Maharashtra local body polls आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या ठाणे जिल्ह्यासाठी भाजपाने महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. ठाण्यासह मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) सात महापालिकांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती लक्षवेधी ठरत आहे. याचे कारण म्हणजे गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक मानले जातात.
काही दिवसांपासून शिंदेसमर्थक आणि गणेश नाईक यांच्या समर्थकांमधील वक्तव्यांमुळे त्यांच्यातील संबंध अधिक ताणले गेल्याचे पाहायला मिळत आहे. हा निर्णय म्हणजे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ठाणे जिल्ह्यात भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्रमक पाऊल उचलल्याचा संकेत मानला जात आहे. भाजपाने गणेश नाईक यांची नियुक्ती का केली? भाजपासाठी ते किती महत्त्वाचे? आगामी निवडणुकांसाठी भाजपाची रणनीती काय? त्याविषयी जाणून घेऊयात…

गणेश नाईक यांच्या नियुक्तीचे कारण काय?
शिंदे यांचे जुने प्रतिस्पर्धी असलेल्या नाईक यांची नियुक्ती ‘महायुती’मधील भागीदार असलेल्या भाजपा आणि शिवसेनेमधील नवीन संघर्षाची ठिणगी मानली जात आहे. या दोन पक्षांमधील नाजूक समीकरणामुळेच गेल्या तीन वर्षांपासून प्रादेशिक राजकारणाला आकार मिळाला आहे. गणेश नाईक यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यावर पक्षातून फारकत घेतली होती. त्यांनी ठाण्यामध्ये पक्षाविरोधात आपली भूमिका कायम ठेवली होती.
गणेश नाईक यांचा जन्म बोनकोडे या लहानशा गावात झाला. आज या गावाचे नवी मुंबईतील ट्रान्स ठाणे क्रीक (टीटीसी) एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राच्या विकासामुळे हळूहळू शहरीकरण झाले आहे. गणेश नाईक यांनी कामगार आणि नागरी समस्यांसाठी सक्रिय असणारे या भागातील पहिले नेते म्हणून आपले स्थान निर्माण केले. किशोरवयातच त्यांनी ट्रान्स ठाणे क्रीकमधील माथाडी (हमाल) आणि औद्योगिक कामगार संघटनांमध्ये जबाबदाऱ्या स्वीकारल्या. ते वाद मिटवत असत आणि स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यात मदत करत असत.
हे कामगार जाळेच त्यांचा मुख्य आधारस्तंभ ठरले आणि १९७० च्या उत्तरार्धात नवी मुंबईत शिवसेनेचा विस्तार होत असताना ते पक्षाशी जोडले गेले. त्यानंतर नाईक लवकरच वाशी, नेरूळ, ऐरोली, तुर्भे, घणसोली व टीटीसी पट्ट्यात शिवसेनेचा चेहरा झाले. १९८० च्या दशकापर्यंत नाईक यांनी नवी मुंबईत आपले स्थान निश्चित केले होते; पण शिवसेनेत त्यांचा उदय सोपा नव्हता. पक्षाचा विस्तार होत असताना, नाईक आणि आनंद दिघे यांच्या कार्यक्षेत्रात अनेकदा संघर्ष झाला. त्यामुळे ठाकरे यांना हस्तक्षेप करून नवी मुंबईचा भाग नाईक यांच्यासाठी निश्चित करावा लागला.

नाईक यांचा निवडणुकीतील पहिला मोठा विजय १९९० च्या विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघातून झाला. पाच वर्षांनंतर शिवसेना-भाजपा युतीच्या मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात त्यांची मंत्री म्हणून नियुक्ती झाली. मात्र, नाईक यांच्या ठाम कार्यशैलीमुळे लवकरच त्यांचे जोशी आणि ठाकरे या दोघांशीही मतभेद झाले. त्यांचे जोशी यांच्याशी विभागीय मुद्द्यांवर मतभेद झाले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सार्वजनिक टीकाही केली. शिवसेनेमध्ये अशी टीका करणे तेव्हा दुर्मीळ मानले जात होते.
नाईक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. त्यामुळे शेवटी ठाकरे यांच्या संमतीने जोशी यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले. १९९० च्या उत्तरार्धात हा अंतर्गत संघर्ष स्थानिक राजकारणातही पसरला. शिवसेनेने नवी मुंबई महानगरपालिकेवरील आपले नियंत्रण गमावले. १९९९ मध्ये नाईक यांनी नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (एनसीपी) प्रवेश केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला. मात्र, त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाईक यांना पराभवाचा सामना करावा लागला.
शिवसेनेनंतरचा प्रवास
पराभवानंतर काही वर्षे नाईक शांत राहिले आणि २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेलापूरचे आमदार म्हणून त्यांनी राजकारणात पुन्हा ‘कमबॅक’ केले. त्यांची उत्पादन शुल्कमंत्री म्हणून नियुक्ती झाली आणि पुढील काही दशकांत त्यांनी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. त्यामुळे नवी मुंबईतील नागरी आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये त्यांचा प्रभाव आणखी वाढला. २०१४ मध्ये भाजपाच्या मंदा म्हात्रे यांनी नाईक यांचा पराभव केला. त्या त्यांच्या पूर्वीच्या सहकारी होत्या आणि त्यांनी नाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते.

हा पराभव, तसेच महाराष्ट्रातील भाजपाचे वाढते वर्चस्व पाहता, नाईक भाजपाच्या बाजूने गेले. अखेरीस २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि पक्षासाठी ऐरोलीची जागा जिंकली. तरीही शिंदे यांच्याबरोबरच्या त्यांच्या दीर्घकाळच्या शत्रुत्वामुळे भाजपाने त्यांना मंत्रिमंडळात घेणे टाळले. पाच वर्षांनंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपदी परत आल्यावर नाईक यांना वनमंत्री करण्यात आले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपासाठी नाईक रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत, विशेषतः शिंदे यांचा प्रभाव सर्वांत मजबूत असलेल्या ठाणे जिल्ह्यात.
नाईक भाजपासाठी महत्त्वाचे का आहेत?
शिंदे यांच्याशी असलेल्या प्रतिस्पर्धेव्यतिरिक्त, मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) आणि नवी मुंबईतील नाईक यांचा प्रभाव भाजपासाठी महत्त्वाचा आहे. मुंबईतील ट्रान्स ठाणे क्रीकमधील नाईक यांचा दीर्घकाळचा वावर आणि कामगार व कंत्राटदारांशी असलेले त्यांचे संबंध त्यांची क्षमता दर्शवतात. कोणत्याही राजकीय परिणामांची भीती न बाळगता बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मनोहर जोशी यांसारख्या मोठ्या नेत्यांना आव्हान देण्याचा त्यांचा राजकीय इतिहास शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात महत्त्वाचा ठरू शकतो.

नाईक यांच्याकडे एक कार्यरत असलेली स्थानिक संघटना आहे, जी भाजपासाठी उपयुक्त ठरते. तसेच त्यांचे नगरसेवक आणि माजी आमदारांचे नेटवर्क नवी मुंबई आणि ठाण्याच्या काही भागांमध्ये भाजपाला पाठिंबा मिळवून देऊ शकते. त्यांचे सामाजिक संबंधदेखील भाजपासाठी फायद्याचे आहेत. माथाडी आणि मराठी भाषिक समाज, तसेच आगरी-कोळी समूहांमध्ये त्यांची मुळे खोलवर रुजलेली आहेत. त्यांनी कालांतराने गुजराती, मुस्लीम, उत्तर भारतीय आणि ओबीसी समाजांमध्येही भक्कम आधार निर्माण केला आहे. विकास आणि नियोजनाशी संबंधित निर्णय, सिडको, एनएमएमसी आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाची नाईक यांना असलेली सखोल माहिती, अशा अनेक कारणांमुळे भाजपाने त्यांची निवड केली आहे.
