BJP allies meeting Delhi उत्तर प्रदेशातील भाजपाचे काही मित्रपक्ष चर्चेसाठी दिल्लीत पोहोचले. मात्र, या बैठकीत सत्ताधारी पक्षाचे प्रमुख नेते अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. पीडीए (पिछडा, दलित, अल्पसंख्याक) मंच म्हणणाऱ्या जाट, राजभर, निषाद आणि पटेल या इतर मागासवर्गीय (ओबीसी) समुदायांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चार पक्षांनी बुधवारी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये बैठक घेतली. या बैठकीने भाजपा आणि विरोधी पक्ष अशा दोघांचेही लक्ष वेधून घेतले. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? भाजपाचे नेते अनुपस्थित असण्याचे कारण काय? जाणून घेऊयात.

भाजपाच्या मित्रपक्षांची बैठक कशासाठी?

  • भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि इतर ज्येष्ठ नेत्यांना या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले होते, मात्र या बैठकीत भाजपा नेत्यांची अनुपस्थिती दिसून आली.
  • मुख्य म्हणजे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशमधील इतर वरिष्ठ भाजपा नेतेही अनुपस्थित होते.
  • मात्र, अनुपस्थितीबाबत सुरू असलेले सर्व दावे भाजपाने फेटाळून लावले आहे.
  • तरीही निषाद पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय निषाद यांनी या समुदायांच्या आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास उत्तर प्रदेश विधानसभेला घेराव घालण्याचे आवाहन केल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले.

निषाद पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले, “महाराज (योगी आदित्यनाथ) नेहमीच आमच्या लखनऊ आणि गोरखपूरमधील कार्यक्रमांना उपस्थित असतात. परंतु, हा कार्यक्रम दिल्लीत असल्याने आम्ही नड्डाजींना वैयक्तिकरित्या आमंत्रित करण्याचा विचार केला, पण उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमुळे ते येऊ शकले नाहीत. हे निश्चितच एक दुर्मीळ असे निमित्त होते, जिथे सर्व एनडीएचे मित्रपक्ष अशा प्रकारे एकाच मंचावर एकत्र आले, यामुळे भविष्यातही असे कार्यक्रम आयोजित करता येतील, असा विचार आमच्या मनात आला.”

संजय निषाद यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “उत्तर प्रदेशात पीडीएची चर्चा सुरू आहे, पण हा मंच पीडीए नेतृत्वाच्या एकजुटीसाठीचा खरा मंच होता. जेव्हा सर्वांच्या अडचणी समान आहेत, तेव्हा मंचही एकच का असू नये?” ओबीसींनी एकाच मंचावर एकत्र येण्याची गरज अधोरेखित करत निषाद म्हणाले की, राजकीय इतिहास दर्शवतो की हे समुदाय एकत्र आल्यावरच शक्तिशाली होतात. या बैठकीत निषाद म्हणाले की, या बैठकीने हे सिद्ध केले आहे की निषाद समुदाय कोणत्याही परिस्थितीत आपल्या हक्कांवर आणि अधिकारांवर तडजोड करणार नाही. जर आपले लोक दिल्लीला येऊ शकतात, तर ते लखनऊमधील विधानसभेलाही घेराव घालण्यासाठी मोर्चा काढू शकतात. आपण आपल्या पूर्वजांची स्वप्ने पूर्ण केली पाहिजेत आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी भविष्य सुरक्षित केले पाहिजे,” असे ते म्हणाले.

भाजपा मित्रपक्षांची विरोधकांवर टीका

उत्तर प्रदेशचे मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (एसबीएसपी) नेते ओम प्रकाश राजभर यांनी ओबीसींच्या हिताचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या विरोधी पक्षांवर टीका केली. पीडीए ही संकल्पना समाजवादी पक्षाने आपल्या पारंपरिक मुस्लीम-यादव मूळ मतदारांच्या पलीकडे विस्तार करण्यासाठी लोकप्रिय केली आहे. ओम प्रकाश राजभर म्हणाले, “तथाकथित पीडीए नेत्यांनी केवळ मागासलेल्या आणि अनुसूचित जातींचा वापर केला आहे. यात निषाद, केवट, मल्लाह, बिंद, कश्यप, राजभर, पटेल, कुर्मी आणि जाट यांचा समावेश आहे. ७० वर्षे काँग्रेसने आणि १९ वर्षे सपा आणि बहुजन समाज पक्षाने आमच्या जातींबरोबर भेदभाव केला, पण आज दिल्लीत निषाद पक्षाचा लाल झेंडा फडकतो आहे. यातून हे दिसून येते की, जर आमच्या समुदायाला त्यांचे हक्क नाकारले गेले, तर केवळ दिल्लीच नाही तर लखनऊमधील विधानसभेलाही घेराव घातला जाईल,” असेही ते म्हणाले.

वरिष्ठ अपना दल (सोनेलाल) नेत्याने सांगितले, “आम्ही सर्वजण एनडीएचा भाग आहोत. संजय निषादजींनी आम्हाला आमंत्रित केले होते आणि हे खरे आहे की सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या सर्व मागासलेल्यांसाठी एकत्र येण्याचा हा एक मंच ठरला आहे.” अपना दल (सोनेलाल)च्या नेत्या अनुप्रिया पटेल केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी आपल्या कुर्मी मतदार संघाच्या पलीकडे जाऊन इतर मागासलेल्या जातींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत गरज पडल्यास ते एकटे लढू शकतील. अपना दल (सोनेलाल)चे नेते आशीष पटेल हे अनुप्रिया यांचे पती आहेत. ते म्हणाले की, “सत्तेची गुरुकिल्ली मंचावरील चार पक्षांकडे आहे. आज या मंचावर खरा पीडीए उपस्थित आहे. त्यात राष्ट्रीय लोक दल (आरएलडी), सुहेलदेव भारतीय समाज पक्ष (एसबीएसपी), निषाद पक्ष आणि अपना दल (सोनेलाल) यांचा समावेश आहे.”

जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोक दल (आरएलडी)ने आमदार चंदन चौहान यांना तालकटोरा येथे बैठकीसाठी पाठवले. नुकतंच भाजपाचे राज्यमंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता. मात्र, त्यांनी भाजपा नेत्यांच्या अनुपस्थितीवर टिप्पणी करण्यास नकार दिला. आरएलडीचे राष्ट्रीय सरचिटणीस अनिल दुबे यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “आम्ही सर्वजण एनडीएचे मित्रपक्ष आहोत. निषाद पक्षाकडून निमंत्रण आले होते आणि आम्ही सर्वजण त्यात सहभागी झालो. भाजपाचे नेतृत्व उपस्थित राहू शकले नसेल, पण एक गोष्ट खरी आहे की आमची एकता एनडीए युतीला आणखी मजबूत करेल आणि तेच आमचे उद्दिष्ट आहे.”

भाजपाशी मतभेदाबाबत नेत्यांचे म्हणणे काय?

उत्तर प्रदेश भाजपाचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले की, “त्यांच्या पक्ष आणि मित्रपक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. त्यांनी राष्ट्रीय नेतृत्वाला आमंत्रित केले होते, कारण मित्रपक्षांसंबंधीचे निर्णय केंद्रीय नेतृत्व घेते आणि हे स्पष्ट आहे की ते उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. मित्रपक्ष आणि युती पूर्णपणे मजबूत आहे,” असे ते म्हणाले. सपाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले, “देशात पीडीएचा एकच खरा नेता आहे आणि ते म्हणजे अखिलेश यादव, ही बाब सर्वांना माहीत आहे. दिल्लीत जे काही घडले ते सर्व भाजपा पुरस्कृत होते. त्यांना आमच्या पीडीएच्या चर्चेची भीती आहे आणि ते त्यांच्या मित्रपक्षांमार्फत लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जनता त्यांच्या सर्व डावपेचांना ओळखून आहे.”