आकुर्डी येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या आणि त्या कार्यालयामध्ये जीएसटीची नोंदणी केलेल्या सुमारे १७ हजार व्यावसायिकांनी गेल्या जुलै महिन्यापासून विवरणपत्र भरले नसल्याची माहिती समोर आली आहे. विवरणपत्र वेळेत न भरणाऱ्या व्यावसायिकांना कारवाईच्या नोटीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती जीएसटी कार्यालयातून देण्यात आली.

गेल्यावर्षी केंद्र सरकारने देशभर जीएसटीची अंमलबजावणी सुरू केली. जीएसटी लागू झाल्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाला जीएसटीची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांशी व्यावसायिकांनी जीएसटीची नोंदणी करून जीएसटी क्रमांक घेतला आहे. जीएसटी कायद्याची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर जीएसटी कौन्सिलने काही दुरुस्त्याही केल्या आहेत. जीएसटीची नोंदणी केलेल्या व्यावसायिकांनी विवरणपत्र भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. एक कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यावसायिकांनी तीन महिन्यांनी विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तर एक कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांनी प्रत्येक महिन्याला विवरणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र, व्यावसायिकांकडून विवरणपत्र भरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विवरणपत्र न भरणाऱ्या व्यावसायिकांना दरदिवशी ५० रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. जुलै २०१७ मध्ये ९ हजार व्यावसायिकांनी तर ऑक्टोबर २०१७ मध्ये साडेसात हजार व्यावसायिकांनी विवरणपत्र भरले नसल्याचे  नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

जीएसटी लागू झाल्यानंतर काही नागरिकांनी भविष्यामध्ये व्यवसाय सुरू करायचा आहे, या उद्देशाने जीएसटीची नोंदणी करुन जीएसटी क्रमांक मिळवला आहे. मात्र, त्यांनी व्यवसाय सुरू केलेला नाही. तरी त्यांच्याकडे जीएसटीचा नोंदणी क्रमांक आहे. अशा नागरिकांनीही विविरणपत्र भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून विवरणपत्र भरले गेले नाही तर त्यांना दरदिवशी वीस रुपये म्हणजेच महिन्याला सहाशे रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे जीएसटी नोंदणी करून ठेवलेल्या नागरिकांनी एक तर व्यावसाय सुरू करून रितसर विवरणपत्र भरावे किंवा नोंदणी रद्द करावी, असे आवाहन जीएसटी कार्यालयाने केले आहे.