माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांशी आहे. त्यांना वैतागून मी शिवसेनेच्या सगळ्या पदांचा राजीनामा देतो आहे. हे शब्द होते ३६ वर्षीय राज ठाकरेंचे. १८ डिसेंबर २००५ या दिवशी राज ठाकरेंनी शिवसेना या त्यांच्या लाडक्या पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आणि आपली वेगळी वाट धुंडाळली. त्यानंतर बरोबर वीस वर्षांनी पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावेळी, म्हणजेच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा उद्धव ठाकरे काय म्हणाले होते? जाणून घेऊ.
राज ठाकरेंनी २००५ मध्ये सोडली शिवसेना
बाळासाहेब ठाकरे नावाच्या फायरब्रँड नेत्याने शिवसेना हा पक्ष १९६६ मध्ये स्थापन केला. ही शिवसेना सोडण्याचा निर्णय घेणं राज ठाकरेंसाठी नक्कीच सोपं नव्हतं. राज ठाकरेंनी नुकतीच एक मुलाखत दिली त्यातही राज ठाकरेंनी याबाबत भाष्य केलं. मला शिवसेनाच नाही तर घरही सोडावं लागलं आणि ते सगळं खूप विचित्र होतं असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. या पक्षाची वाटचाल मागच्या १९ वर्षांपासून सुरु आहे. २००९ मध्ये मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. दरम्यान राज ठाकरेंनी जेव्हा २००५ मध्ये शिवसेना सोडली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं.
२००५ मध्ये उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं होतं?
राज ठाकरेंनी घेतलेला निर्णय हा एका गैरसमजाचा परिणाम आहे. राजने २७ नोव्हेंबरला (२००५) बंड पुकारलं होतं. १५ डिसेंबरपर्यंत चर्चेच्या फेऱ्याही झाल्या. हे मतभेद मिटतील असं वाटलं होतं पण १५ डिसेंबरला बाळासाहेबांना भेटल्यावरही त्याचा निर्णय कायम राहिला. राजने जो निर्णय घेतला आहे त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वाईट वाटलं आहे. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यावेळी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी म्हणजेच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायला हवं या चर्चा मागच्या दोन दशकांपासून सुरु झाल्या आहेत. मात्र राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले नाही हे वास्तव आहे.
आजवर अनेकदा झाल्या आहेत राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा
२०१४ मध्ये भाजपाने युती तोडली तेव्हा, २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीच्या वेळी आणि २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र प्रत्यक्षात तसं काहीही घडलं नाही. आता भाजपा मजबूत स्थितीत असताना आणि महाराष्ट्रातले पाय भाजपाने बळकट केलेले असतानाच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीच एकमेकांच्या मतभेदांपेक्षा महाराष्ट्राचं हित आणि मराठी माणसाचं हित जास्त महत्त्वाचं आहे असं म्हटलं आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात अशा चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया काय?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दोन भाऊ एकत्र येत असतील तर चांगलंच आहे, आम्हाला आनंदच होईल. आपण वाट पाहू असं म्हणत सूचक विधान केलं आहे. तर सुप्रिया सुळेंनी याबाबत प्रतिक्रिया देत हा आनंदाचा दिवस असल्याचं म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर ही बाब महाराष्ट्रासाठी चांगलीच आहे. पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांचे मागच्या पाच दशकांपासूनचे हितसंबंध आहेत. त्यामुळे आज हा दिवस पाहण्यासाठी बाळासाहेब ठाकरे हवे होते असं विधान सुप्रिया सुळेंनी केलं आहे. या सगळ्या गोष्टी समोर येत आहेतच. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरोखर मतभेद विसरुन एकत्र येतील का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.