Parth Pawar political career : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील ४० एकरांचा भूखंड विकत घेतल्यानंतर विरोधकांनी आरोपांची राळ उठवली. या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी एक चौकशी समिती स्थापन केली. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपण्यात आली आहे. या प्रकरणात आपला कोणताही संबंध नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. संबधित जमिनीचा विक्री करार रद्द करण्यात येणार असल्याचे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
२०१९ मध्ये राजकारणात पदार्पण
पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे नातू आहेत. २०१९ मध्ये त्यांनी राजकारणात पदार्पण केले आणि पुण्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व सूत्रे शरद पवार यांच्या हातात होती. पार्थ पवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी अजित पवार यांनीच आपल्या काकांकडे (शरद पवार) आग्रह धरला होता. विशेष बाब म्हणजे- शरद पवार यांनी सुरुवातीला या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार केला होता; पण पार्थ यांच्या राजकीय प्रवेशासाठी त्यांनी माघार घेतल्याचे सांगितले जाते.
मावळमध्ये पार्थ यांचा पराभव
- मावळ लोकसभा मतदारसंघ हा त्यावेळी एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता.
- मात्र, या निवडणुकीत पक्षाचे संपूर्ण पाठबळ असूनही पार्थ पवार यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला.
- एकसंध शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी दोन लाखांहून अधिक मताधिक्याने पार्थ यांचा पराभव केला.
- पक्षाच्या बालेकिल्ल्यात झालेला हा पवार कुटुंबाचा हा पहिला मोठा पराभव ठरला होता.
- ‘मी राजकारणात एक महिन्यापूर्वी आलो आहे. अजून काही वर्षानंतर मी नक्कीच तयार असेन’ असे पार्थ पवार यांनी पराभवानंतर म्हटले होते.
पार्थ पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
- लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ यांनी स्वत:ला सिद्ध करण्याचे काम सुरू केले.
- त्यांनी मावळ तसेच पिंपरी-चिंचवड या अजित पवारांच्या मजबूत राजकीय क्षेत्रात अधिक वेळ घालवण्यास सुरुवात केली.
- तळागाळातील पाठिंबा पुन्हा मिळवण्यासाठी ते स्थानिक मतदारसंघात विविध उपक्रम राबवीत असून जनाधार निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
- राजकीय विश्लेषकांच्या मते, पार्थ पवार यांची सार्वजनिक कार्यक्रमांमधील वाढली उपस्थिती त्यांच्या वडिलांच्या राजकीय भूमिका आणि समीकरणांमधील बदलांशी थेटपणे जोडलेली आहे.
- २०२३ मध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विचारांशी फारकत घेऊन भाजपाशी हातमिळवणी केली.
- यादरम्यान पार्थ पवार यांची उजव्या विचारसरणीकडे झुकणारी विधाने योगायोग नसून मोठ्या राजकीय मोठ्या राजकीय पुनर्रचनेचा भाग आहे.
पार्थ यांच्या पोस्टमुळे अनेकदा वाद
“धूर आहे म्हणजे आगीचे अस्तित्व असतेच. पार्थ यांनी अचानक दाखवलेली राजकीय परिपक्वता ही त्यांच्या वडिलांच्या भाजपाशी असलेल्या जवळीकतेमुळेच आहे”, असे एका राजकीय विश्लेषकांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. पार्थ यांनी केलेल्या समाजमाध्यमांवरील पोस्टवरून अनेकदा वाद निर्माण झालेले आहेत. जुलै २०२० मध्ये त्यांनी केलेल्या एका पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली होती. या पोस्टमधून पार्थ यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. विशेष बाब म्हणजे- त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते आणि अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी होती.
राम मंदिराच्या उद्घाटनाला पाठिंबा
“अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अकाली निधनाने देशाला धक्का बसला आहे. त्याचे निधन हे दुर्दैवाने युवा भारतीयांच्या आकांक्षांच्या मृत्यूचे प्रतीक बनले आहे… मी या देशातील तरुणांच्या सामूहिक शोकात सहभागी आहे. त्यांची मागणी तर्कसंगत आणि न्याय्य आहे,” असे पार्थ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या भूमिकेविरोधात अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाला पाठिंबा दर्शवला. त्यांनी या कार्यक्रमाला ‘आधुनिक भारतातील रामराज्याची सुरुवात’ असे संबोधले होते. त्यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती तसेच पार्थ यांना सार्वजनिकरित्या फटकारले होते.
मराठा आरक्षणाबाबत कठोर भूमिका
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची घोषणाही पार्थ पवार यांनी केली होती. यावरून त्यांचे वडील अजित पवार यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली. “राज्य सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर आधीच न्यायालयात धाव घेतली आहे. आणखी कोणाला न्यायालयात जायचे असेल तर ते जाऊ शकतात; पण स्थगिती उठवण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारचीच आहे,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते.
पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणावरून कोंडी
- सध्या पार्थ पवार हे पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील ४० एकरांचा भूखंड विकत घेतल्यावरून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
- महार वतनाच्या या जमिनीची मूळ किंमत ही १८०० कोटी रुपयांची असताना ती ३०० कोटी रुपयांमध्ये विकण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
- त्याचबरोबर २० मे रोजी या व्यवहाराची नोंदणी करताना फक्त ५०० रुपये मुद्रांक वसूल करण्यात आला.
- प्रत्यक्षात या व्यवहारात २० कोटी रुपयांचा मुद्रांक भरणे आवश्यक होते. अजित पवारांच्या पुत्राच्या कंपनीसाठी साऱ्या सवलती देण्यात आल्याचा आरोप होत आहे.
- या प्रकरणात मुद्रांक शुल्क बुडवून राज्य शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय राज्याच्या मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागाने घेतला आहे.
पार्थ पवार यांचे पाय खोलात?
पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपनीला देय मुद्रांक शुल्काची सहा कोटी रुपयांची रक्कम भरण्याबाबत नोटीसही बजाविण्यात आली असून, नियमानुसार मुद्रांक शुल्क न आकारल्याप्रकरणी सहदुय्यम निबंधकांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणात काही चुकीचे झाल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दुसरीकडे मुलाच्या जमीन व्यवहाराशी आपला दुरान्वये संबंध नाही. नियमाच्या चौकटीत राहूनच काम करतो, असा दावा अजित पवारांनी केला आहे. या जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांचे पाय खोलात गेल्याची चर्चा आहे.
