्फरनगरमध्ये ६ जागा गमावल्या. या तिन्ही जिल्ह्यांत जाट समाजाचे मतदार बहुसंख्य आहेत. येथे मुस्लीम मतदारांचेही प्रमाण लक्षणीय आहे.
हेही वाचा>> अमित शहांच्या भाषणात उद्धव ठाकरेंचा ११ वेळा उल्लेख
मुस्लिमांना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सोम यांचा सरधाना मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या अतुल प्रधान यांनी पराभव केला होता. सोम कधीकाळी भाजपाच्या हिंदुत्वाचा चेहरा होते. मात्र या निवडणुकीत सोम यांचा पराभव भाजपासाठी मोठा धक्का होता. या भागात एसपी आणि आरएलडी पक्षाचा प्रभाव बऱ्यापैकी आहे. त्यामुळे भाजपाकडून पशमांदा मुस्लिमांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच कारणामुळे भाजपा येथे जपून पाऊल टाकत आहे. सध्याच्या कुस्तीपटुंच्या आंदोलनाचाही भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे.
भाजपाकडून मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मुस्लीम समाज भाजपाच्या पाठीशी नाही, असा दावा समाजवादी पक्षाचे मेरठचे माजी प्रमुख राजपाल सिंह यांनी केला आहे. “मुस्लिमांचे मन जिंकण्यासाठी भाजपाकडून अटोकाट प्रयत्न केला जात आहे. भाजपासाठी मुस्लिमांची मतं ही ‘बोनस मतं’ आहेत. मात्र भाजपाला अल्पसंख्याकांची १ टक्केदेखील मतं मिळत नाहीत,” असा दावा राजपाल सिंह यांनी केला आहे.
मुस्लीम मतदार भाजपाला मत देणार नाही, समाजवादी पार्टीचा दावा
तर मेरठ भाजपाचे विद्यमान प्रमुख जयपाल सिंह यांनी भाजपाचे लोक मुस्लिमांची मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना यात यश मिळणार नाही, असा दावा केला आहे. “आगामी निवडमुकीत मुस्लिमांची मतं बळकवता येतील, असे भाजपाला वाटत असेल तर ते त्यांचे दिवास्वप्न आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाचे काही नगरसेवक निवडून आले आहेत. काही पालिकांवर भाजपाचे प्रमुख आहेत. असे असले तरी या लोकांच्या जीवावार मुस्लिमांची मतं मिळतील, असा समज भाजपाने करू नये. मुस्लीम लोकांनी नेहमीच समाजवादी पार्टीला साथ दिलेली आहे. भविष्यातही हा समाज समाजवादी पार्टीच्याच पाठीशी राहणार आहे,” असे जयपाल सिंह म्हणाले.
हेही वाचा>> सचिन पायलट लवकरच नव्या पक्षाची घोषणा करणार? काँग्रेस पक्ष म्हणतो ही तर फक्त अफवा; राजस्थानमध्ये नेमकं काय घडतंय?
सोम कोण आहेत?
मुझफ्फरनगर दंगलीची चौकशी करण्याची जबाबदारी न्यायाधीश विष्णू साहाई समितीकडे सोपवण्यात आली होती. या समितीने संगीतसिंह सोम यांनी प्रक्षोभक वक्तव्ये केली होती. त्यामुळे दंगलीला चालना मिळाली, असे मत मांडले होते. या दंगलीत एकूण ६२ लोकांचा मृत्यू झाला होता. तर ५० हजार लोलांना स्थलांतर करावे लागले होते. पुढे या खटल्यात सोम यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तसेच त्यांच्यावरील आरोप नंतर मागे घेण्यात आले होते.