उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने त्यांच्या एका महिला आमदाराची हकालपट्टी केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. समाजवादी पक्षाच्या बंडखोर आमदार पूजा पाल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊ इथे भेट घेतली होती. १६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी पूजा पाल यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पूजा पाल भाजपामध्ये प्रवेश करणार की काय अशा चर्चा रंगल्या आहेत. तसंच दोन्ही पक्षातील नेते तसा अंदाज व्यक्त करत आहेत. उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील चायल या विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आणि तिसऱ्यांदा निवडून आलेल्या पूजा पाल या ओबीसी समाजातील समाजवादी पक्षाच्या महिला नेतृत्वापैकी एक महत्त्वाच्या नेत्या मानल्या जातात. त्यांचा राजकीय प्रवास हा सुरुवातीपासूनच शोकांतिकेशी जोडलेला दिसून आला. २००५ मध्ये लग्नाच्या अवघ्या नऊ महिन्यातच त्यांचे पती राजू पाल यांची हत्या करण्यात आली. राजू पाल हे बहुजन समाजवादी पक्षाचे आमदार होते. माफिया आणि नंतर राजकारणात प्रवेश केलेल्या अतिक अहमद यांनी कट रचून राजू पाल यांची हत्या केली होती. त्या घटनेनंतर पूजा पाल यांनी वैयक्तिक आयुष्यात दु:ख सहन करत त्यांच्या पतीची राजकीय परंपरा पुढे सुरू ठेवली.
हकालपट्टी आणि मग मुख्यमंत्र्यांची भेट
२०२२ मध्ये समाजवादी पक्षाकडून चायल मतदारसंघातून पूजा पाल यांचा विजय झाला. मात्र, गेल्या वर्षी राज्यसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केल्यानंतर त्यांचे पक्ष नेतृत्वाशी संबंध काहीसे तडजोडीचे ठरले. मनोज पांडे, राकेश प्रताप सिंग आणि अभय सिंग यांच्यासारख्या बंडखोर नेत्यांना समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी लगेच कारवाई करून बाहेर काढले. मात्र, पूजा पाल यांच्यावर काही कारवाई झाली नाही. त्यानंतर हे जुनं प्रकरण १४ ऑगस्टला पुन्हा चिघळलं. विधानसभा अधिवेशनात पूजा पाल यांनी माफियांवर केलेल्या कारवाईबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. त्यानंतर काही तासांतच शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाईच्या कारणावरून पूजा पाल यांना सपाने बाहेरचा रस्ता दाखवला. पूजा यांची हकालपट्टी केल्यानंतर अखिलेश यादव आणि सपा यांच्या पीडीए (पिछडा, दलित, अल्पसंख्याक) राजकारणावर तीव्र टीका केली. पूजा यांनी आरोप केला की, त्यांची हकालपट्टी ही केवळ मतदारसंघातील एका गटाला खूश करण्यासाठी म्हणून करण्यात आली आहे.”
“ज्यांनी माझ्या पतीला हिरावून घेतले आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त केले, त्यांच्यासमोर मी तेव्हासुद्धा झुकले नाही, मग आज खोट्या गोष्टींसमोर का झुकावे? ज्यांनी मला वर्षानुवर्षांच्या संघर्षानंतर न्याय मिळवून दिला त्यांचे आभार मानले. असं करणं जर शिस्तभंग ठरत असेल तर त्याचा पक्षाने चुकीचा अर्थ काढला आहे. मला शिक्षा चुकांसाठी नाही तर सत्य बोलल्याबद्दल झाली”, असे पूजा यांनी म्हटले.
उत्तर प्रदेशातले समीकरण कसे बदलू शकते?
यावेळी बोलताना पूजा यांनी महिला आणि गडरिया (मेंढपाळ) ओबीसी समाजातील त्यांची ओळखही पुन्हा अधोरेखित केली. “मीदेखील पीडीओ समाजाचीच कन्या आहे. त्यांना खरंच आमच्या वेदना जाणवत असतील तर त्यांनी माझ्यावर असा अन्याय केला नसता. माझा न्यायासाठीचा संघर्ष मोठा आणि खडतर होता. मात्र, पीडीएच्या पुरस्कर्त्यांना त्याबाबत अजिबात सहानुभूती नव्हती”, असेही त्या म्हणाल्या. पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच्या भेटीमुळे पूजा पाल लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. सत्ताधारी पक्षासाठी वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. २०२६ मधील पंचायती राज निवडणुका या २०२७ च्या विधानसभा निवडणुकांचा सेमीफायनल राउंड मानला जात आहे.
समाजवादी पक्षाच्या पीडीए फॉर्म्युल्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या फायद्यानंतर यावेळी भाजपाच्या तळागाळातील ताकदीची मोठी कसोटी लागणार आहे. बिगर-यादव ओबीसी समाज एकत्रित करून भाजपा पुन्हा एकदा २०१४ प्रमाणे त्यांचा सामाजिक पाया पुन्हा रचत आहे. पक्षाने आतापर्यंत कुर्मी आणि लोढी समुदायातील मतदारांवर लक्ष केंद्रित केले होते. मात्र, पूजा पाल यांना पक्षात आणल्यास गडरिया समाजातही एक विश्वासार्ह चेहरा भाजपाला मिळेल असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. त्यांना लवकरच एखादे संघटनात्मक पददेखील मिळू शकते, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
भाजपा आधीपासून प्रयत्नशील
ओबीसी चेहरा शोधण्यासाठीचे प्रयत्न भाजपाकडून खूप आधीच सुरू आहेत. अलीकडेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राणी अवंतीबाई लोढी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. तसंच बदायूंमध्ये लोढी यांच्या नावाने नवीन पीएसी बटालियन उभारण्याची घोषणाही केली. लोढी समाजाशी असलेले नाते आणखी घट्ट करण्यासाठी भाजपाने हे महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे मानले जाते. सुमारे ५ टक्के मतदारसंख्या आणि ६० ते ७० विधानसभा मतदारसंघांवर लोढी समाजाचा प्रभाव आहे. या समाजाचा कल कल्याण सिंह यांच्या काळापासूनच भाजपाकडे राहिला आहे. त्यांच्यानंतरच्या काळात हा प्रभाव काहीसा कमी झाला होता. राजकीय विश्लेषकांच्या मते, पूजा पाल यांचा संभाव्य प्रवेश केवळ एका आमदारापलीकडे अधिक महत्त्व मिळवेल.
“पूजा पाल या भाजपाच्या ओबीसी आधारित रणनीतीतील एक नवा घटक ठरू शकतात. समाजवादी पक्षातून त्यांची हकालपट्टी आणि त्यांचा थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद हे स्पष्ट संकेत आहेत की भाजपा त्यांना महत्त्व देत आहे. ही केवळ एका आमदाराची गोष्ट नाही तर आगामी निवडणुकांपूर्वी नव्याने जातीय समीकरणे घडवणे आहे. योग्य पद्धतीने त्यांना स्थान दिले तर त्या सपाच्या पीडीए रणनीतीला कमकुवत करून भाजपाला ओबीसींचा पक्ष म्हणून पुढे आणण्यात मदत करू शकतात”, असे डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठातील राजकीय शास्त्राचे प्राध्यापक डॉ. शशिकांत पांडे यांनी सांगितले आहे.
सध्या तरी पूजा पाल यांच्या भाजपा प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, अखिलेश यादव यांच्यावरील तीव्र टीका आणि योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल सार्वजनिकरित्या व्यक्त केलेली कृतज्ञता, यामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट दिसत आहे. त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला तर जातीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडू शकतो. मात्र, उत्तर प्रदेश पुढील निवडणूक चक्रात प्रवेश करत असताना पूजा पाल यांच्या पुढच्या हालचालींवर दोन्ही पक्षांचे बारकाईने लक्ष असेल एवढं नक्की.