Manoj Jarange on Devabhau advertisement controversy राज्यभरात मुद्रित माध्यमे, फ्लेक्स आणि इतर माध्यमांतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रसिद्ध झालेली जाहिरात महाराष्ट्रातील राजकीय चर्चांच्या केंद्रस्थानी आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आझाद मैदानात आंदोलन केल्यानंतर फडणवीस सरकारने यशस्वी तोडगा काढला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निनावी जाहिराती राज्यभरात झळकल्याने विरोधक जोरदार टीका करताना दिसत आहेत.
मुख्य म्हणजे एका पत्रकार परिषदेदरम्यान मनोज जरांगे पाटील यांना या जाहिरातींबद्दल विचारले असता, त्यांनीदेखील यावर महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. फडणवीसांच्या जाहिरातीवरून राजकीय वाद निर्माण होण्याचे कारण काय? विरोधकांनी नक्की काय आरोप केले? मनोज जरांगे पाटील याविषयी काय म्हणाले? त्याविषयी जाणून घेऊयात…
काय आहे देवाभाऊ कॅम्पेन?
- राज्यभरात ठिकठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर झळकले आहेत. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करताना दिसत आहेत आणि फोटोखाली ‘देवाभाऊ’ लिहिले आहे.
- ही जाहिरात कुणी लावली, याबद्दल बॅनरवर कोणताही उल्लेख केलेला नाही. तसेच यावर पक्षाचे नावदेखील नाही.
- मात्र, मराठा आरक्षणात तोडगा काढल्याबद्दल हे कॅम्पेन राबविले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
जाहिरातीवरून विरोधकांचे आरोप
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’वर ट्विट करत म्हटले आहे की, “एकीकडे राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली; परंतु मा. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत हा विश्वास होता.” ते पुढे म्हणाले, या कोट्यावधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्या असल्याचे समजले आणि विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपाचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असेदेखील कळत आहे.”
रोहित पवार पुढे म्हणाले, “मला मिळालेली माहिती खरी असेल तर मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या? या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले? हा मंत्री कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील.”
“जाहिरातींसाठी काळा पैसा खर्च”
संजय राऊत यांनीदेखील या जाहिरातींवर टीका केली आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला आणि म्हटले की, या जाहिरातींवर ४० ते ५० कोटींचा खर्च झाला आहे. त्या जाहिरातीत प्रकाशकाचे नाव नाही. ज्याने जाहिराती दिल्या त्याने आपले नाव का लपवले, हे जनतेला समजले पाहिजे, ” असेही ते म्हणाले.
त्यांनी पुढे आरोप केला की, “जाहिरातींवर ४० ते ५० कोटींचा खर्च झाला आहे. जाहिरातदार कोण? हे जाणीवपूर्वक लपवले आहे, त्यामुळे हा सर्व काळा पैसा खर्च झाला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयातून कोणाला काही सूचना दिल्या होत्या का? याचा शोध घ्यावा,” असेही ते म्हणाले. “मराठा आरक्षणाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काहीही संबंध नाही. भाजपा राजकीय राजकारण करून शिवाजी महाराजांचे नाव खाली आणण्याचे काम करत आहे. अरबी समुद्रात महाराजांचे स्मारक उभारणार होता, त्याचे काय झाले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
जाहिरातीवर जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया
पत्रकारांनी फडणवीसांच्या जाहिरातींवर प्रश्न केला असता जरांगे म्हणाले, “कुणीही बॅनर लावा किंवा काहीही करा, मात्र जीआरची अंमलबजावणी लवकरात लवकर करा. मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे, ज्यांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी सापडल्या त्या नोंदी घेऊन तुम्ही तातडीने प्रमाणपत्र द्या. माझे सरकारला विशेष सांगणे आहे की, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ खानदेश या सगळ्या प्रांतात नोंदी शोधायचे काम शिंदे समितीने सुरू करावे. आम्ही सरकारचे कौतुकच करू, आम्हाला राजकारणाचे काहीही करायचे नाही,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “गॅझेटीयरच्या नोंदी ताबडतोब घेऊन मराठवाड्यातल्या मराठ्यांना प्रमाणपत्र वितरीत होणे गरजेचे आहे,” असेही ते म्हणाले.