Annasaheb Dange BJP return महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच आता एका ज्येष्ठ नेत्याच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते तब्बल दोन दशकांनंतर भाजपात परतले आहेत. ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांच्या भाजपामध्ये परतल्याने भाजपाला मोठा फायदा होणार आहे. २००२ मध्ये पक्षातून आपल्याला बाजूला केले जात असल्याची तक्रार करत ते भाजपातून बाहेर पडले होते. आज त्यांचे वय ९० वर्षे आहे. डांगे हे पक्षाच्या जुन्या पिढीतील नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांचे लोकांशी थेट संबंध होते. या नेत्यांनी जनसंघाबरोबर काम केले आणि नंतर भाजपाची स्थापना केली. डांगे यांचे सहकारी सांगतात की, ते दररोज लोकांना भेटण्यासाठी आणि त्यांना पक्षात सामील करून घेण्यासाठी अनेक मैल सायकल चालवत असत. कोण आहेत अण्णासाहेब डांगे? महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या पक्ष प्रवेशाचे महत्त्व काय? जाणून घेऊयात..
कोण आहेत अण्णासाहेब डांगे?
- ८० च्या दशकात भाजपा देशाच्या राजकारणात चमकू लागला. त्यावेळी पक्षाचे विचारवंत वसंतराव भागवत यांनी ‘माधव’ ही रणनीती तयार केली. या नावात, ‘माळी’, ‘धनगर’ आणि ‘वंजारी’ या ओबीसी समाजांचा उल्लेख होता.
- या रणनीतीद्वारे पक्षासाठी पाया तयार करता येईल असे त्यांचे सांगणे होते. त्यावेळी मराठा, दलित आणि आदिवासी लोकांच्या समर्थनामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात कोणीही आव्हान देऊ शकत नव्हते.
- मात्र, वसंतराव भागवत यांची ‘माधव’ योजना यशस्वी ठरली. गोपीनाथ मुंडे, सूर्यभान वाहाडणे, एन. एस. फरांडे यांच्यासह डांगे यांनी राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आणि भाजपाचा संदेश राज्यात पसरवला.
- हे सर्व नेते ओबीसी समाजाचे होते आणि डांगे स्वतः धनगर समाजाचे होते.
१९९५-१९९९ मध्ये शिवसेनेबरोबर युती करून भाजपा पहिल्यांदाच महाराष्ट्रात सत्तेवर आला. डांगे यांना कॅबिनेट मंत्री म्हणून ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालयांची जबाबदारी देण्यात आली. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीचा पराभव झाला आणि विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला डांगे यांना विधान परिषद (एमएलसी) निवडणुकीचे तिकीट नाकारले गेले आणि त्यांना दुसरे कोणतेही पद दिले नाही, त्यामुळे भाजपामधील त्यांचे संबंध बिघडले. त्यावेळी त्यांनी आरोप केला होता की, हे सर्व मुंडे आणि महाजन यांच्या हातात सत्ता केंद्रित झाल्यामुळे घडले.
२००२ मध्ये डांगे यांनी भाजपा सोडला आणि दोन वर्षांनंतर ‘लोकराज्य पक्ष’ नावाचा एक नवीन पक्ष स्थापन केला. परंतु, हा पक्ष राज्यात आपली ओळख निर्माण करू शकला नाही. २०११ मध्ये डांगे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले आणि त्यांना पक्षाचे उपाध्यक्ष करण्यात आले. २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले तेव्हा डांगे शरद पवारांबरोबर राहिले, पण त्यांना मोठी राजकीय भूमिका मिळाली नाही आणि ते दुर्लक्षितच राहिले. सूत्रांनी सांगितले की, डांगे यांना महत्त्वाचे पद देण्याची पवार यांची इच्छा नव्हती, कारण त्यांना वाटले की डांगे यांचा प्रभाव कमी होत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात या प्रवेशाचे महत्त्व काय?
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) स्वतःला स्थिर करण्यासाठी संघर्ष करत आहे आणि भाजपाने जुन्या नेत्यांसह सर्वांसाठी आपले दरवाजे खुले केले आहेत, त्यामुळे डांगे यांचा भाजपामध्ये परतण्याचा मार्ग सोपा झाला. एका भाजपाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले, “आयुष्याच्या या टप्प्यावर डांगे कोणत्याही राजकीय पदाच्या शोधात नाहीत. त्यांच्या सांगली जिल्ह्यात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालये यासारख्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत.” भाजपाला विश्वास आहे की, डांगे यांच्या परतण्यामुळे धनगर समाजाला सकारात्मक संदेश जाईल. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील किमान ४० विधानसभा मतदारसंघांमध्ये या समाजाचे वर्चस्व आहे. “परत येऊन मी स्वतःला भाग्यवान समजतो,” असे डांगे आपल्या पक्षप्रवेशावेळी म्हणाले.
मुख्य म्हणजे भाजपामध्ये परतल्यानंतरही त्यांचा स्पष्टवक्तेपणा कायम होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये सामील होताना डांगे यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या परिस्थितीची आठवण करून दिली. ते म्हणाले, “तेव्हा, कोणीतरी अटलबिहारी वाजपेयींना विचारले की त्यांचे राजकीय उत्तराधिकारी कोण असतील? उत्तरादाखल वाजपेयींनी प्रमोद महाजन यांचे नाव घेतले. महाजनांना वाटले की जर त्यांनी केंद्रात महत्त्वाची भूमिका घेतली तर त्यांचे मेहुणे मुंडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, त्यानंतर मला पक्षात दुय्यम वागणूक मिळू लागली.”
ते म्हणाले की, “शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही महाजन आवडत होते. पक्षातील एका गटाला माझ्या वाढीची भीती वाटत होती.” मात्र, फडणवीस यांनी यावर लगेच प्रतिक्रिया देत म्हटले की, “हे केवळ गैरसमजाचे प्रकरण होते.” ते पुढे म्हणाले, “डांगे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते पक्षात परत आल्याचा आम्हाला आनंद आहे. त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी मोठे योगदान दिले आहे. ते काही गैरसमजांमुळे पक्ष सोडून गेले. आता आम्ही त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मागू इच्छितो. एका प्रकारे आम्ही त्यांच्याकडे आलो आहोत, ते आमच्याकडे नाहीत.”
एका ज्येष्ठ भाजपा नेत्याने सांगितले की, ९० च्या दशकातील भाजपाची परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. महाजन एक रणनीतिकार होते, तर मुंडे हे जननेते होते. शीर्षस्थ नेते असल्याने त्यांनी मध्यवर्ती भूमिका घेतली. ज्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, त्यांनी त्यांच्यावर टीका केली.”