येत्या २२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या अयोध्येतील राम मंदिरातील राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. या सोहळ्यासाठी देशातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या राजकीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र या सोहळ्याला हजर राहण्यास आदरपूर्वक नकार दिला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांची या सोहळ्याबाबत काय भूमिका आहे, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. दरम्यान, त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असून त्या या सोहळ्याला अयोध्येत जाणार नाहीत. त्याऐवजी पश्चिम बंगालमधील काली मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेणार आहेत.

पायाभूत सुविधांची निर्मिती करणे हे आमचे प्रमुख काम

ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या २२ जानेवारी रोजीच्या कार्यक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. “प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे हे आमचे काम नाही. ते काम साधू-संतांचे आहे. अयोध्येत जाऊन आम्ही काय करणार? एक राजकारणी म्हणून पायाभूत सुविधांची निर्मिती करणे हे आमचे प्रमुख काम आहे. तेच काम मी करणार आहे,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

पश्चिम बंगालमध्ये सर्व धर्म रॅलीचे आयोजन

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसकडून २२ जानेवारी रोजी ‘सर्व धर्म’ रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये सर्व धर्माच्या, पंथाच्या लोकांनी सामील व्हावे, असे आवाहन तृणमूल काँग्रेसने केले आहे. या रॅलीमध्ये वेगवेगळ्या धर्माच्या धार्मिक स्थळांनाही भेट दिली जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काली मंदिराच्या भेटीनंतर रॅलीमध्ये सहभागी होणार

“गेल्या अनेक दिवसांपासून मला राम मंदिराबाबत विचारले जात आहे. मी याआधीच सांगितलेले आहे. धर्म फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित असतो. मात्र सोहळा हा प्रत्येकासाठी असतो. मी २२ जानेवारीला अगोदर काली मंदिरात जाणार आहे. त्यानंतर मी सर्वधर्मीय हजरा ते पार्क सर्कस मैदान येथील रॅलीमध्ये सहभागी होणार आहे. या रॅलीदरम्यान आम्ही मशीद, मंदिर, चर्च, गुरुद्वारा अशा वेगवेगळ्या धार्माच्या धार्मिक स्थळांना भेट देणार आहोत. या रॅलीमध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो,” असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.