उद्योग, व्यवसाय सुरू होत असल्यामुळे ३०० मजुरांचा गावी जाण्यास नकार

पुणे : उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तरांचल, झारखंड, पश्चिम बंगाल अशा विविध राज्यांमधील पुण्यात अडकलेल्या मजूर, कामगारांना मूळ गावी सोडण्यासाठी येत्या आठवडाभरात २३ रेल्वे गाडय़ा पुण्यातून पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी दिली. जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील उद्योग, व्यवसाय सुरू होत असल्याने आतापर्यंत ३०० मजुरांनी मूळ गावी जाण्यास नकार दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

करोनाबाबत सद्य:स्थितीची माहिती देण्यासाठी दूरचित्रसंवादाद्वारे जिल्हाधिकारी राम यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, टाळेबंदीमुळे पुण्यात अडकलेल्या मजूर, कामगारांना सोडण्यासाठी संबंधित राज्यांशी संपर्क करण्यात येत आहे. त्यानुसार मजुरांची यादी करण्यात आली असून दररोज दोन ते तीन यानुसार येत्या आठवडय़ात २३ रेल्वे गाडय़ा पुण्यातून विविध राज्यांत पाठवण्यात येतील. तसेच पुण्यातून महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्य़ात जाण्यासाठी एसटी आणि खासगी बसगाडय़ांची सोय करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत १५० बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. टाळेबंदीमुळे पुण्यात एक लाख आठ हजार ६०८ मजूर, कामगार अडकले असून ही संख्या प्रशासनाने शोधलेल्या व्यक्तींची आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील २५ हजार ८१६, बिहारमधील १३ हजार, मध्य प्रदेशातील दहा हजार ६०२, पाच हजार १६८ झारखंड आणि इतर अन्य राज्यांमधील आहेत.

आतापर्यंत पुण्यातून बारा हजार मजूर, कामगार त्यांच्या मूळगावी गेले आहेत. त्यामध्ये मध्य प्रदेशात चार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे प्रत्येकी एक रेल्वे गाडी सोडण्यात आली आहे.

परदेशातून आलेल्यांना संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक

सिंगापूर, लंडन आणि मलेशिया येथून सोमवारी १२१ प्रवासी पुण्यात आले. संबंधित प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. यापुढील काळात परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.