Israel-Iran War impact in India : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकची संपूर्ण जगभरात चर्चा होत असताना इस्रायलने तशाच प्रकारचा हल्ला इराणवर केला आहे. १३ जून रोजी इस्रायलने इराणच्या परमाणू संशोधन केंद्रावर, लष्करी तळांवर आणि रहिवासी क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान झालं असून त्यांच्या लष्करप्रमुखांसह इतर महत्वाच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या या हल्ल्याला इराणनेही चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. दोन्ही देशांतील या वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, कच्च्या तेलाचे दर भडकल्याने भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी उत्तर दिलं आहे.
इराण हा कच्चा तेलाचा प्रमुख निर्यातदार देश आहे. भारतासह जगभरातील अनेक देश इराणकडून कच्च्या तेलाची आयात करतात. सध्या इस्रायल व इराणमध्ये संघर्ष पेटल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचा फटका भारतालाही बसणार असून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी भारतातील इंधनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांसह सरकारी तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठकही घेतली.
भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का?
- देशातील इंधनाचा पुरवठा सुरळीत राहणार असून त्यात कोणतीही वाढ होणार नाही, अशी हमी पेट्रोलिम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिली.
- भारत आपल्या इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि ऊर्जा सुरक्षेसाठी पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला तरीही भारत ती परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे, असं पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केलं.
- पेट्रोलियम मंत्र्यांनी या तयारीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला दिले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात कोणत्याही प्रकारच्या इंधनाचा तुडवटा भासू देणार नाही, अशी हमीही पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली.
आणखी वाचा : भाजपाच्या महिला नेत्यावर खंडणीसह अपहरणाचे आरोप; कोण आहेत सीता सोरेन?
पेट्रोलियम मंत्र्यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?
आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरील शेअर केलेल्या पोस्टमध्ये पुरी म्हणाले, “वाढत्या भू-राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. यावेळी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांसोबत इंधन पुरवठा स्थितीचा आढावाही घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आम्ही आमचे आयात स्रोत विविध प्रकारात विभागले असून, आमच्याकडे इंधन पुरवठ्यासाठी पुरेशी तयारी आहे.” दरम्यान, पेट्रोलिय मंत्र्यांनी घेतलेल्या या बैठकीला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत देशांतर्गत तयारीसोबतच जागतिक पातळीवरील अस्थिरतेचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.

भारताच्या खोऱ्यांमध्ये सुमारे ४२ अब्ज टन तेल
रविवारी एएनआयशी बोलताना, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी भारतातील खनिज इंधन शोध मोहिमेचाही उल्लेख केला. अंदमान समुद्रातील मोठा तेलसाठा लवकरच भारताच्या हाती लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “अंदमान समुद्रातील तेलसाठा हा १८४४४० कोटी लिटर्स असू शकतो. यामुळं भारताची अर्थव्यवस्था २० ट्रिलियन डॉलर्सची होऊ शकते. भारताकडे सुमारे ३.५ दशलक्ष चौरस किलोमीटरचे गाळसंचयन क्षेत्र आहे, पण आतापर्यंत केवळ ८% क्षेत्राचाच शोध घेण्यात आला आहे, पूर्वी यातील बऱ्याच भागात प्रवेश निषिद्ध होता. आम्ही त्यातील १ दशलक्ष चौरस किमी क्षेत्र खुले केले आहे, जिथे आता खनिज इंधन शोध व उत्पादन करता येईल,” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
इस्रायल-इराण संघर्षाचा भारतावर काय होणार परिणाम?
हरीदीपसिंह पुरी यांच्या वक्तव्याचा संदर्भ इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीसंदर्भात होता. या दोन्ही देशांशी भारताचे घनिष्ठ व्यापारी संबंध आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षांत भारताने इराणमध्ये १.२४ अब्ज डॉलर्सचा माल निर्यात केला. तसेच त्यांच्याकडून ४४१.९ दशलक्ष डॉलर्सच्या मालाची आयात केली. इस्रायलबरोबरही भारताने लक्षणीय व्यापार केला असून २.१५ अब्ज डॉलर्सच्या मालाची निर्यात केली आहे. त्याचबरोबर इस्रायलकडून १.६१ अब्ज डॉलर्सचा माल आयात केला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढल्यास त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, सध्याच्या घडीला भारताकडे कच्च्या तेलाचा मोठा साठा असून चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही.
हेही वाचा : काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडून आरएसएसच्या नेत्याचं कौतुक; कोण आहेत बंडारू दत्तात्रेय?
पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
इस्रायल-इराण संघर्षाचा पाकिस्तानलाही मोठा फटका बसत असल्याचं दिसून येत आहे. आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तान सरकारने रविवारी रात्री अचानक पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. पाकिस्तानच्या अर्थ विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हाय स्पीड डिझेल (HSD) च्या किमतीत प्रति लिटर ७.९५ पाकिस्तानी रुपये आणि पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर ४.८० पाकिस्तानी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सोमवारी १६ जून २०२५ पासून हे नवे दर लागू झाले आहेत. कच्च्या तेलाचा तुटवडा भासू लागल्यामुळे बलुचिस्तानमध्येही पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवू लागली आहे. बलुचिस्तानमधील अनेक पेट्रोल पंप रविवारपासून बंद झाल्याची माहिती आहे. बलुचिस्तानमधील उपायुक्तांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, देशातील काही भागातील पेट्रोल पंप अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पंजगुर आणि ग्वादर जिल्ह्यांमधील इराणशी असलेली सीमा सील करण्यात आल्याचेही या अधिसूचनेत म्हटले आहे.