राहुल नार्वेकर : अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला संधी|young politican rahul narvekar a lawyer and speaker of maharashtra legislative assembly a member of bjp | Loksatta

राहुल नार्वेकर : अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला संधी

राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की ज्यांना कसलीही पार्श्वभूमी नाही. या अशा काही तरूण, आश्वासक पहिल्या पिढीच्या सर्व पक्षीय राजकारण्यांचा परिचय करून देणारी ही विशेष मालिका.

young politican rahul narvekar a lawyer and speaker of maharashtra legislative assembly a member of bjp
राहुल नार्वेकर : अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला संधी

उमाकांत देशपांडे

मुंबई : उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली आणि गेल्या २२ वर्षांतील राजकारणातील अनुभव पाठीशी असलेल्या ॲड. राहुल नार्वेकर यांना सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यांची जुलै २०२२ मध्ये अध्यक्षपदी निवड झाली, त्या वेळी त्यांचे सासरे रामराजे नाईक-निंबाळकर हे विधान परिषद सभापतीपदी होते. त्यामुळे सासरे-जावई हे विधान परिषद व विधानसभा पीठासीन अधिकारी असल्याचा दुर्मीळ योगायोगही साधला गेला होता. मूळच्या तळकोकणातील राहुल नार्वेकर यांचा जन्म ११ डिसेंबर १९७७ मधील असून त्यांचे शालेय शिक्षण कफ परेड येथील जी. डी. सोमानी विद्यालयात झाले, तर सिडनेहॅम महाविद्यालयातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले.

शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी मिळविली. उच्च व सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणांमध्ये बाजू मांडली होती. दिवाणी स्वरूपाच्या आणि जनहित याचिका हाताळताना कँपाकोला इमारतीच्या अनधिकृत बांधकामाचा वाद व अन्य प्रकरणांमध्ये त्यांनी युक्तिवाद केले होते. त्यांनी २००४ मध्ये कुलाबा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. पण त्या वेळी त्यांचा पराभव झाला होता व काँग्रेसच्या ॲनी शेखर निवडून आल्या होत्या.

हेही वाचा: श्रीशैल्य उटगे : ग्रामीण जनतेचा आवाज

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याबरोबर ते युवा सेनेच्या स्थापनेपासून सक्रिय होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मावळ लोकसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये निवडणूक लढविली होती. त्या वेळीही ते पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांची २०१४ मध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती झाली होती. ॲड. नार्वेकर यांना भाजपने २०१९ मध्ये कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि ते निवडून आले.

हेही वाचा: अभिजीत फाळके : विधायक कामातून राजकारणात

राज्यात सत्तापालट झाला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. राजकीय सत्तासंघर्षात अनेक कायदेशीर मुद्दे व पेच निर्माण झाले आहेत. आमदारांच्या अपात्रतेचा तांत्रिक मुद्द्यासह अनेक बाबींवर सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्षांकडे सुनावण्या प्रलंबित आहेत. या कायदेशीर पेचप्रसंगात कायद्याचे सखोल ज्ञान असलेली व्यक्ती विधानसभा अध्यक्षपदी असावी, असा विचार करून भाजपने ॲड. नार्वेकर यांना अतिशय तरुण वयात ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांचा भाऊ मकरंद आणि वहिनी हर्षिता हेही कुलाब्यातील दोन प्रभागांमधून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. राजकारणाबरोबरच नार्वेकर कुटुंबीय कुलाब्यातील मायड्रीम फाऊंडेशनच्या माध्यमातून महिला, मुले आणि समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी मोठे सामाजिक कार्य पार पाडत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 10:01 IST
Next Story
Gujarat Election 2022 : गुजरात निवडणुकीत महिला मतदारांच्या टक्केवारीत घट; नक्की काय आहे कारण?