बदलापूरः बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी विद्यमान भाजप आमदार किसन कथोरे यांच्याविरुद्ध बंडाचे निशाण फडकवल्याने महायुतीत पेच निर्माण झाला होता. त्यातच किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेच्या अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी नेमणूक केली आहे. म्हात्रे यांना अंबरनाथ विधानसभेत व्यस्त ठेवण्यासाठी निर्णय घेण्यात आला की म्हात्रे यांनीच स्वतःला मुरबाडच्या प्रचारापासून दूर ठेवण्यासाठी याबाबत आग्रह धरला, अशा चर्चा रंगल्या आहेत.

मुरबाड विधानसभा मतदारसंघाची मागणी करत काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी महायुतीच्या गोटात खळबळ निर्माण केली होती. भाजपचे आमदार किसन कथोरे स्थानिक शिवसैनिकांना निर्णयात सहभागी करून घेत नाही, विश्वासात घेत नाही असाही आरोप म्हात्रे यांनी त्यावेळी केला होता. त्यातच ही जागा भाजपला गेल्यास स्वतः अपक्ष उमदेवारी अर्ज दाखल करणार असेही म्हात्रे यांनी जाहीर केले होते. महायुतीचा उमेदवार म्हणून अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी आमदार किसन कथोरे यांनी वामन म्हात्रे यांच्या निकटवर्तीय शिवसेना उपशहरप्रमुख तेजस म्हस्कर यांना भाजपात प्रवेश दिला. त्यामुळे शिवसेनेत आणखीच अस्वस्थता पसरली. या पार्श्वभूमीवर वामन म्हात्रे यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली होती. कथोरे यांच्या प्रचारात शिवसेना आणि विशेषतः वामन म्हात्रे किती सक्रीय राहतात, त्याचा किती फटका कथोरे यांना बसेल अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यातच सोमवारी आमदार किसन कथोरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले होते. शिवसैनिकांची समजूत काढण्यासाठी ही भेट होती की काय असा प्रश्न विचारला जात होता. म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज भरला नाही. त्यामुळे शिंदे यांनी म्हात्रे यांची समजूत काढल्याची चर्चा होती. त्यातच वामन म्हात्रे यांची अंबरनाथ विधानसभा संपर्कप्रमुख पदावर अचानक नेमणूक करण्यात आली. म्हात्रे यांची यापूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्व विधानसभेचे निरीक्षक म्हणून नेमणूक झाली होती. त्यामुळे या नेमणुकीमागे अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

हेही वाचा – बंडाळीमुळे राजकीय समीकरण बदलणार, ‘अकोला पश्चिम’मध्ये महायुती व मविआची डोकेदुखी वाढली

हेही वाचा – पुसदमध्ये नाईक घराण्यात उभी फूट, सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वामन म्हात्रे यांना मुरबाडच्या प्रचारापासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याचवेळी किसन कथोरे यांच्या प्रचारापासून दूर राहण्यासाठी, महायुतीच्या नावे होणारी टीका टाळण्यासाठीच स्वतः म्हात्रे यांनीच या पदाची इच्छा व्यक्त केली असावी अशीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे म्हात्रे यांच्या नव्या नियुक्तीने नेमका कुणाला फायदा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.