‘करोना’च्या संकटकाळात शिक्षकांसाठी ऑनलाइन अध्यापनाचे नवे दालन खुले झाले. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणासाठीच्या प्रणाली (अ‍ॅप्लिकेशन), संकेतस्थळे, शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाइन शिकवण्यासाठी शिक्षकांना मागणी वाढली आहे.

नोकऱ्यांच्या संकेतस्थळांवर ‘ऑनलाइन अध्यापनासाठी शिक्षक हवे आहेत’ अशा जाहिराती झळकत आहेत. करोना काळात ऑनलाइन शिकवू शकणाऱ्या शिक्षकांची मागणी जवळपास ३०० टक्क्यांनी वाढली आहे.

टीमलिजच्या स्कूलगुरू एज्युसव्‍‌र्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू रुज म्हणाले, की करोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षण क्षेत्र अचानकपणे ऑनलाइनकडे वळले. शाळा आणि महाविद्यालयांनाही ऑनलाइन शिकवू शकणाऱ्या शिक्षकांची गरज निर्माण झाली. करोना पूर्वी ऑनलाइन अध्यापन केलेल्या शिक्षकांची संख्या १० टक्के ही नव्हती. त्यामुळे ऑनलाइन अध्यापनाचे कौशल्य शिकण्यासाठी शिक्षकांचे एकाएकी प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे नृत्यापासून कलेपर्यंत आणि गणितापासून कोडिंगपर्यंतचे विषय ऑनलाइन शिकवू शकणाऱ्या शिक्षकांच्या मागणीत ३०० टक्के  वाढ झाली आहे. आता शाळा सुरू होऊ लागल्या असल्या, तरी शैक्षणिक प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा मिश्र (ब्लेंडिंग) पद्धतीने सुरू राहणार आहे. ऑनलाइन शिकवण्यासाठी विविध शैक्षणिक अ‍ॅप्लिके शन्स, शाळांसह विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्तरावर मार्गदर्शन करू शकणाऱ्या शिक्षकांनाही मागणी आहे.

गरज कुठे?

ऑनलाइन शिक्षण देणारी अनेक संके तस्थळे, अ‍ॅप्लिके शन गेल्या काही काळात निर्माण झाल्याने या संके तस्थळावर विविध विषय शिकवण्यासाठी शिक्षकांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे नोकरीच्या संकेतस्थळांवर ऑनलाइन अध्यापनासाठी शिक्षकांच्या जाहिराती दिसत आहेत.

बदल काय? करोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी ऑनलाइन शिक्षणाचा वापर के वळ शिक्षणपूरक साधन म्हणून के ला जात होता. मात्र गेल्या आठ महिन्यांमध्ये ऑनलाइन शिक्षण हा शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग झाला आहे. येत्या काळात शिक्षणाची प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा मिश्र पद्धतीने करण्याचा विचार होऊ लागला आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये ऑनलाइन शिक्षणामुळे शाळा-महाविद्यालयाच्या वर्गात बसून पारंपरिक पद्धतीनेच शिकण्याची संकल्पना मोडीत निघाली. ‘करोना’नंतरच्या काळात शिक्षण संस्थांकडून मिश्र पद्धतीचे शिक्षण सुरू ठेवण्याचा विचार होत आहे. नव्या शैक्षणिक धोरणात दूरशिक्षणाला महत्त्व देण्यात आले असल्याने विविध विद्यापीठांशी जोडल्या गेलेल्या संके तस्थळे आणि अ‍ॅप्लिके शन्सवर ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध असतील. त्यामुळे पूर्वप्राथमिक ते उच्च शिक्षण या संपूर्ण स्तरावर ऑनलाइन शिकवू शकणाऱ्या शिक्षकांना मोठी मागणी आहे.

– डॉ. आनंद वाडदेकर, ई-लर्निग तज्ज्ञ