मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली होती. पण महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून वंचितचे फिसकटले. आता वंचितने यापूर्वी युती केलेल्या उद्धव ठाकरे गटाला अडचणीत आणण्याची खेळी केली आहे. वंचितचे बहुतांशी उमेदवार हे ठाकरे गटाच्या विरोधात रिंगणात आहेत.
मुंबईत मुस्लिम धर्मीयांची यावेळी ठाकरे गटाला सहानुभूती आहे. मुंबईतल्या सहापैकी चार जागा ठाकरे गट लढवतो आहे. यातील मुंबई दक्षिण -मध्य, मुंबई ईशान्य आणि मुंबई दक्षिण या ठाकरे गटाच्या तिन्ही मतदारसंघात ‘वंचित’ने जाणीवपूर्वक मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. ‘वंचित’चे राज्यात सहा मुस्लिम उमेदवार असून महाविकास आघाडीने (‘मविआ’) एकही मुस्लिम उमेदवार दिला नसल्याचा वंचित प्रचार करत आहे.
हेही वाचा – इंदूरमध्ये काँग्रेसचा ‘NOTA’साठी प्रचार; भाजपा अडचणीत?
‘वंचित’ने राज्यात सहा मतदारसंघात स्वत:हून इतर उमेदवारांना पाठिंबा दिला. त्यामध्ये कोल्हापूर, बारामती, नागपूर मतदारसंघ असून दोन मतदारसंघात काँग्रेस आणि एका मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार आहे. ठाकरे गट राज्यात २१ मतदारसंघात लढत असून वंचितने या गटाला एकाही मतदारसंघात पाठिंबा दिलेला नाही.
शिवसेना ठाकरे गटाचे शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे, सांगलीत चंद्रहार पाटील आणि हिंगोलीत नागेश पाटील अष्टीकर या तीन मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या विरोधात वंचित उमेदवारांचे अर्ज अवैध होवूनही पाठिंब्यासाठी ठाकरे गटाऐवजी स्थानिक पक्षाच्या उमेदवारांना आंबेडकर यांनी पसंती दिली आहे.
रागाचे कारण काय ?
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी २३ जानेवारी २०२३ रोजी युती जाहीर केली. महाविकास आघाडीत प्रवेश नसला तरी उद्धव आणि आपली युती राहील, असे आंबेडकर यांना अपेक्षीत होते. मात्र ठाकरे यांनी वंचितबरोबर युती शक्य नसल्याचे २३ मार्च २०२४ रोजी स्पष्ट केले. याचा राग आंबेडकर यांना असून ठाकरे गटाला ताकद दाखवून देण्याची रणनीती आखल्याचे समजते. यामागे भाजपचा हात असल्याचा संशय ठाकरे गटाकडून व्यक्त केला जातो.
आमची शिवसेनेशी युती झाली होती. महाविकास आघाडीत आम्ही नाही आहोत, यापेक्षा शिवसेनेने युती निभावली नाही, हे क्लेशकारक होते. आम्ही ठाकरे गटाच्या उमेदवारांना पाठिंबा कदाचित दिला असता, पण त्यांच्या पक्षप्रमुखांनी तशी विनंती करायला हवी होती. – रेखा ठाकुर, प्रदेशाध्यक्ष वंचित आघाडी