नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी विश्व भारतीने त्यांना एक नोटीस धाडली असून संबंधित जमीन रिकामी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आरोपांनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अमर्त्य सेन यांचं समर्थन केलं आहे. सोमवारी त्यांनी अमर्त्य सेन यांच्या बीरभूम येथील घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी संबंधित जमीन अमर्त्य सेन यांचीच असल्याचे कागदोपत्री पुरावे राज्य सरकारच्या वतीने सादर केले.

यावेळी ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञाचा भाजपाकडून अपमान करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या, “विश्व भारती विद्यापीठाने अमर्त्य सेन यांना एक नोटीस पाठवली होती. ज्यामध्ये सेन यांनी विद्यापीठाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप होता. तसेच संबंधित जमीन परत देण्याची मागणी नोटीसद्वारे करण्यात आली होती. यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांना जमिनीचे रेकॉर्ड तपासायला सांगितले. आम्ही जमिनीच्या मूळ नोंदी शोधल्या असून ती जमीन सेन यांचीच असल्याचं समोर आलं आहे. विद्यापीठ प्रशासन खोटं बोलत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर ममता बॅनर्जी यांनी नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांना राज्य सरकारच्या जमिनीच्या नोंदी असलेली कागदपत्रं सुपूर्द केली. यावेळी भाजपावर निशाणा साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “ते तुमचा अवमान करत आहेत. ते पाहून खूप वाईट वाटलं, त्यामुळे मी व्यक्तीश: तुम्हाला भेटायला आले. मी सरकारी अधिकाऱ्यांना संबंधित विवादित जमिनीचं सर्व्हेक्षण करण्यास सांगितलं असता, ती जमीन तुमचीच असल्याचं निष्पन्न झालं आहे. याबाबतचे पुरावे आम्हाला सापडले आहेत. त्यामुळे तुम्हाला कुणीही प्रश्न विचारू शकत नाही.”

“ज्येष्ठ अर्थतज्ज्ञाचा अपमान का केला जात आहे? त्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे का? शिक्षणाच्या भगवीकरणाऐवजी विश्व भारती विद्यापीठ योग्यरित्या चालवावी अशी माझी इच्छा आहे,” असंही मुख्यमंत्री बॅनर्जी पुढे म्हणाल्या.