देशभरात आज ७४ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होता आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा आज दुसरा वर्धापन दिन आहे. १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली होती. शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन प्रशासनाकडून स्वतंत्र आयुक्तालय स्थापन करण्यास परवानगी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आज पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याशी लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता, सध्या करोना लॉकडाउन काळात शहरातील गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला.

औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या अडीच वर्षांत खुनाचा तब्बल १७७ घटनां घडल्या आहेत. याशिवाय २१७ जणांवर जीवघेणे हल्ले करण्यात आल्याच्या देखील घडल्या आहेत. स्वतंत्र आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर आर.के पद्मनाभन यांना प्रथम आयुक्त होण्याचा मान मिळाला होता. आयुक्तालयाची सुरुवात ऑटोक्स्टर येथील इमारतीत झाली. अपुरे मनुष्यबळ, वाहनांची कमतरता अशा अनेक उणीवांसह आयुक्तालयाचा श्रीगणेशा झाला. परंतु, गुन्हेगारी काही आटोक्यात आल्याचे त्यावेळी पाहायला मिळाले नाही. आयुक्तालय झाल्यानंतर गुन्हेगारी घटनांमध्ये घट होईल अशी शक्यता सर्वच स्तरातून वर्तविण्यात आली होती. मात्र, गुन्हेगारी कमी झाल्याचे दिसून येत नाही.

सप्टेंबर २०१९ मध्ये आर.के पद्मनाभन यांची कार्यकाळ संपण्यापूर्वी बदली झाली. त्यांच्या जागी संदीप बिष्णोई यांनी पदभार स्वीकारला. त्याच्या एक दिवस अगोदर पिंपरी-चिंचवडमध्ये एकाची हत्या करण्यात आली होती. शहरातील गुन्हेगारी विषयी बिष्णोई यांनी चांगलीच माहिती घेतल्याचं पहिल्या पत्रकार परिषदेत दिसलं. मात्र, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, वाहन तोडफोडीच्या घटनांना, टोळ्यांच्या वर्चस्वातून खुनाच्या घटना, विनयभंग, बलात्कार अशा घटनांनी थांबायचं नाव घेतलं नाही. मध्यंतरी अज्ञात चोरट्यानी एटीएम मशीन घेऊन पळ काढण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यानंतर, काही अज्ञातांना पोलिसांनी जेरबंद करत बेड्या ठोकल्या.

करोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसरात्र कर्तव्य बजावणारे पोलीस करोना विषाणू पासून दूर राहू शकले नाहीत. आयुक्तालयातील अनेक पोलीस करोनाच्या विळख्यात सापडले होते. मात्र, यातील अनेकजण करोनामुक्त झाले असून पुन्हा त्याच जोमाने काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्यातरी करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे काहीप्रमाणात गुन्हेगारी कमी झाल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात येत आहे.

१३ टोळ्यांवर कारवाई –

“शहरातील गुन्हेगारीमध्ये घट झाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा व पोलिसांच्या चांगल्या कामगिरीचा हा परिणाम आहे.  पोलिसांनी चांगली कामगिरी करत १३ टोळ्यांवर कारवाई केली. तसेच इतर गुन्हेगारांवर देखील कारवाई केली जाणार आहे. कामगिरीमध्ये सातत्य राखण्यात येईल” – रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड.

अडीच वर्षात घडलेल्या गुन्ह्यांची अधिकृत आकडेवारी –
खून – १७७,   खुनाचा प्रयत्न:- २१७,  बलात्कार – ३८०,  विनयभंग:- ९६०

वार्षिक अधिकृत आकडेवारी –
जानेवारी ते जुलै २०२०      – खून – ३७ , बलात्कार – ७२
जानेवारी ते डिसेंबर २०१९- खून – ६८, बलात्कार – १६०
जानेवारी ते डिसेंबर २०१८ – खून – ७२, बलात्कार – १४८