पीएमपीला योग्य मार्गावर आणण्याचे प्रयत्न सुरू करताच या प्रयत्नांना महापालिकेनेही साथ देण्याचा निर्णय घेतला असून पीएमपीला निधी देण्याचे गेले अनेक महिने प्रलंबित असलेले प्रस्ताव स्थायी समितीने तातडीने मंजूर केले आहेत. त्यामुळे पीएमपीला विविध कामांसाठी महापालिकेकडून आता २६ कोटी रुपये मिळणार आहेत.
पीएमपीची अकार्यक्षमता सातत्याने अनुभवायला मिळत असल्यामुळे ही सेवा सातत्याने टीकेचा विषय ठरत होती. त्यामुळे पीएमपीचे विभाजन करून पुन्हा पीएमटी आणि पीसीएमटी सुरू करावी व पुणे आणि पिंपरी महापालिकेने पूर्वीप्रमाणेच सार्वजनिक वाहतूक सेवा चालवावी, असा ठरावही महापालिकेने संमत केला होता. तीन आठवडय़ांपूर्वी पीएमपीच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी तातडीने कृती योजना सुरू केली आहे. पीएमपीच्या बंद पडलेल्या दीडशेहून अधिक गाडय़ा मार्गावर आल्या असून पीएमपीचे इतरही अनेक विषय मार्गी लागत आहेत.
या बदलांमुळे महापालिकेनेही सकारात्मक भूमिका घेतल्याचे आता दिसत आहे. नगर रस्ता तसेच अन्य बीआरटी मार्गावर कॅमेरे व अन्य यंत्रणा बसवण्याचा प्रस्ताव गेले अनेक महिने पडून होता. या कामासाठी ११ कोटी रुपये खर्च होणार असून केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू योजनेतून या कामासाठी निधी मिळणार होता. मात्र ती योजना आता स्थगित करण्यात आल्यामुळे आयटीएमएस ही यंत्रणा बसवण्याचे काम रखडले होते. या निधीसाठी सातत्याने पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र त्याला महापालिकेकडून मंजुरी दिली जात नव्हती. अखेर ही यंत्रणा बसवण्यासाठी वर्गीकरणाच्या माध्यमातून ११ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंगळवारी मंजूर केला. बीआरटी मार्गावरील थांब्यांवर कॅमेरे बसवण्याचे काम या योजनेत होणार आहे. तसेच थांब्यावर कोणती गाडी येणार आहे, तिची वेळ, ती कोठे जाणार आहे आदी माहिती प्रवाशांना देण्याचे काम या यंत्रणेद्वारे होईल.
शहरातील पाचवी ते दहावीमधील जे विद्यार्थी पीएमपीने प्रवास करतात त्यांना महापालिकेतर्फे सवलतीचे पास दिले जातात. त्यासाठी पीएमपीला १० कोटी रुपये महापालिकेने द्यायचे आहेत. ही रक्कमही प्रलंबित होती. अंदाजपत्रकात ही रक्कम देण्यासाठी तरतूद असून त्यातील पाच कोटी रुपये पीएमपीला देण्याचा प्रस्तावही स्थायी समितीने मंगळवारी मंजूर केला आहे. पीएमपीला संचलनात जी तूट येत आहे त्यातील सन २०१३-१४ या वर्षांतील तूट पुणे महापालिकेने देण्याचा प्रस्तावही प्रलंबित होता. पीएमपीने १२ कोटी ५१ लाख रुपयांची मागणी महापालिकेकडे केली होती. या रकमेपैकी चालू वर्षीच्या अंदाजपत्रकातील अखर्चित रकमेतील १० कोटी रुपये पीएमपीला द्यावेत, असाही निर्णय घेण्यात आला आहे.

पीएमपीचे नवे अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांनी पीएमपीची सेवा कार्यक्षम करण्याचा विश्वास आम्हाला दिला आहे. तशी कृती योजनाही सुरू झाली आहे. त्यांच्या कोणत्या योजना आहेत याचीही माहिती ते स्थायी समितीत येऊन सादर करणार आहेत. त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन पुणेकरांना चांगली प्रवासी सेवा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे आम्ही देखील सकारात्मक भूमिका घेऊन पीएमपीने मागितलेला सर्व निधी देण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.
– बापूराव कर्णे गुरुजी, अध्यक्ष स्थायी समिती