छत्रपती संभाजीनगर – उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, माजीमंत्री, आमदार धनंजय मुंडे व पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे अभीष्टचिंतन करणारे फलक काही समर्थकांकडून परळीत लावण्यात आले असून, त्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून दोषारोपपत्रात नाव असलेल्या वाल्मीक कराडचेही छायाचित्र झळकत आहे. त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. मात्र, वाल्मीकचे छायाचित्र काही जणांनी लावले असेल. परंतु पक्षाच्या अधिकृत फलकावर वाल्मीकचे कुठलेही छायाचित्र नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार धनंजय मुंडे यांचा वाढदिवस एकाच आठवड्यात येत असल्याने परळीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून १५ ते २२ जुलै दरम्यान सेवा-संकल्प-सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, उभय नेत्यांसह पर्यावरणमंत्री यांचाही वाढदिवस याच महिन्यातील शेवटच्या आठवड्यात असल्याने त्यांच्यासह अजित पवार, धनंजय मुंडेंनाही शुभेच्छा देण्यासाठी काही समर्थकांनी परळीतील प्रमुख ठिकाणी फलकबाजी सुरू केली आहे. पोलीस ठाण्यासमोरच्या दोन फलकावर परळीच्या एका समर्थकाने अजित पवार, धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंचे मोठे छायाचित्र आणि सोबत वाल्मीक कराड, धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांचेही छायाचित्र असलेला फलक लावलेला असून, त्याची शहरभर आणि बीड जिल्ह्यातही चर्चा सुरू झाली आहे.

पक्षाचे प्रमुख नेते, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचा वाढदिवस एकाच आठवड्यात येत असल्याने त्यानिमित्त पक्षाकडून विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याला सेवा संकल्प-सप्ताह, असे नाव दिलेले असून, त्यासंदर्भाने पक्षाकडून लावण्यात आलेल्या अधिकृत फलकावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, स्थानिक मंत्री या नात्याने पंकजा मुंडे, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड, आदी प्रमुख नेत्यांची छायाचित्रे आहेत. – बाजीराव धर्माधिकारी, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.