BJP Won How Many States in India : गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमतापासून रोखण्यात विरोधक यशस्वी झाले होते; पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुका जिंकून भाजपाने पुन्हा एकदा विजयाची गती पकडली आहे. गेल्या वर्षभरातील पाच निवडणुकांपैकी झारखंड वगळता सर्वच राज्यांमध्ये विरोधकांची पीछेहाट झाली आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतही सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचाच दरारा पाहायला मिळाला आहे. राज्यात सत्ताविरोधी लाट असतानाही एनडीएने २४३ पैकी तब्बल २०२ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला (३५ जागा) दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष
बिहारच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ८९ जागांवर विजय मिळवला; तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाला ८५ जागांवर यश मिळाले. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीनेही चांगली कामगिरी करीत १९ जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. महाआघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राजदला मात्र २५ जागांवरच समाधान मानावे लागले. काँग्रेसची परिस्थिती आणखीच बिकट होऊन, त्यांना केवळ सहा जागांवरच विजय मिळवता आला. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीतही बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीनेच ४० पैकी तब्बल ३० जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपा आणि जनता दल युनायटेड पक्षाला प्रत्येकी १२ आणि लोक जनशक्ती पार्टीने पाच जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत विरोधकांच्या महाआघाडीला केवळ नऊ जागाच जिंकता आल्या होत्या. उर्वरित एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला होता.

लोकसभा निवडणुकीत बसला होता फटका
लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह विरोधकांच्या आघाडीने चांगली कामगिरी केल्यामुळे भाजपाची ‘४०० पार’ची गाडी फक्त २४० जागांवरच अडकली होती. या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी सुधारली आणि पक्षाला ९९ जागा मिळाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीतील भाजपाची पीछेहाट सुरू होईल, असे चित्र निर्माण झाले होते; पण गेल्या वर्षभरात झालेल्या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा कल लक्षात घेतल्यास भाजपाने विरोधकांवर मात केल्याचे दिसून येते. जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपाला सत्ता मिळाली नसली तरी जम्मू भागातील २९ जागा जिंकून भाजपाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. झारखंडमध्ये सत्तेत येण्याचे भाजपाचे स्वप्न मात्र धुळीस मिळाले आहे. तेथे झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस व राष्ट्रीय जनता दल या इंडिया आघाडीने भाजपाला मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्रासह हरियाणा, दिल्ली आणि आता बिहारमध्ये भाजपाने विरोधकांवर मात करीत पुन्हा एकदा विजयाची गती पकडली आहे.

महाराष्ट्रात महायुतीचा दणदणीत विजय
नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत महायुतीने २८८ पैकी तब्बल २३२ जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत १३२ जागा जिंकून भाजपा क्रमांक १ चा पक्ष ठरला होता. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गट ५७ जागा आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला ४१ जागांवर यश मिळाले होते. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या विरोधकांच्या महाविकास आघाडीला मात्र ४६ जागांवरच समाधान मानावे लागले होते.

ओडिशातही भाजपाचा दणदणीत विजय
गेल्या वर्षीच्या ओडिशा विधानसभा निवडणुकीतही भाजपाने दणदणीत विजय मिळवून राज्यात पहिल्यांदा सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक ७८ जागा जिंकल्या होत्या; तर बिजू जनता दल पक्षाला ५१ आणि काँग्रेसला फक्त १४ जागांवरच समाधान मानावे लागले होते. या निकालाने नवीन पटनायक यांच्या अडीच दशकांच्या सत्तेला पूर्णविराम मिळाला होता. त्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाने ओडिशातील २१ पैकी तब्बल २० जागांवर दणदणीत विजय मिळवला होता; तर विरोधकांना केवळ एकच जागा जिंकता आली होती.

हरियाणा-दिल्लीमध्येही भाजपाचेच सरकार
गेल्या वर्षीच्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव निश्चित मानला जात होता. विशेष बाब म्हणजे- पक्षाचे नेतेही विजयाबाबत साशंक होते; पण काँग्रेसमधील गटबाजी, तसेच जातीपातीच्या राजकारणाचा भाजपाला फायदा झाला. हरियाणामध्ये विरोधी वातावरण असतानाही बिगरजाट मतांच्या ध्रुवीकरणाने भाजपाला पुन्हा सत्ता मिळाली. आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देशम पार्टीच्या मदतीने भाजपाने सत्ता स्थापन केली; तर मध्य प्रदेशमध्ये सत्ताविरोधी लाट असतानाही भाजपाने आपली सत्तेवरील पकड कायम ठेवली.

दिल्लीमध्ये भाजपाने जवळपास तीन दशकांनंतर सत्ता मिळवून आपली ताकद दाखवून दिली. या निवडणुकीत भाजपाने ७० पैकी ४८ जागा जिंकून स्वबळावर बहुमताचा आकडा गाठला होता. आता भाजपाने बिहारमध्येही चांगली कामगिरी करीत सत्तास्थापनेच्या दिशेने पावले टाकली आहेत. दरम्यान, विरोधक एकत्र राहिले, तरच भाजपाला आव्हान देऊ शकतात हे लोकसभा निवडणूक निकालाने दाखवून दिले आहे. आता तर काँग्रेसची साथ मित्रपक्षांना नकोशी झाल्याने भाजपाची बाजू आणखीनच मजबूत झाल्याचे दिसून येत आहे.
