संतोष प्रधान

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही एकनाथ शिंदे गटाकडे सोपविण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मोठी कोंडी झाली आहे. एकीकडे कायदेशीर आघाडीवर किल्ला लढवायचा असतानाच दुसरीकडे शिवसैनिकांचे मनोधैर्य उंचावण्याबरोबरच शिवसेनेचे सामान्य मतदार आपल्याबरोबरच राहतील यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

शिवसेना हे नाव आता ठाकरे यांना वापरता येणार नाही. तसेच सध्या पक्षाकडे असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) हे पक्षाचे नाव कसबा पेठ आणि चिंचवड या दोन मतदारसंघांतील पोटनिवडणुका पार पडेपर्यंत म्हणजेच या महिनाअखेर वापरता येईल. परिणामी ठाकरे नावाविना शिवसेना हे समीकरण शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच घडले आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह गेल्याने उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नवीन नाव मिळवून पक्षाची नव्याने बांधणी करावी लागेल.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्यात घोषणांचा पाऊस पण कापूस दरवाढीवर मौन

निवडणूक आयोगाच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल करण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येईल. तसे उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर लगेचच जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या निकालाला स्थगिती आदेश मिळविण्यासाठी ठाकरे गट प्रयत्न करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यास ठाकरे यांना तात्पुरता दिलासा मिळू शकेल.

सर्वोच्च न्यायालयाने सध्या स्थगिती दिली पण कालांतराने ती उठविली किंवा स्थगिती देण्यास नकार दिल्यास ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडे पक्षाचे नवे नाव आणि चिन्हासाठी अर्ज करावा लागेल. हे करताना शिवसेना या नावाचा पक्षाच्या नव्या नावात समावेश असावा, असा ठाकरे गटाचा प्रयत्न असेल. कारण काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर समाजवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, वायएसआर काँग्रेस, महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस अशा पद्दतीने नावात काँग्रेस असलेले अनेक पक्ष तयार झाले. तसेच जनता पक्षात फुूट पडल्यावर जनता दल (से), जनता दल (यू) असे जनता दल नाव असलेले पक्ष अस्तित्वात आहेत. मात्र शिवसेना नाव वापरून देण्यास शिंदे गटाने आक्षेप घेतल्यास पुन्हा कायदेशीर लढा सुरू होईल.

हेही वाचा >>> भाजपची काँग्रेस होईल ही भीती फडणवीस यांना का वाटते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारण अन्य काँग्रेस किंवा जनता दलात फूट पडली होती. शिवसेनेत फुट पडलेली नसून आम्ही नेता बदलला असा शिंदे गटाचा दावा आहे. यामुळेच ठाकरे गटाला शिवसेना (उदा. उद्धव शिवसेना, ठाकरे शिवसेना) हे नाव वापरण्यास सहजासहजीा मिळणेही सोपे नाही. कायदेशीर लढाईबरोबरच शिवसेनेचे कार्यकर्ते दुरावणार नाहीत याची खबरदारी ठाकरे यांना घ्यावी लागेल. यासाठी शिवसैनिकांचे मनोधैऱ्य उंचाविण्याकरिता प्रयत्न करावे लागतील. शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांची संख्या लक्षणिय आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये राज्यात शिवसेनेला सरासरी १८ ते २० टक्के मते मि‌ळाली आहेत. ही मते शिंदे गटाकडे वळणार नाहीत यासाठी ठाकरे यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.