What is Kharchi and Parchisystem in Haryana: हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. सर्वच पक्षांच्या प्रचाराला आता वेग आला आहे. भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभांचा सपाटा लावला असून ते काँग्रेसवर जोरदार टीका करत आहेत. २०१४ पासून हरियाणामध्ये भाजपाचे सरकार आहे. त्याआधी २००४ ते २०१४ इथे काँग्रेसचे राज्य होते. पंतप्रधान मोदी काँग्रेसच्या राजवटीवर टीका करताना पर्ची आणि खर्ची या दोन शब्दांचा उल्लेख करत आहेत. काँग्रेसच्या कार्यकाळात खर्ची, पर्ची व्यवस्थेमुळे भ्रष्टाचार बोकाळला होता, वशिलेबाजी आणि लाच दिल्याशिवाय नोकरी मिळत नव्हती, असा आरोप त्यांनी केला.

सोनिपत येथे बुधवारी (२५ सप्टेंबर) जाहीर सभेत बोलत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “भ्रष्ट काँग्रेसने हरियाणाची लूट केली, त्यामुळेच तुम्ही त्यांना सत्तेपासून दूर ठेवले.” तसेच त्याआधी कुरुक्षेत्र येथे झालेल्या सभेत ते म्हणाले होते, “भाजपाने खर्ची, पर्ची या भ्रष्ट पद्धतीला कायमचे बंद करून १.५ लाख युवकांना पारदर्शक पद्धतीने सरकारी नोकऱ्या दिल्या.”

भाजपाने हरियाणा विधानसभेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यातही याचा उल्लेख केलेला दिसतो. “पुढील काळात दोन लाख युवकांना खर्ची, पर्ची न घेता सरकारी नोकरी दिली जाईल”, असे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

खर्ची, पर्ची संकल्पना काय आहे?

हरियाणामध्ये भाजपा आणि काँग्रेस या दोन पक्षांत प्रमुख लढत आहे. सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही पक्षांनी जोरकस प्रयत्न सुरू केले आहेत. प्रचारामध्ये दोन्ही बाजूंनी कायमची सरकारी नोकरी (पक्की नोकरी) हा मुद्दा केंद्रस्थानी आणला आहे. सत्तेत आल्यास लाखो युवकांना सरकारी नोकरीत कायमचे सामावून घेण्यात येईल, असे आश्वासन सर्वच पक्ष आणि उमेदवार देत आहेत. भाजपाने दोन लाख युवकांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे, तर काँग्रेसने अशाचप्रकारे सरकारी विभागातील दोन लाख रिक्त पदे भरली जातील असे सांगितले आहे. दुसरीकडे इंडियन नॅशनल लोक दल (INLD) या पक्षाने सत्ता आल्यास पहिल्या वर्षात एक लाख सरकारी नोकऱ्या आणि बेरोजगारांना प्रति महिना २१ हजारांचा भत्ता देण्याचे वचन दिले आहे.

INLD या पक्षाने १९९९ ते २००५ या काळात माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते. यावेळी बहुजन समाज पक्षाशी युती करून INLD निवडणूक लढवत आहे.

भाजपाच्या म्हणण्यानुसार, ‘पर्ची’ म्हणजे सत्तेमधील एखाद्या नेत्याचे शिफारस पत्र देऊन किंवा वशिला लावून सरकारी नोकरी मिळवणे; तर ‘खर्ची’ म्हणजे नोकरी मिळविण्यासाठी लाच देणे. काँग्रेसच्या काळात हा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तसेच या खर्ची, पर्चीच्या माध्यमातून काँग्रेसने विविध पदांसाठी एक रेट कार्डही तयार केले होते, असाही आरोप करण्यात आला आहे.

भाजपाची सत्ता आल्यानंतर ही पद्धत बंद झाली का?

हरियाणा भाजपाचे मुख्य प्रवक्ते जवाहर यादव यांनी दावा केला की, भाजपाची सत्ता आल्यानंतर पर्ची आणि खर्ची व्यवस्था पूर्णपणे बंद झाली आणि आम्ही १.४३ लाख पदे पारदर्शक पद्धतीने गुणवत्तेच्या आधारावर भरली आहेत. तसेच भाजपाने दशकभरात काँग्रेसपेक्षाही अधिक नोकऱ्या देऊ केल्या आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही दावा केला होता की, राज्यातून खर्ची, पर्ची पद्धत पूर्णपणे हद्दपार करण्यात आली आहे.

मागच्या आठवड्यात जवाहर यादव यांनी काँग्रेस नेत्याचा एक व्हिडीओ एक्सवर शेअर केला होता, ज्यामध्ये तो नेता म्हणतो की, तुम्ही फक्त तुमचा अर्ज (पर्ची) घेऊन या, ज्यावर तुमचा रोल नंबर लिहिलेला असेल. त्यानंतर हा इसम म्हणतो की, तुमचा अर्ज भूपिंदर सिंह हुडा यांच्यापर्यंत मी घेऊन जाईन आणि तुम्हाला नोकरी मिळवून देण्याचे काम मी करेन.

काँग्रेसने काय प्रत्युत्तर दिले?

हरियाणा काँग्रेसचे प्रवक्ते केवल धिंग्रा यांनी भाजपाचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले. “हरियाणामध्ये खर्ची, पर्ची अशी कोणतीही पद्धत नव्हती. भाजपाकडून अपप्रचार केला जात असून बोगस व्हिडीओ तयार करून व्हायरल करण्यात येत आहेत. काँग्रेसचे सरकार असताना पारदर्शक पद्धतीने नोकरभरती केली जात होती. उलट भाजपाच्या काळातच नोकरी मिळविण्यासाठी ‘सुटकेस संस्कृती’ सुरू झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरियाणा लोकसेवा आयोगाच्या सचिवांना २०२१ मध्ये अटक झाली होती, असेही धिंग्रा यांनी निदर्शनास आणून दिले. दंत शल्यचिकित्सकांची भरती होत असताना उमेदवारांच्या मार्कात फेरफार करण्यासाठी संबंधित सचिवांनी लाच घेतली होती, असा आरोप त्यांनी केला. भाजपाच्या काळात लाखो नोकऱ्या दिल्या गेल्या का? या प्रश्नावर बोलताना धिंग्रा म्हणाले की, भाजपाने हंगामी भरती केली असून ज्यांना तात्पुरत्या स्वरुपात काम मिळाले आहे, त्यांना रोजंदारी पद्धतीवर काम करावे लागत आहे.