Bangladesh national anthem Congress event आसाममधील श्रीभूमी जिल्ह्यात काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बांगलादेशचे राष्ट्रगीत गायले गेले. राष्ट्रगीत गात असल्याचा काँग्रेस नेत्याचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर नव्या राजकीय वादाला तोंड फुटले. आसाममधील भाजपा नेत्यांनी आता या प्रकरणात चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेसचे नेते विधु भूषण दास यांच्यावर बांगलादेशचे राष्ट्रगीत ‘आमार सोनार बांगला’ गायल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बांगलादेशने एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर वादग्रस्त नवा नकाशा (ज्यात ईशान्य भारताचा काही भाग त्यांच्या सीमेत दाखवला आहे) प्रकाशित केल्यामुळे भारत आणि बांगलादेशमधील तणाव आधीच वाढलेला आहे. भाजपाने हे काँग्रेसचे बांगलादेशवरील प्रेम असल्याचा आरोप केला आहे, तर काँग्रेसने या आरोपाला फेटाळून लावले आहे. नेमका हा वाद काय? काय आहे बांगलादेशच्या राष्ट्रगीताचा इतिहास? जाणून घेऊयात…

भाजप नेत्यांचे आरोप काय?

सोमवारी, श्रीभूमी जिल्ह्यातील भांगा येथील रहिवासी आणि सेवा दलाच्या जिल्हा युनिटचे माजी अध्यक्ष विधु भूषण दास यांनी स्थानिक काँग्रेस कार्यालय, इंदिरा भवन येथे आयोजित श्रीभूमी जिल्हा सेवा दलाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत बांगलादेशचे राष्ट्रगीत गायले. रवींद्रनाथ टागोर यांनी १९०५ मध्ये बंगालच्या पहिल्या फाळणीदरम्यान हे गीत लिहिले होते. श्रीभूमी जिल्हा बांगलादेश सीमेजवळ आहे. या कृतीमुळे लगेचच वाद निर्माण झाला. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी याला काँग्रेसचे बांगलादेशवरील प्रेम असे म्हटले.

भाजपाच्या आसाम युनिटने ‘एक्स’वर लिहिले: “काही दिवसांपूर्वीच बांगलादेशने संपूर्ण ईशान्य भारताला गिळंकृत करणारा नकाशा प्रकाशित करण्याचे धाडस केले आणि आता बांगलादेशप्रेमी काँग्रेसने चक्क आसाममध्ये बांगलादेशचे राष्ट्रगीत गायले आहे. यात राजकीय अजेंडा असल्याचे स्पष्ट दिसून येते.” आसामचे मंत्री अशोक सिंघल यांनीही टीका केली.

त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले, “आसाममधील श्रीभूमी येथील काँग्रेसच्या बैठकीत बांगलादेशचे राष्ट्रगीत ‘आमार सोनार बांगला’ गायले गेले, हा तोच देश आहे, ज्याला ईशान्य भारताला भारतापासून वेगळे करायचे आहे!” त्यांनी पुढे काँग्रेसवर ‘व्होट-बँक राजकारण’ केल्याचा आरोप केला. “आता हे स्पष्ट झाले आहे की काँग्रेसने दशकानुदशके बेकायदा ‘मियाँ’ घुसखोरीला आसाममध्ये प्रोत्साहन दिले. केवळ व्होट-बँक राजकारणासाठी राज्याची लोकसंख्या बदलून ‘ग्रेटर बांगलादेश’ तयार करण्यासाठी हे केले गेले,” असे ते म्हणाले.

काँग्रेसचे स्पष्टीकरण

काँग्रेसने भाजपाचे आरोप फेटाळून लावले असून, राजकीय फायद्यासाठी वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले. पक्षाच्या सदस्यांनी सांगितले की, या घटनेला अवाजवी महत्त्व दिले जात आहे आणि ती चुकीच्या पद्धतीने मांडली जात आहे. पक्षाच्या जिल्हा मीडिया सेलचे प्रमुख शहादत अहमद चौधरी यांनी स्पष्ट केले की, दास यांनी गाणे सुरू करण्यापूर्वी ते रवींद्रसंगीत गाणार असल्याचे सांगितले होते. “‘आमार सोनार बांगला’ हे गीत प्रामुख्याने टागोरांची रचना म्हणून ओळखले जाते,” असे ते म्हणाले.

“दास प्रत्येक स्वातंत्र्यदिनी इंदिरा भवन येथे भारतीय राष्ट्रध्वज फडकवतात. ते या गाण्याला बांगलादेशचे राष्ट्रगीत मानण्याचा प्रश्नच येत नाही. ही फक्त त्यांच्या मातृभाषेबद्दलची आवड व्यक्त करण्याची एक पद्धत होती,” असे त्यांनी स्पष्ट केले. समाजवादी पक्षाचे नेते वीरेंद्र सिंह यांनीही या कृतीचा बचाव करत म्हटले की, भाजपा बंगाली बोलणाऱ्या लोकांना, विशेषत: बांगलादेशींना सतत घुसखोर ठरवण्याचा प्रयत्न करत आहे.

‘आमार सोनार बांगला’ चा इतिहास

रवींद्रनाथ टागोर यांनी १९०५ मध्ये ब्रिटीश राजवटीत फाळणीदरम्यान ‘आमार सोनार बांगला’ (म्हणजे माझे सोनेरी बंगाल) हे गीत रचले. या गाण्यात टागोर यांनी बंगालचे भूभाग, नद्या आणि बंगाली लोकांचे त्यांच्या मातृभूमीशी असलेले गहन भावनिक नाते यांचे वर्णन केले आहे. हे गीत लवकरच प्रतिरोध आणि एकतेचे प्रतीक ठरले. ही फाळणी अखेरीस १९११ मध्ये रद्द करण्यात आली. हे गीत लिहिल्यानंतर जवळजवळ ७० वर्षांनी १९७१ मध्ये बांगलादेशने ते आपले राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात (पूर्वी करीमगंज म्हणून ओळखला जाणारा) प्रामुख्याने बंगाली भाषिक लोकसंख्या आहे.

हा वाद चिघळण्याचे कारण काय?

हा वाद अशा वेळी निर्माण झाला आहे, जेव्हा बांगलादेशबरोबरचे भारताचे संबंध आधीच डळमळीत आहेत. बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी झालेल्या देशव्यापी आंदोलनामुळे सत्तापालट झाला आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले. या घटनेनंतर दोन्ही शेजारी देशांमधील संबंध बिघडले आहेत. तेव्हापासून भारताने बांगलादेशमधील अल्पसंख्याकांवरील वाढत्या अत्याचाराच्या अहवालांवर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये वारंवार होणाऱ्या घुसखोरीच्या प्रयत्नांवर चिंता व्यक्त केली आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अलीकडेच असा दावा केला होता की, “बांगलादेशमधील अशांततेमुळे घुसखोरीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या पाच महिन्यांत दररोज २० ते ३० लोक बेकायदा आसाम आणि त्रिपुरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते.” सरमा म्हणाले की, त्यांनी सीमा ओलांडणाऱ्यांच्या वाढीचे कारण शेजारील देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था असल्याचे सांगितले.

दरम्यान, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या जवळीकतेमुळेही भारताची चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्यातच, बांगलादेशचे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार आणि नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांनी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानच्या जॉईंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद मिर्झा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, युनूस यांनी मिर्झा यांना Art of Triumph: Bangladesh’s New Dawn नावाचे पुस्तक भेट दिले. पुस्तकाच्या मुखपृष्ठाने लगेचच वाद निर्माण केला. त्यात बांगलादेशचा एक नकाशा होता, ज्यात आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरासह ईशान्य भारताचा मोठा भाग समाविष्ट होता. या तणावादरम्यान काँग्रेस नेत्याचा व्हिडीओ समोर आल्याने हा वाद आणखीन चिघळला.